Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार अमेरिकाधार्जिणे
प्रकाश करात
समर खडस
मुंबई, २२ एप्रिल

 

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकार अमेरिकाधार्जिणे असून या देशाच्या आर्थिक नाडय़ा स्वत:च्या ताब्यात ठेवण्याच्या अमेरिकी षडयंत्रात हे सरकार सामील आहे. त्यामुळेच या सरकारचा पाठिंबा आम्ही काढला होता. अणुकरारावर पुनर्विचार करण्यास जे सरकार तयार असेल त्याच भाजपारहित सरकारला आमचा केंद्राचा पाठिंबा असेल, अशी प्रतिक्रिया मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.
कॉ. करात म्हणाले की, सध्या केंद्रात असलेल्या मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने भारत व अमेरिका दरम्यान केलेला अणु करार हा बिलकूलच आपल्या देशाच्या हिताचा नाही. हा करार का हिताचा नाही, त्यातून देश कसा व किती गुलाम बनणार आहे, याचे सुस्पष्ट व विस्तृत विश्लेषण आमच्या पक्षाने व एकंदरच डाव्या आघाडीने यापूर्वीच लिखित स्वरूपात तसेच संसदेमध्येही केले आहे. ही भूमिका घेऊन आम्ही देशभरातील जनतेमध्येही गेलो आहोत. मात्र पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आमच्या मताला शून्य किंमत असल्याचे म्हटले असल्याने पुन्हा काही मुद्दे स्पष्ट करतो, असे करात म्हणाले.
या करारादरम्यान भारताने अमेरिकेला एक मोठे वचन दिले आहे. ते म्हणजे अमेरिकेकडून १० हजार मेगॅव्ॉट विजेच्या निर्मितीसाठी रिअ‍ॅक्टर्स (अणुभट्टय़ा) विकत घेण्याचे. या रिअ‍ॅक्टर्सची किंमत दोन लाख ८० हजार कोटी रुपये इतकी आहे. या पैशातून अमेरिकेतील दोन-तीन बडय़ा कॉर्पोरेशनच्या तुंबडय़ा भरणार आहेत. तर भारताला इतक्या महाग अणुभट्टय़ांतून तयार होणाऱ्या विजेचा खर्च येणार आहे. ८ ते १० रुपये प्रति युनिट. इतकी महाग वीज या देशातील जनतेला परवडणारी नाही, असे आमचे ठाम मत आहे. ही खरेदी झाल्यास यातून एन्रॉनसारखा नवा घोटाळा होण्याची शक्यता आहे, असेही करात म्हणाले आणि हे अणुभट्टी खरेदी करणे जरी आपण नाकारले तरीही एकंदरच अणुकरार बासनात गुंडाळला जाईल, असे करात यांनी स्पष्ट न बोलता सुचविले.
ज्या लालकृष्ण अडवाणी व मनमोहन सिंग यांच्यात सध्या बरेच वाक्युद्ध सुरू आहे, त्यांना अमेरिकेबाबत मात्र समान भूमिका घ्यावीशी वाटते, हे पुरेसे बोलके आहे, असा टोलाही करात यांनी मनमोहन सिंग यांच्या अडवाणी यांचा या कराराला पाठिंबाच आहे, या वाक्याबाबत लगावला.