Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९
प्रादेशिक

‘सेलिब्रिटी स्टेटस’ ही सामाजिक कार्य करण्याची संधी
मुंबई, २२ एप्रिल / प्रतिनिधी

प्रत्येक सेलिब्रिटीने कोणत्या तरी सामाजिक कार्याला हातभार लावलाच पाहिजे, अशी सक्ती नसावी. प्रत्येक जण आपापल्या परीने सामाजिक जबाबदारी पार पाडत असतो. त्याने केलेले सामाजिक कार्य केवळ ‘पब्लिसिटी स्टंट’च असतो, हा समज चुकीचा आहे. ‘एक्स्प्रेस वृत्तसमूहा’च्या ‘स्क्रीन’ या साप्ताहिकाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘द बिग पिक्चर’ या परिसंवादात सहभागी झालेल्या प्रत्येक सेलिब्रिटीचे हेच मत होते.

नौदल अधिकारी बेपत्ता;कुटुंबियांचा मात्र हत्येचा आरोप
मुंबई, २२ एप्रिल / प्रतिनिधी

नौदलाच्या ‘आयएनएस गोदावरी’ या गस्ती नौकेवरील प्रेम प्रकाश शुक्ला (३८) हे अधिकारी गेल्या १० दिवसांपासून बेपत्ता असून यलोगेट पोलीस ठाण्यात याबाबत आज तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान, मुंबई पोलिसांसोबत नौदलातर्फेही याप्रकरणी तपास करण्यात येत आहे. नौदलातर्फे चौकशी समिती स्थापन करण्याता आली आहे. दरम्यान, शुक्ला यांची त्यांच्या सहकाऱ्यांनी हत्या केल्याचा आरोप शुक्ला यांच्या पत्नीने केला आहे.

अखेर म्हाडाला पूर्ण वेळ मुख्य वास्तुरचनाकार मिळाला!
पुनर्विकास प्रकल्पांना गती मिळण्याची शक्यता
मुंबई, २२ एप्रिल / प्रतिनिधी
अनेक वर्षांनंतर म्हाडाला हक्काचा मुख्य वास्तुरचरनाकार मिळाला असून सरकारी क्षेत्रात मोठमोठय़ा प्रकल्पांची यशस्वीपणे जबाबदारी सांभाळणाऱ्या राजेश फडके यांची मुख्य वास्तुरचनाकार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. न्हावा शेवा तसेच तत्सम मोठे सरकारी प्रकल्प यशस्वीरीत्या हाताळणाऱ्या फडके यांच्या नियुक्तीमुळे म्हाडाच्या पुनर्विकासाला गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

उर्दू आरोपपत्र देण्याची कसाबची मागणी फेटाळली
प्रस्तावित आरोपांच्या अभ्यासासाठी १० दिवसांची मुदत
मुंबई, २२ एप्रिल / प्रतिनिधी
आपल्यावर निश्चित केलेल्या आरोपांबाबतची माहिती उर्दूमध्ये उपलब्ध करून द्यावी, अशी अजमल अमीर कसाब याची मागणी विशेष न्यायालयाने आज फेटाळून लावली. आरोपांच्या मसुद्यावरील अभ्यासासाठी दहा दिवसांची मुदत देण्याची बचाव पक्षाची मागणी मात्र मान्य केली. आरोपीला त्याच्यावर काय आरोप ठेवण्यात आले आहेत हे समजून घेण्याचा अधिकार आहे.

ठाणे जनता बँक तंत्रज्ञान कंपनी स्थापणार
५९ कोटींचा नफा
ठाणे, २२ एप्रिल/प्रतिनिधी
आर्थिक मंदीचा सहकार क्षेत्रालाही फटका बसत असतानाच ठाणे जनता सहकारी बँकेने या काळातही आपली घोडदौड कायम ठेवत ५८.९२ कोटींचा ढोबळ नफा मिळविला आहे, तसेच इतर बँकांना तंत्रज्ञान सेवा पुरविण्यासाठी स्वत:च्या मालकीची माहिती-तंत्रज्ञान उपकंपनी स्थापन करण्याचा निर्णयही बँकेने घेतल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष विद्याधर वैशंपायन यांनी दिली. खासगी क्षेत्रातील बँकांच्या १३ टक्के वाढीच्या पाश्र्वभूमीवर ठाणे जनताने आपल्या ठेवी १५.१७ टक्क्यांनी वाढविल्या आहेत.

मालमत्तेसाठी सावत्र आईची हत्या
ठाणे, २२ एप्रिल/प्रतिनिधी

सांगलीली ठप्प झालेले दुकान आणि विकलेली मोटारसायकल याच्या कलहातून मुलाने पत्नीच्या सहाय्याने सावत्र आईची चाकूचे अठरा वार करुन निघृण हत्या केली. या प्रकरणी उत्तर प्रदेशाला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या सुनेला कुर्ला रेल्वे स्टेशनवर जेरबंद करण्यात आले. मुंब्र्यातील फिरदोष अपार्टमेंटमधील तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या फरीदाबानू मनवर खान (३५) हिची हत्या झाली. तिला अडीच वर्षांचा मुलगा आहे. याप्रकरणी सुन फरहीन उर्फ अफ्रीम (२१) हिला अटक करण्यात आली असून पळून गेलेल्या सावत्र मुलगा सलीम (२४) याचा पोलीस शोध घेत आहेत. अकरा वर्षांची सख्खी बहिण, सासरे, सावत्र सासूसह त्याची पत्नी फरहीन मुंब्रा येथे राहत होते. दीड वर्ष सांगलीत दुकान थाटून व्यवसाय करणाऱ्या सलिमने दुकान बंद केले. त्यानंतर मोटरसायकल विकून मुंब्र्याला परतला. त्यामुळे घरात कलह माजू लागले आणि त्यातून वडिल घरी नसताना सावत्र आईवर चाकूचे अठरा वार करून मुलगा पत्नीसह पळून गेला. शेजारच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या पुतण्याने जखमी फरीदाबानूला कळवा रुग्णालयात दाखल केले. मात्र ती वाचू शकली नाही. सून ही उत्तर प्रदेशातील असल्याने पोलिसांनी कुर्ला रेल्वे स्थानकावर सापळा रचून तिला अटक केली.

प्रभादेवी येथे २७ लाखांची घरफोडी
मुंबई, २२ एप्रिल / प्रतिनिधी

प्रभादेवी येथील गोपाळ सोसायटी हायस्कूल मार्ग परिसरात मंगळवारी रात्री २७ लाखांची घरफोडी झाली. प्रभादेवी येथील शर्मिला हिरालाल अमीना (४७) यांच्या घरी ही घरफोडी झाली. घरफोडी झाली तेव्हा अमीना घरी नव्हत्या. रात्री उशिरा घरी परतल्यानंतर घरातील वस्तू अस्ताव्यस्त पडल्याचे त्यांना आढळून आले. तसेच कपाटातील सुमारे २७ लाख ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे अमीना यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ दादर पोलिसांना घटनेविषयी कळविले. अमीना या घरात एकटय़ाच राहत असल्याचे हेरून चोरांनी घरफोडी केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी तपास सुरू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

‘मानव एकता दिना’निमित्त रक्तदान शिबीर
मुंबई, २२ एप्रिल / प्रतिनिधी

संत निरंकारी मंडळाच्या वतीने २४ एप्रिल हा दिवस ‘मानव एकता दिवस’ म्हणून साजरा केला जात असून या निमित्ताने देशभर रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. यंदाच्या रक्तदान शिबिरांची सुरुवात २४ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत चेंबूर येथील संत निरंकारी सत्संग भवन येथे आयोजित शिबिराने होत आहे. याच दिवशी उल्हासनगर, सातारा, कोल्हापूर, गुहागर, औरंगाबाद, अकोला, खामगाव, बीड, बारामती व नागपूर आदि ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर २६ एप्रिल रोजी ठाणे, सानपाडा, भाईंदर आणि सांताक्रुझ या ठिकाणी ही शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. निरंकारी रक्तदान शिबिरांचा आरंभ २३ वर्षांपूर्वी १९८६ साली दिल्ली येथे झाला. निरंकारी मिशनचे तत्कालीन प्रमुख बाबा गुरबचन सिंह यांना २४ एप्रिल १९८० रोजी काही समाजकंटकांनी गोळ्या घालून ठार मारले होते. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या शिबिरांचे आयोजन करण्यात येते. अधिक माहितीसाठी २५५३१४६८ किंवा २५५३८७६४ या क्रमांकांवर संपर्क साधावा.