Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

पाण्याचा ठणठणाट
उन्हाळी पिकांनाही फटका!
नागपूर, २२ एप्रिल / प्रतिनिधी

कमी प्रमाणात पडलेल्या पाऊसामुळे यावर्षी नदी, नाले व धरणे कोरडे पडले आहेत. यामुळे नागपूर विभागात उन्हाळी पिके घेण्याचे प्रमाण एकदम घसरल्याचे दिसून येते. यावर्षी नागपूर विभागात सरासरीपेक्षा फक्त ६० टक्केच उन्हाळी पेरणी झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालावरून दिसून येत आहे. पेरणीच कमी असल्याने उन्हाळी उत्पादनही कमी होणार, हे

 

यानिमित्ताने स्पष्ट होत आहे.
नागपूर विभागात उन्हाळी भाताचे सर्वसाधारण क्षेत्र ९७०० हेक्टर असून त्यापैकी फक्त ५९०० हेक्टरवर फक्त ६१ टक्के पेरणी झाली आहे. गेल्यावर्षी हे प्रमाण ९० टक्क्यांच्या वर होते. विभागात उन्हाळी भाताचे पिक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. यावर्षी फक्त ६१ टक्केच उन्हाळी भाताची पेरणी झाल्याने शेतकऱ्यांवरील संकट आणखी गडद होण्याची चिन्हे दिसत आहेत.
नागपूर जिल्ह्य़ात उन्हाळी भाताचे एकूण ५०० हेक्टरवर पीक घेतले जाते. पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे यंदा एका हेक्टरवरही उन्हाळी भाताची पेरणी झालेली नाही. भंडारा जिल्ह्य़ात उन्हाळी भाताचे क्षेत्र ३२०० हेक्टर असून त्यापैकी फक्त २००० हेक्टरवर पेरणी झाली असून याचे प्रमाण ६३ टक्के एवढे आहे. गोंदिया जिल्ह्य़ात ४४ टक्के तर गडचिरोली जिल्ह्य़ात ७४ टक्के भाताची पेरणी झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्य़ात हे प्रमाण १४३ टक्के एवढे आहे. या जिल्ह्य़ात सर्वसाधारण पेरणी क्षेत्र ७०० हेक्टर असून १ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. या जिल्ह्य़ात सरासरीपेक्षी तीनशे हेक्टरवर अधिक पेरणी झालेली दिसून येते.
विभागात उन्हाळी भूईमुगाची पेरणी शंभर टक्के झाल्याचे दिसून येते. यात सर्वाधिक वर्धा जिल्ह्य़ाने बाजी मारली आहे. वर्धा जिल्ह्य़ात उन्हाळी भूईमुगाच्या पेरणीची टक्केवारी ही ११७ एवढी आहे. जिल्ह्य़ात उन्हाळी भूईमुगाचे पेरणी क्षेत्र ६०० हेक्टर असून ७०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. नागपूर जिल्ह्य़ात हे प्रमाण पन्नास टक्के एवढे आहे. नागपूर जिल्ह्य़ात ४०० हेक्टरपैकी फक्त २०० हेक्टरवरच पेरणी झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्य़ातही उन्हाळी भूईमुगाची पेरणी शंभर टक्के झाली आहे. गडचिरोली व गोंदिया जिल्ह्य़ात उन्हाळी भूईमुगाची पेरणीच झाली नाही. विभागातील फक्त भंडारा जिल्ह्य़ातच सूर्यफुलाची पेरणी झाली असली तरी त्याची टक्केवारी फारच कमी आहे. विभागात उन्हाळी सोयाबीन, मका आणि मुगाची पेरणी झालेली नाही.
विभागात उन्हाळी पिकांचे सरासरी पेरणी योग्य क्षेत्र ११ हजार हेक्टर असून त्यापैकी फक्त ७ हजार २०० हेक्टरवर पेरणी झालेली दिसून येते. उन्हाळी पिकाची पेरणी नागपूर जिल्ह्य़ात फारच कमी झाली आहे. यावर्षी पेंच जलाशयातून पाणी न भेटल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकाची पेरणी केली नाही.
नागपूर जिल्ह्य़ाची टक्केवारी फक्त २० एवढी आहे. ६० टक्के पेरणी झाली असली तरी त्याला योग्य पाणी मिळेल काय? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. उन्हाळी पिकांना पाणी मिळाले नाही तर शेकडो हेक्टरवरील पीक नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यावर्षी गुरांच्या वैरणीचा प्रश्नही बिकट बनला आहे. यामुळे शेतकरी त्यांच्याजवळची गुरे कमी दराने विकत असल्याचे चित्र बाजारात दिसून येत आहे. येते दीड ते दोन महिने सर्वानाच कठीण जाणार आहे.