Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

एलटीटीईच्या दोन म्होरक्यांची शरणागती
प्रभाकरनचा अद्याप ठावठिकाणा नाही
कोलंबो, २२ एप्रिल/ पीटीआय

 

श्रीलंका लष्कराची उत्तर भागात तीव्र गतीने आगेकूच सुरू असल्याने तमिळ बंडखोर संघटनेचे आघाडीचे काही गट भराभर शरणागती पत्करत असून, गेली २५ वर्षे तमिळ बंडखोरांविरुद्ध सुरू असलेला अविश्रांत लढा आता संपुष्टात येण्याची चिन्हे दृष्टिपथात आहे.
‘एलटीटीई’ या तमिळ बंडखोर संघटनेचा पूर्वी प्रवक्ता असलेला दया मास्टर आणि जॉर्ज हे दोघे आघाडीचे नेते पुटुमाथालन येथे शरण आले. या संघटनेचा सर्वेसर्वा वेल्लुपिल्लई प्रभाकरन आणि त्याचे इतर निकटचे सहकारी अजूनही याच भागात लपले असून पळून गेलेले नाहीत असा श्रीलंका सरकारला ठाम विश्वास आहे. तमिळ बंडखोरांनी आता त्यांचे लष्करी सामथ्र्य पूर्णपणे गमावले असून ते हारणारी लढाई लढत आहेत. श्रीलंका सरकारची लष्करी कारवाई थांबवायची असेल तर या बंडखोरांनी ताबडतोब शरण येणे हाच एकमेव मार्ग त्यांच्यासाठी उरला आहे, असे संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते केहेलिया रम्बुकवेल्ला यांनी सांगितले.
बंडखोरांनी व्यापलेला उत्तर भागातील अवघा १८ किलोमीटरचा पट्टा रिकामा करायचा राहिला आहे. या भागातून हजारो तमिळ नागरिक अजूनही घराबाहेर पडत आहेत. या भागात आता १० ते १५ हजार नागरिक उरले असल्याचे संकेत शरण आलेल्या बंडखोरांनी दिले आहेत. बंडखोरांनी पराभव झाल्याचे मान्य केल्याचे हे स्पष्ट चिन्ह असून श्रीलंकेत लवकरच नवे पर्व सुरू होईल अशी आशा निर्माण झाली आहे. आज सकाळपर्यंत सरकारचे नियंत्रण असलेल्या सुरक्षित क्षेत्रात ९५ हजारांहून अधिक नागरिक गोळा झाले असल्याचेही या प्रवक्तयाने सांगितले.
अजून सुरू असलेल्या लढाईत ४६ बंडखोर ठार मारले असल्याचा दावा लष्कराने केला आहे. बंडखोरांचे अनेक बालेकिल्ले उद्ध्वस्त करून मोठय़ा प्रमाणावर शस्त्रसाठा आणि दारुगोळा जप्त केला आहे. ‘एलटीटीई’ समर्थक ‘तमिळनेट’ या संकेतस्थळावर मात्र कोणी शरण गेले असल्याचा उल्लेख नाही.