Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९

पाण्याचा ठणठणाट
उन्हाळी पिकांनाही फटका!

नागपूर, २२ एप्रिल / प्रतिनिधी

कमी प्रमाणात पडलेल्या पाऊसामुळे यावर्षी नदी, नाले व धरणे कोरडे पडले आहेत. यामुळे नागपूर विभागात उन्हाळी पिके घेण्याचे प्रमाण एकदम घसरल्याचे दिसून येते. यावर्षी नागपूर विभागात सरासरीपेक्षा फक्त ६० टक्केच उन्हाळी पेरणी झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालावरून दिसून येत आहे. पेरणीच कमी असल्याने उन्हाळी उत्पादनही कमी होणार, हे यानिमित्ताने स्पष्ट होत आहे.

प्रशासनापुढे पेच, पाणी शेतीला की पिण्यासाठी
नागपूर, २२ एप्रिल / प्रतिनिधी

धरणात असलेल्या पाण्याच्या साठय़ातून शेतीला पाणी द्यावे की पिण्याच्या पाण्याची मागणी पूर्ण करावी, असा पेच प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. विभागात असलेल्या १४ मोठय़ा प्रकल्पात २,४५५ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा आहे. गेल्या आठवडय़ातील २१० द.ल.घ.मी. च्या तुलनेत १७ द.ल.घ.मी. पाणीसाठा कमी झाला आहे. अद्याप मे महिन्यातील उकाडा सुरू व्हायचा आहे. त्यामुळे हा पाणीसाठा आणखी कमी होईल. विभागात असलेल्या नद्यांच्या पाण्याची पातळी ओसरली असून, काही ठिकाणी केवळ रेतीच दिसते.

दोन हजाराची लाच घेणाऱ्या वरिष्ठ अभियंत्याला पकडले
नागपूर, २२ एप्रिल / प्रतिनिधी

एका सहायकाकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अभियंत्याला ‘सीबीआय’च्या पथकाने बुधवारी दुपारी पकडले. ही कारवाई करताना ‘सीबीआय’च्या पथकाशी अभियंत्याने चांगलीच झटापट केली. संदेश शर्मा (रा. नंदनवन) हे आरोपीचे नाव असून तो दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळात वरिष्ठ मंडळ अभियंता आहे. अविनाश नारनवरे हा त्याच्या कार्यालयात हेल्पर आहे. तो या महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात आजारपणाच्या (सिक) रजेवर होता. ही रजा मंजूर करावी, असा अर्ज त्याने संदेश शर्मा याच्याकडे दिला.

साडेपाच हजार कर्मचाऱ्यांचे पोस्टल बॅलेटद्वारे मतदान
नागपूर, २२ एप्रिल/प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यात नागपूर आणि रामटेक जिल्ह्य़ात सर्वसाधारण मतदानात लक्षणीय घट झाली असली, तरी यंदा पोस्टल बॅलेटचे प्रमाण वाढले आहे. सैन्यदलात विविध ठिकाणी कर्तव्य बजावणारे आणि निवडणूक कर्तव्यावर असलेले सुमारे साडेपाच हजार कर्मचारी पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पोस्टल बॅलेटद्वारे १६ मे रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत येणाऱ्या मतदानाचा मतमोजणीच्या वेळी विचार करण्यात येणार आहे.

‘समस्या सोडवल्याशिवाय देशाचा विकास अशक्य’
नागपूर, २२ एप्रिल / प्रतिनिधी

अशिक्षितपणा, जातीयवाद देशाच्या प्रगतीसाठी मोठे अडथळे आहेत. या समस्या सोडवल्याशिवाय देशाचा विकास होऊ शकणार नाही, असे प्रतिपादन विभागीय माहिती संचालक बी.एम. कौसल यांनी येथे केले. जनसंपर्क सोसायटीच्यावतीने हॉटेल व्हीआयटीएसच्या सभागृहात आयोजित समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जनसंपर्क दिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वेस्टर्न कोल्डफिल्डस् लिमिटेडचे कार्मिक निदेशक ओमप्रकाश मोगलानी मुख्य वक्ते होते. ओमप्रकाश मोगलानी म्हणाले, जनसंपर्क मीडियाचा महत्वपूर्ण भाग आहे. यास लोकशाहीचा पाचवा स्तंभ बनवायला हवा. देशाच्या विकासासाठी हा स्तंभ मोठा आधार होऊ शकतो. त्यांनीही देशाच्या विकासासाठी प्रयत्न करावे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘जन-जन के संपर्क बढानेवाले हम, आशाओं के किरण जगानेवाले हम..’ हे गीत सादर करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष सत्येंद्र प्रताप सिंग यांनी प्रास्ताविक केले. नरेश मेश्राम, एल.के. असरानी, धनवटे, प्रदीप कोकास, देशपांडे यांनी पाहुण्यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालन अतुल त्रिवेदी तर आभार प्रदर्शन एम.बी. दुरुगकर यांनी केले.

नृसिंह नवरात्रीनिमित्त धार्मिक कार्यक्रम
नागपूर, २२ एप्रिल/ प्रतिनिधी

श्री नृसिंह नवरात्रीनिमित्त येत्या रविवारी, २६ तारखेला धरमपेठेतील सुगंध सभागृह येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता ‘मूलस्थानाचा ध्यास’ या विषयावर पुण्याचे अनंत जगन्नाथ जोशी यांचे व्याख्यान होईल. पाकिस्तानात असलेल्या नृसिंह स्तंभाच्या दर्शनासाठी केलेल्या प्रवासाचे सचित्र वृत्त ते सांगतील. सायंकाळी साडेसात वाजता आशा पांडे लिखित ‘गीत नरहरी’ पुस्तकारातील नरसिंहावतारावर आधारित गीतांचे गायन होईल. डॉ. दत्ता हरकरे, मनीषा अंदुलकर व चमू ही गीते सादर करतील. या कार्यक्रमाला भाविकांनी उपस्थित राहावे अशी विनंती धरमपेठच्या ज्येष्ठ नागरिक मंडळाने केले आहे. अधिक माहितीसाठी ६५७४२३४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.

आंबेडकर विशेषांकावर शनिवारी चर्चासत्र
नागपूर, २२ एप्रिल / प्रतिनिधी

आकांक्षा मासिक, प्रगतिशिल लेखक संघ व समाजप्रबोधन वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आकांक्षा प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेषांकावर २५ एप्रिलला चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या समस्यांना वाहिलेल्या या मासिकाच्या संपादक अरुणा सबाने आहेत. बॅनर्जी ले आऊटमधील समाजप्रबोधन सार्वजानिक वाचनालयात सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या या चर्चासत्रात प्रा. रमेश शंभरकर, प्रा. अनिल नितनवरे, स्नेहल रामटेके विचार व्यक्त करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीपाद भालचंद्र जोशी राहतील. या कार्यक्रमाला साहित्यिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रा. वामन निंबाळकर व प्रसन्नजित गायकवाड यांनी केले आहे.

अर्जुन बौद्ध विहारात आंबेडकरांचा पुतळा
नागपूर, २२ एप्रिल / प्रतिनिधी

अखिल भारतीय सामाजिक संघर्ष समितीतर्फे मानवतानगरातील गिट्टीखदान अर्जुन बौद्ध विहारात भदन्त सुमेधसिरिवन्नो यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आबंडेकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी युवा नेते सलील देशमुख, हरीष ग्वालबंशी, विकास ठाकरे, राजू लोखंडे, कमलेश चौधरी, दीपक वानखेडे, मुकुंद पाटील, डॉ. प्रकाश रणदिवे, आलोक पांडे, कृष्णा बरडे, वासुदेव भांगे उपस्थित होते. यावेळी गिट्टीखदान, बोरगाव, काटोल रोड या मार्गाने मिरवणूक काढण्यात आली. समितीच्या शहर अध्यक्ष करुणा घरडे व देवानंद नितनवरे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोहिणी दुपारे, चंद्रकला पाटील, नर्मदा ढोके, मंजुषा पाटील, कमल बागडे यांनी परिश्रम घेतले.

पेंच प्रकल्पाचे पाणी वैनगंगेच्या पात्रातून भंडाऱ्यात
भंडारा, २२ एप्रिल / वार्ताहर

भंडारा शहर तसेच जवाहरनगर आर्डनन्स फॅक्टरीला उद्भवलेल्या भीषण पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पेंच प्रकल्पाचे पाणी वैनगंगेतून भंडाऱ्यापर्यंत आणले जात आहे. याकरिता जिल्हाधिकारी संभाजीराव सरकुंडे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एम. आपटे यांच्याकडे नगराध्यक्ष महेन्द्र गडकरी आणि मुख्याधिकारी एन.एम. मेश्राम यांनी मागणी लावून धरल्यामुळे पेंच प्रकल्पाच्या पाण्याचे आरक्षण न करताही पाणी सोडले गेले. ११ एप्रिलला पेंच प्रकल्पातून सोडलेले पाणी खिंडसी जलाशयात तेथून कालव्याने सूर नदीत येऊन ४८ किलोमीटरचा प्रवास करीत सोमवारी सायंकाळी भंडारा येते कार्धा पुलाजवळ पोहोचले. हे पाणी १५ दिवस सोडले जाईल. दररोज ५०० घन लिटर पाणी सध्या येथे पोहोचत आहे. अंदाजाप्रमाणे ७५ दिवस पुरेल इतका हा पाणीसाठा आहे. या पाण्यामुळे सूर, वैनगंगेच्या काठावरील गावांनाही लाभ झाला. मार्गातील खिंडसी, शिरपूर, मसला, चोखाळा, अरोली, कोदामेढी, मोहगाव देवी, बोथली, पांजरा, सुरेवाडा, मोहाडी आणि करचखेडा या गावांना काही प्रमाणात पाणी मिळाले. नगरपालिकेला या पाण्यासाठी १० ते १२ लाख रुपये खर्च येणार आहे. इतके करूनही दररोज १२ लक्ष लिटर पाणी शहराला कमी मिळणार आहे. उन्हाळ्याची तहान भागविण्याची क्षमता पालिकेने साध्य केली असे म्हणता येईल.

उमरेडकर, लोहनकरांना आरमोरीकरांकडून मदत
नागपूर, २२ एप्रिल / प्रतिनिधी

जगन्नाथ उमरेडकर यांना अंधत्व आल्यामुळे व हिरामन लोहनकर अपघातात जखमी झाल्यामुळे सावजी फुल भंडारचे मालक व समाजसेवक राजेंद्र आरमोरीकर यांनी त्यांना प्रत्येकी ५०१ रुपयांची मदत केली. भांडेवाडीतील शारदा चौक हलबीपुऱ्यात राहणारे जगन्नाथ उमरेडकर यांना अंधत्व आल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. तसेच भांडेवाडी परिसरातील हिरामन लोहनकर काही दिवसांपूर्वी अपघातात जखमी झाले. या दोघांनाही भांडेवाडीतील छम्मी कचरू शेख यांच्या हस्ते प्रत्येकी ५०१ रुपयांची मदत दिल्याचे आरमोरीकरांनी पत्रकाद्वारे कळवले आहे. कार्यक्रमाला नारायण सारडा, सुरेश पराते, कमलाकर देवीकर, सहादेव हेडाऊ, बालाजी वाकोडीकर, राजेंद्र बावणे, पवन जनबंधू, बाळकृष्ण आदी उपस्थित होते.

सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसानिमित्त उद्या रक्तदान शिबीर
नागपूर, २२ एप्रिल/ प्रतिनिधी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसानिमित्त २४ एप्रिलला तेंडुलकर स्पोर्टस् क्लबच्यावतीने भांडे प्लॉट चौकातील मुखर्जी रुग्णालयात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवारी तेंडुलकरचा ३६ वा जन्मदिवस आहे. शिबिरात लाईफलाईन ब्लड बँकेचे विशेष सहकार्य राहील. संस्थेचे अध्यक्ष नरेश वाघमोडे, कार्याध्यक्ष अरुप मुखर्जी, सचिव बाबुराव निंबाळकर, नरेंद्र सतीजा शिबिराची तयारीकरीत आहे. शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता शिबिराला सुरुवात होईल. सकाळी ११ वाजता रक्तदाता सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सचिनचा जन्मदिवस थाटात साजरा करण्यात येईल. माजी क्रिकेटपटू प्रशांत वैद्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

डॉ. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक व भोजनदान
नागपूर, २२ एप्रिल / प्रतिनिधी

भारतीय बौद्ध महासभा पंचकमेटी, सम्यक युवक मंडळ आणि धम्म ज्योती महिला मंडळातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ११८ जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. योगेंद्र कवाडे यांनी ध्वजारोहण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी प्रमुख पाहुणे महेंद्र बोकाडे, राजू वैद्य, गणपत राऊत, माधुरी भिवगडे उपस्थित होते. शेषनगर येथे बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अभिवादन मिरवणूक व भोजनदान करण्यात आले. यावेळी यशवंतराव बोरकर व न्हावी समाज संघटनेचे अध्यक्ष अशोक जांभुळकर, संघटनेचे सचिव अनिल नक्षणे, सरचिटणीस चंद्रशेखर फुलबांधे, मुख्याध्यापक वासुदेव राऊत आणि इतर उपस्थित होते. प्रास्ताविक यशवंत बोरकर यांनी केले. आभार शेषराव पापडकर यांनी मानले. रेखरज मेश्राम, ज्योती मेश्राम, कमल गजभिये, दिनेश तंत्रपाळे, हिरामण शेंडे, सुदाम बागडे आदी त्यावेळी उपस्थित होते.

धनादेश वाटपात अफरातफर;दोन प्रकल्प अधिकारी बडतर्फ
नागपूर, २२ एप्रिल / प्रतिनिधी

धनादेश वाटपात अफरातफर केल्याप्रकरणी महसूल विभागातील दोन प्रकल्प अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी प्रवीण दराडे यांनी बडतर्फ केले. अचानक झालेल्या या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. शेखर गुल्हाणे व बी.डब्लू. पूरणभट, अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत. नगरपरिषदांना विविध विकासकामांसाठी देण्यात येणाऱ्या निधीच्या धनादेशात अफरातफर केल्याचा या दोघांवर आरोप आहे. पूरणभट मौदा येथे प्रकल्प अधिकारी असताना सामान्य निधीमध्ये त्यांनी गैरव्यवहार केल्याची माहिती पुढे आली आहे. महसूल विभागात बोगस बिल काढणारे रॅकेट कार्यरत असून यात बडय़ा पदावरील काही अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. नगर परिषदांना शासनाकडून विकासकामासाठी निधी दिला जातो. निधीचे धनादेश देताना प्रकल्प अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची शहानिशा केली जाते. अनेकदा यात बोगस कामांचाही समावेश असतो. दलाल व अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा व्यवहार सुरू असतो. बिल काढताना कमिशन मिळत असल्याने अधिकारी कागदपत्रांची शहानिशा न करता धनादेश वाटप करतात. यातूनच हा प्रकार घडला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पोलीस असल्याचे सांगून दांपत्याला ३५ हजाराने लुटले
नागपूर, २२ एप्रिल / प्रतिनिधी

पोलीस असल्याचे सांगून दोघा लुटारूंनी एका दांपत्याला लुटल्याची घटना ईश्वर देशमुख कॉलेज ते विमा रुग्णालयादरम्यान राष्ट्रीय विद्यालयासमोर मंगळवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली. अजाबराव सदाशिव वानखेडे (रा. भीमनगर, अजनी) हे त्यांच्या पत्नीसह महात्मा फुले सभागृहात भाच्याच्या लग्नाला गेले होते. तेथून पायी घरी जात असताना दोघेजण त्यांच्याजवळ आले. पोलीस असल्याची बतावणी करून त्यांनी ४५ ग्रॅम सोने (किंमत ३५ हजार रुपये) घेऊन पळून गेले. सक्करदरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.