Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९

जिल्ह्य़ात परंपरेची पुनरावृत्ती की नवा इतिहास?
महेंद्र कुलकर्णी
नगर, २२ एप्रिल

जिल्ह्य़ातील दोन्ही मतदारसंघांत काँग्रेसच्या बंडखोरांमुळे कमालीची चुरस निर्माण झाली आहे. ‘काँग्रेसचा बालेकिल्ला’ असे बिरूद मिरवताना जिल्हा या इतिहासाला जागतो की धक्कादायक निकालाने नवा इतिहास घडवतो याबाबत उत्सुकता आहे. केवळ उमेदवारच नव्हे, तर इतरही अनेक नेत्यांचे भवितव्य निवडणुकीच्या निकालाशी जोडले गेले आहे.

जिल्ह्य़ातील ३२ उमेदवारांचा प्रचार खर्च ८७ लाख ५१ हजार
राजीव राजळे आघाडीवर!
नगर, २२ एप्रिल/प्रतिनिधी
जिल्ह्य़ाच्या दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील ३२ उमेदवारांचा निवडणूक प्रचाराचा आतापर्यंतचा खर्च १ कोटीपेक्षाही कमी म्हणजे ८७ लाख ५१ हजार ८१३ रुपये आहे. यात नगर मतदारसंघातील १५ उमेदवारांचा खर्च ५६ लाख २३ हजार २६६, तर शिर्डीमधील १७ उमेदवारांचा खर्च ३१ लाख २८ हजार ५४७ रुपये इतका आहे.

वियोगार्थ मिलन..
कविवर्य गदिमांच्या गीतरामायणातील ‘वियोगार्थ मिलन होते तर्क जाणत्यांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ या पंक्ती एकूणच मानवी जीवनाचे नेमके मर्म किती सहज पण यथार्थपणे उलगडून दाखवतात. इथं त्यांनी अधोरेखित केलेलं मानवी जीवनातील वास्तव तसं सर्वानाच बऱ्यापैकी ठाऊक असते. कारण या वास्तवाची प्रचिती तशी प्रत्येकाच्याच राशीला आलेली असते. कुणाला लवकर, उशिरा कुणाला आणि अटळ असल्याने त्या वास्तवापासून नसतेही होत सुटका कुणाची कधी.

लोकसत्ता
मतदारांना आवाहन

नगर जिल्ह्य़ातील २ लोकसभा मतदारसंघांत आज सकाळी ७ ते सायं. ५ पर्यंत मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदाराने मतदान केंद्रावर आपली ओळख पटविणे गरजेचे आहे. याकामी ज्या मतदारास निवडणूक ओळखपत्र देण्यात आलेले आहे, त्याने ते मतदानाच्या वेळी सोबत आणणे आवश्यक आहे. जो मतदार निवडणूक ओळखपत्र दाखवू शकत नसेल त्याने खालीलप्रमाणे कोणतेही एक कागदपत्र मतदानाच्या वेळी सोबत आणणे आवश्यक आहे.

पारनेरला मतदारजागृती अभियान
पारनेर, २२ एप्रिल/वार्ताहर

भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलन, नागेश्वर मित्रमंडळ व पारनेर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने युवकांनी मतदार जागृती अभियान राबविले.चांगल्या प्रवृत्तींना निर्भयपणे मतदान करा, मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. मतदानाचा बजवावा, असा जागर अभियानात करण्यात आला. यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रतिमा असलेला रथ तयार करण्यात आला होता. पारनेर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर, गणपतराव अंबुले, पत्रकार संजय वाघमारे, सोनाजी औटी, शाहीर गायकवाड, दत्तात्रेय अंबुले यांच्या हस्ते रथाचे उद्घाटन झाले. श्री. हजारे यांच्या सहीच्या मतदार जागृती पत्रकाचे वाटप करण्यात आले.या अभियानात कल्याण थोरात, प्रमोद गोळे, दत्ता शेरकर, अनिकेत औटी, श्रीराम बोरुडे सहभागी झाले होते.

दिलीप तोरडमल यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
कर्जत, २२ एप्रिल/वार्ताहर
तालुक्यातील बहिरोबावाडी येथील व्यापारी दिलीप गुलाबराव तोरडमल (वय ५२) यांच्या पार्थिवावर आज शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे पत्नी, २ मुली, १ मुलगा, ४ भाऊ असा परिवार आहे. सोलापूर-पुणे रस्त्यावर यवतजवळ झालेल्या अपघातात दिलीप तोरडमल ठार झाले, तर शरद तोरडमल, त्यांची पत्नी व मुलगा गंभीर जखमी झाले होते. ही माहिती समजताच येथे शोककळा पसरली. तोरडमल प्रगतशील शेतकरी, नामवंत पहेलवान म्हणून परिचित होते.

११ हजारांचे मद्य तीन छाप्यांत जप्त
नगर, २२ एप्रिल/प्रतिनिधी

गुन्हे शाखेच्या पथकाने नगर परिसरात तीन ठिकाणी छापे घालून ११ हजार २४५ रुपयांचे देशी-विदेशी मद्य जप्त केले. वडगाव गुप्ता शिवारात छापा टाकून प्रकाश दामू गव्हाणे याच्याकडून ८०५ रुपयांचे मद्य, नगर-औरंगाबाद रस्त्यावरील हॉटेल प्रताप येथून सुनील राजाराम छत्तीशे (रा. दसरेनगर) याच्याजवळील ५ हजार ३०० रुपयांची, तर नगर-औरंगाबाद रस्त्यावरील हॉटेल न्यू संदीप येथे छापा घालून पुरुषोत्तम देवदास रामनानी (रा. वंजारगल्ली) याच्याजवळील ५ हजार १४० रुपयांचे देशी-विदेशी मद्य जप्त करून या तिघांना अटक करण्यात आली. गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक राजपूत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.

पुणतांब्याला आज भैरवनाथांची यात्रा
राहाता, २२ एप्रिल/वार्ताहर

पुणतांबे येथील जागृत देवस्थान श्रीकालभैरवनाथ महाराजांची उद्या (गुरुवारी) यात्रा भरणार असून, यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
पुणतांबे व परिसरात कालभैरवनाथांचे जागृत देवस्थान आहे. शेकडो वर्षांपूर्वीच्या मंदिराचा दोन वर्षांपूर्वी जीर्णोद्धार झाला. मंदिरात घोडय़ावर स्वार झालेली भैरवनाथांची आकर्षक मूर्ती आहे. जाधवराव घराण्याकडे मंदिराचे पुजारी म्हणून मान असून, चैत्र शुद्ध नवमीपासून यात्रोत्सवास सुरुवात होते. या काळात पुरणगाव, गोंधवणी, न. पा.वाडी, बोकटे येथे जाधवरावबाबांची घोडय़ावर स्वार होऊन काठय़ा, कावडी व डफांच्या गजरात सवारी निघते. यात्रेनिमित्ताने मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रात्री दहा वाजता मुख्य वेशीजवळील हनुमान मंदिरातून भैरवनाथांची स्वारी निघणार आहे. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा भाविक मोठी गर्दी करून स्वारीवर रेवडय़ांची उधळण करतात.

अॅबकस परीक्षेला प्रतिसाद
राहाता, २२ एप्रिल/वार्ताहर
एससीएमएएस अॅबकसतर्फे शिर्डीत आयोजित राज्यस्तरीय परीक्षेला चांगला प्रतिसाद मिळाला. या परीक्षेत राज्यभरातील सहा ते पंधरा वयोगटातील सुमारे दीडशे मुला-मुलींनी सहभाग घेतला. अ‍ॅबकसवर सोप्या पद्धतीने गणिते शिकवली जातात. कोटय़वधींची आकडेमोड क्षणार्धात करता येते. अॅबकसचे प्रशिक्षण घेतलेली मुले कॅल्क्युलेटर व कॉम्प्युटरपेक्षा जलद आकडेमोड करू शकतात. तसेच मुलांच्या बुद्धिमत्तेत वाढ होते. दोन्ही बाजूंचा मेंदू कार्यरत होतो म्हणून या कोर्सला ‘ब्रेन डेव्हलपमेंट ऑफ युवर चाईल्ड’ असेही संबोधले जाते, असे अॅबकसच्या संचालिका सुजाता हलवाई यांनी सांगितले.
येथील साईबाबा आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११ ते १२ या वेळेत मुलांच्या परीक्षा घेण्यात आल्या, तर १२ ते ४ या वेळेत मुलांनी अॅक्टिव्हीटीज सादर केल्या.शेवटी जवाध व डॉ. राठी यांच्या हस्ते पैकीच्या पैकी गुण मिळविणाऱ्या मुलांचा पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला.