Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

रथी-महारथींचे भवितव्य आज ठरणार!
मुंबई, २२ एप्रिल / खास प्रतिनिधी

 

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व कोकणातील २५ मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होत आहे. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे व बॅ. ए. आर. अंतुले या केंद्रीय मंत्र्यांसह गोपीनाथ मुंडे, रामदास आठवले, समीर भुजबळ, निलेश राणे, चंद्रकांत खैरे आदींच्या भवितव्याचा फैसला उद्या ठरणार आहे. उद्या मतदान होत असलेल्या मतदारसंघांतून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याचे आव्हान राष्ट्रवादीपुढे असून पवारांच्या पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या या पक्षाची खरी कसोटी आहे.
कडाक्याच्या उन्हामुळे पहिल्या टप्प्यात विदर्भात मतदारांमध्ये निरुत्साह आढळून आला. पहिल्या टप्प्यात सरासरी ५५ टक्क्यांच्या आसपास मतदान झाले होते. उद्या मतदान होत असलेल्या २५ मतदारसंघांमध्ये ३७७ उमेदवार रिंगणात आहेत. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बारामती, माढा, शिरुर, मावळ, नगर, कोल्हापूर, हातकणंगले, सातारा, नाशिक, दिंडोरी, जळगाव, उस्मानाबाद या मतदारसंघांवर राष्ट्रवादीची भिस्त आहे. शरद पवारांची पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. प्रचाराच्या काळात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पवारांच्या पंतप्रधानपदावरून उलटसुलट विधाने केली. स्वत: पवारांनी आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याचे एकदा संकेत दिले. तर नाशिकच्या अधिवेशनात ५० उमेदवार रिंगणात असलेल्या पक्षाकडे पंतप्रधानपद कसे येऊ शकते, असा सवाल करून नेहमीप्रमाणे या मुद्दय़ावर गोंधळ उडवून दिला. जयललिता, नवीन पटनायक व मुलायम सिंग यांनी पवारांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचे समर्थन केले आहे.
एकूणच राज्यातून १५ खासदार निवडून आणण्याचे उद्दिष्ट असलेल्या राष्ट्रवादीसाठी उद्याचे मतदान महत्त्वाचे ठरणार आहे. कोल्हापूर, नगर, मावळ व शिरुर या चार मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीची खरी कसोटी आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादीपुढे कडवे आव्हान आहे. कोल्हापूर व नगरमध्ये विद्यमान खासदार सदाशिव मंडलिक आणि तुकाराम गडाख यांची बंडखोरी राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी त्रासदायक ठरली आहे. राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीसाठी वातावरण अनुकूल असून, राज्यात आघाडीला ३० ते ३२ जागा मिळतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे सरचिटणीस आमदार गुरुनाथ कुळकर्णी यांनी व्यक्त केला आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये उद्योगमंत्री नारायण राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तीच गत नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची आहे. सांगली व नंदूरबार हे दोन बालेकिल्ले कायम राखणे काँग्रेसपुढे आव्हान ठरले आहे. दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीने काँग्रेसच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढविली आहे. शिर्डीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांची कसोटी आहे. सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे यांनी शेवटच्या टप्प्यात जोर लावला. माढय़ामध्ये शरद पवारांच्या मताधिक्याकडे सर्वांचे लक्ष लागले असले तरी पवारांना बारामतीएवढे मताधिक्य मिळणार नाही, असे बोलले जात आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या मताधिक्याबाबत उत्सुकता आहे. पुण्यात सुरेश कलमाडी यांना जागा कायम राखण्याचे मोठे आव्हान आहे. औरंगाबादमध्ये शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांच्यापुढे काँग्रेसचे उत्तमसिंह पवार व शांतीगिरी महाराजांनी आव्हान उभे केले आहे. जालन्यात काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे व भाजपचे खासदार दानवे यांच्यातील लढत लक्षणीय ठरणार आहे.
(नवी दिल्ली, पी.टी.आय.) १३ राज्यांमधील मतदार उद्या १४० भावी खासदारांचे भवितव्य ठरवणार असून राहुल गांधी, शरद पवार, जॉर्ज फर्नांडिस, रामविलास पासवान आणि सुषमा स्वराज या दिग्गज नेत्यांचे भवितव्य उद्या इलेक्ट्रॉनिक मशीन्समध्ये बंद होणार आहे. हे सर्व जण देशाचे नेतृत्व करण्यास कोण लायक आहे यावर मतदारांनी आपला कौल द्यावा असे प्रचारसूत्र ठेवून लढत होते. त्यामुळेच या सर्वांचे काय होणार याकडे देशवासियांचे लक्ष लागून राहणार आहे. आंध्रप्रदेश आणि ओरिसा या राज्यांमधील मतदान उद्या पूर्ण होत आहे. मणिपूरमधील लोकसभेच्या एका मतदारसंघासाठी आजच मजदान होत आहे, मात्र दुसऱ्या टप्प्यामधील मतदान म्हणूनच ते गृहित धरले जात आहे. उत्तरप्रदेशातील अमेठी मतदारसंघातून राहुल गांधी पुन्हा लोकसभेसाठी निवडणूक लढवत असून महाराष्ट्रमधील माढा मतदारसंघातून शरद पवार, बिहारच्या हाजीपूरमधून रामविलास पासवान, मध्यप्रदेशमधील विदिशामधून सुषमा स्वराज आणि मुझफ्फरपूरमधून अपक्ष म्हणून जॉर्ज फर्नांडिस आपले नशीब आजमावत आहेत. केंद्रीय व्यापार आणि उद्योग मंत्री कमलनाथ आपल्या पारंपरिक चिंदवाडा मतदारसंघातून निवडणूक लढवत असून अखिलेश प्रसाद सिंह (पूर्वी चंपारण), रघुवंश प्रसाद सिंह (वैशाली) आणि रघुनाथ झा (वाल्मिकीनगर-बिहार) हे अन्य तिघेही उद्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सकाळी सातपासून सुरू होणारे मतदान सायंकाळी पाच वाजता संपेल, मात्र नक्षलवादी प्रभावित इलाख्यांमध्ये ते दुपारी तीन वाजता संपणार आहे. आंध्रप्रदेश विधानसभेच्या १४० जागांसाठी आणि ओरिसा विधानसभेच्या ७७ जागांसाठीही उद्या मतदान पूर्ण होत आहे. ओरिसाच्या ११ लोकसभा मतदारसंघांमधील मतदान उद्या पूर्ण होत आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी, त्यांचे प्रतिस्पर्धी चंद्राबाबू नायडू आणि चिरंजीवी तसेच तिसऱ्या वेळी मुख्यमंत्री होऊ पाहणारे ओरिसाचे नवीन पटनायक यांचे भवितव्य उद्याच्या विधानसभेच्या मतदानात निश्चित होणार आहे.