Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९

पाच मनसबदार आज ठरणार
लोकसभेच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये, उद्या (गुरुवारी) विभागातील पाच मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. तब्बल ७७ लाख मतदार १०५ उमेदवारांमधून आपला प्रतिनिधी निवडून देतील. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे, शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे, माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष जयवंत आवळे, खासदार रावसाहेब दानवे आदी प्रमुख उमेदवारांचे भवितव्य उद्या निश्चित होईल. पंधरवडाभर चाललेला प्रचार काल सायंकाळी थंडावला आणि छत्तीस तास आतील हालचाली चालू होत्या. सर्व मतदारसंघांमध्ये निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे.

मतदानाची तयारी पूर्ण
औरंगाबाद, २२ एप्रिल/खास प्रतिनिधी

औरंगाबाद मतदारसंघातील १ हजार ५३६ मतदानकेंद्रांवर मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजीव जैस्वाल यांनी आज दिली. या निवडणुकीत प्रथमच मतदारांना मतदानासाठी दोन इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रांचा वापर करावा लागणार आहे. पहिल्या १५ उमेदवारांची नावे पहिल्या यंत्रात व नंतरच्या सात उमेदवारांची नावे दुसऱ्या यंत्रात असणार आहेत.

बीडमध्ये मोठा बंदोबस्त
बीड, २२ एप्रिल/वार्ताहर

लोकसभा निवडणुकीसाठी उद्या (गुरुवारी) मतदान होत असून २ हजार ११८ मतदानकेंद्रांवर होणाऱ्या मतदानासाठी दहा हजार कर्मचारी व चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राजकीय दृष्टीने प्रतिष्ठेच्या व महत्त्वपूर्ण ठरलेल्या या मतदारसंघातील निवडणूक शांततेत व्हावी यासाठी प्रशासनाने एका पोलीस अधीक्षकासह दोन अतिरिक्त अधीक्षकांसह मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

लातूरमध्ये यंत्रणा सज्ज
लातूर, २२ एप्रिल/वार्ताहर

लोकसभेच्या उद्या (गुरुवारी) होणाऱ्या निवडणुकीसाठी लातूर मतदारसंघातील ९१४ गावांतील १ हजार ८३३ मतदानकेंद्रांवर ११ हजार ४२९ मतदान कर्मचारी असतील. संरक्षणासाठी २ हजार ३४० पोलीस ठिकठिकाणी आहेत. नागरिकांना मतदान क्रमांक शोधण्यास काही अडचण असेल तर भ्रमणध्वनीवर मतदान केंद्रांची माहिती सांगण्याची व्यवस्थाही उपलब्ध करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी एकनाथ डवले यांनी आज सांगितले.

दानवे की काळे?
आज निर्णय!

जालना, २२ एप्रिल/वार्ताहर

भारतीय जनता पक्षाचे रावसाहेब दानवे व काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांच्या भवितव्यावर मतदार उद्या (गुरुवारी) शिक्कामोर्तब करतील. लोकसभेच्या जालना मतदारसंघातील १ हजार ७१६ मतदानकेंद्रांवर उद्या मतदान होणार आहे. याशिवाय ७ पूरक मतदानकेंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून यापैकी ६ केंद्रे विधानसभेच्या फुलंब्री मतदारसंघात आणि एक पूरक केंद्र पैठण मतदारसंघात आहे.

काळजी लपवत ‘जोर का झटका’
उस्मानाबाद, २२ एप्रिल/वार्ताहर

शक्तिप्रदर्शने संपली, झेंडे आणि नेत्यांच्या लटकवलेल्या प्रतिमांच्या गाडय़ा धक्क्य़ाला लागल्या. चेहऱ्यावरची काळजी लपवत नेत्यांनी ‘जोर का झटका’ मारण्याचे ठरविले. उद्या (गुरुवारी) होणाऱ्या मतदानासाठी ‘छुपे पाठिंबे’ व कार्यकर्त्यांवर ‘नजर’ ठेवत यंत्रणा लावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. शिवसेनेने जोर वाढविला आहे.

यांना सांभाळा
*निवडणूक म्हटलं की, नेत्यांसाठी नाजूक काळ. कोण केव्हा काय करील आणि कशामुळे काय समस्या उभी राहील, याचा नेम नसतो. सतत मागे-पुढे फिरणाऱ्या अतिउत्साही कार्यकर्त्यांमुळे कोणी नाराज होऊ नये म्हणून थोरल्या साहेबांनी निवडणूक काळात आपल्याच काही कार्यकर्त्यांना मतदान होईपपर्यंत सांभाळण्याची जबाबदारी इतरांवर सोपविली. अवघ्या पंधरा दिवसांत सांभाळू घातलेल्या कार्यकर्त्यांचे उद्योग पाहून साहेब यांना कायम कसे सांभाळत असतील, अशी प्रतिक्रिया नोंदवून मोकळा झाला.

मनाई आदेश झुगारून औरंगाबादमध्ये दारू विक्री
शिवसेना शहरप्रमुखाच्या भावासह दोघांना अटक
औरंगाबाद, २२ एप्रिल/प्रतिनिधी
मतदानाच्या पाश्र्वभूमीवर मंगळवारपासून सर्वत्र दारू विक्रीस मनाई करण्यात आली असली तरी शहरात ठिकठिकाणी बिनधास्तपणे दारू विक्री सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. काल रात्री आणि आज दुपारी गुन्हे शाखेच्या पथकाने दोन ठिकाणी छापा घालून ५५ हजार रुपयांचे देशी-विदेशी मद्य जप्त केले आहे. पोलिसांनी अटक केलेले दोघेही बारचालक आहेत.

मत‘ज्ञान’ आणि मत‘दान’
आचार्य विनोबा भावे यांनी ‘मत’ म्हणजे खऱ्या मनाचे म्हणणे अशी मताविषयीची व्याख्या केलेली आहे. अशी साधी-सोपी आणि सुटसुटीत व्याख्या करून ते म्हणतात, ‘आपले म्हणणे खरे आहे का?’ आता यासंबंधीचा विचार करीत असताना आपल्यासमोर अनेक प्रश्नच निर्माण होतात. आपल्याला खरं ‘मन’ आहे का? आणि अशा खऱ्या मनाला काही म्हणता येईल का? आपलं खरं म्हणणं ‘दाना’च्या खपातून व्यक्त होऊ शकेल का? या साऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपल्या ‘लोकशाही’ प्रक्रियेत नकारात्मक द्यावी लागतील.

‘मानवत गॅस एजन्सी’च्या गोदामाला टाळे ठोकले!
मानवत, २२ एप्रिल/वार्ताहर

‘मानवत गॅस एजन्सी’ला परभणीचे जिल्हा पुरवठा अधिकारी देवेंद्र अंधारे यांनी आज अचानक भेट दिली. त्यांना आढळलेल्या त्रुटींनंतर या एजन्सीच्या गोदामाला टाळे ठोकण्यात आले. या गॅस एजन्सीबद्दल गेल्या काही दिवसांपासून तक्रारी वाढल्या आहेत. श्री. अंधारे यांनी आज अचानक भेट दिली. एजन्सीचे रेकॉर्ड समाधानकारक नव्हते. एजन्सीधारक ग्राहकांकडून वाहतूक भाडय़ापोटी प्रत्येकाकडून दहा ते पंधरा रुपये जादा वसूल करत असल्याची, एजन्सीचा दूरध्वनी नेहमी बंद असे, सिलिंडर शिल्लक असताना कृत्रिम तुटवडा असल्याचे भासवणे व शिल्लक साठा वाहनधारकास व उपाहारगृह चालकास जादा दराने विक्री करणे अशा अनेक तक्रारी असल्याने ही कारवाई झाली.

पंचायत समितीच्या भांडारगृहास आग
नांदेड, २२ एप्रिल/वार्ताहर
मुखेड पंचायत समितीच्या भांडारगृहास अचानक आग लागून झालेल्या दुर्घटनेत सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. आज दुपारी दोन वाजता ही आग लागली. पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात असलेल्या या भांडारगृहात वाहनांचे टायर, लाकडे व अन्य वस्तूंचा साठा होता. दुपारी २ वाजता या भांडारगृहाला अचानक आग लागली. नागरिकांनी व कर्मचाऱ्यांनी धावपळ करूनही आग त्वरित आटोक्यात आली नाही. परंतु आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न झाल्याने मोठा अनर्थ टळला. सभापती व्यंकटराव पाटील रोजेगावकर, उपसभापती जगदाने आदींनी घटनास्थळी भेट देऊन चौकशीचा आदेश दिला.

औरंगाबादचे जिल्हाधिकारी मतदानापासून वंचित राहणार!
औरंगाबाद, २२ एप्रिल/प्रतिनिधी
मतदानाच्या तयारीत गेल्या एक महिन्यापासून गुंतलेले जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजीव जयस्वाल यांना उद्या (गुरुवारी) मतदान करता येणार नाहीत. ‘केव्हा आणि कोठे मतदान करणार?’ असे पत्रकारांनी आज विचारल्यावर त्यांनी स्वत:च ही कबुली दिली. श्री.जयस्वाल यांचे नाव कोलकाता येथील मतदारयादीत आहे. निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यामुळे त्यांना नाव येथे हस्तांतरित करून घेता आले नाही. शिवाय त्यांनी टपालाने मतदान करण्यासाठीही अर्ज केला नव्हता. मतमोजणी संपण्यापर्यंत त्यांच्यावर जबाबदारी असल्यामुळे कोलकाता येथे मतदानासाठीही जाणे त्यांना शक्य नाही. त्यामुळे या वेळी मतदान करणे शक्य नाही, असे त्यांनी सांगितले.

लातूरच्या साई रस्ता परिसरातील नागरिकांचा निवडणुकीवर बहिष्कार
लातूर, २२ एप्रिल/वार्ताहर

रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करूनही त्यावर शासन व प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्याप्रकरणी साई रस्ता परिसरातील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या बहिष्कारानंतरही कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा साई रस्ता व आर्वी परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. शहरातील रेणापूर नाक्यापासून साईकडे जाणारा मुख्य रस्ता मागील तीन वर्षांपासून अत्यंत खराब झाला आहे. अर्धवट कामामुळे मागील तीन वर्षांपासून येथील नागरिकांना रहदारीचा कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

मतदारांना संरक्षण -डवले
लातूर, २२ एप्रिल/वार्ताहर
लातूर लोकसभा मतदारसंघातील काही गावांतील मतदानावर बहिष्कार घालणार असल्याच्या बातम्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध होत आहेत. मतदारांना त्यांच्या मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा काही लोकांचा हा हेतू असेल तर त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यापासून कोणीही वंचित करू शकणार नाही. अशा गावांमध्ये मतदानास येणाऱ्या मतदारांना संरक्षण दिले जाईल, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी एकनाथ डवले यांनी दिली आहे.

निवडणूक खर्चात काँग्रेसचे आवळे आघाडीवर
लातूर, २२ एप्रिल/वार्ताहर
१९ एप्रिलपर्यंत निवडणूक खर्चाचा तपशील दाखल केलेल्या १८ उमेदवारांत काँग्रेसचे जयवंत आवळे यांनी १० लाख ३३ हजार रुपये खर्च झाल्याचे कळविले आहे. उर्वरित उमेदवारात ते खर्चाच्या बाबतीत आघाडीवर आहेत. १८ एप्रिलपर्यंत भाजपाचे डॉ. सुनील गायकवाड यांचा खर्च ८ लाख ९१ हजार झालेला आहे. बसपाचे अ‍ॅड. बाबासाहेब गायकवाड यांचा १८ एप्रिलपर्यंत १ लाख ३२ हजार, रिपाइंचे टी. एम. कांबळे यांचा १५ एप्रिलपर्यंत २ लाख ७७ हजार, जनसुराज्य शक्ती पक्षाचे तुकाराम गन्न्ो यांचा १८ एप्रिलपर्यंत १ लाख १५ हजार तर भारिप - बहुजन संघाचे बाबूराव पोटभरे यांचा २० एप्रिलपर्यंत ३ लाख ९१ हजार रुपये खर्च झाला आहे. भाजपच्या खर्चात नरेंद्र मोदी यांच्या सभेचा तर काँग्रेसच्या खर्चात पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या सभेच्या खर्चाचा समावेश नाही.

मुख्याध्यापकांची सहविचार सभा
लातूर, २१ एप्रिल/वार्ताहर
जिल्ह्य़ातील अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित व कायम विनाअनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांची मंगळवारी (दि. २८) सहविचार सभा आयोजित करण्यात आली आहे. अहमदपूर, चाकूर, जळकोट, उदगीर व औसा तालुक्यातील मुख्याध्यापकांची सकाळी ११ ते २ या वेळेत येथील नांदेड रस्त्यावरील ज्ञानेश्वर विद्यालयात तर लातूर, रेणापूर, निलंगा, शिरूर अनंतपाळ व देवणी तालुक्यातील मुख्याध्यापकांची दुपारी अडीच वाजता राजमाता जिजामाता विद्यालय येथे सहविचार सभा घेणार आहे.