Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

.. तर पंतप्रधानपद स्वीकारण्याचा विचार करेन
प्रकाश करात
तिरुपती, २२ एप्रिल/पी.टी.आय.

 

‘अपरिहार्य परिस्थिती’ निर्माण झाल्यास पंतप्रधानपद स्वीकारण्याबाबत आपण विचार करू, असे मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी आज सांगितले. लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात सरकार स्थापण्यासाठी कॉंग्रेसला पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे सांगून देशात तिसरी आघाडी हीच सर्वात मोठी राजकीय शक्ती ठरेल, असा दावा त्यांनी केला. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आपण नसलो तरी अन्य कोणताही पर्याय नसल्यास हे पद स्वीकारण्याचा आपण विचार करू, असे करात यांनी पत्रकारांना सांगितले. डावे पक्ष कोणत्याही परिस्थितीत कॉँग्रेसला सरकार स्थापण्यासाठी पाठिंबा देणार नाहीत हे स्पष्ट करून ते म्हणाले की, निवडणुकीनंतर बिगर-कॉँग्रेस आणि बिगर-भाजप पक्षांचा गटच सर्वात मोठा राजकीय गट म्हणून उदयास येईल. कॉँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष नि:संशयपणे स्वबळावर सरकार स्थापण्याच्या स्थितीत नसतील. कॉँग्रेसचे मित्र पक्ष एकेक करून त्या पक्षाला सोडून जात असून भाजपला तर अनेक राज्यांमध्ये खातेदेखील उघडता येणार नाही, असा दावा करात यांनी केला. निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील प्रचारात सहभागी होण्यासाठी श्री. करात येथे आले होते. त्यांच्यासमवेत तेलगू देसमचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू होते.