Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

दोन हजाराची लाच घेणाऱ्या वरिष्ठ अभियंत्याला पकडले
नागपूर, २२ एप्रिल / प्रतिनिधी

एका सहायकाकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अभियंत्याला ‘सीबीआय’च्या पथकाने बुधवारी दुपारी पकडले. ही कारवाई करताना

 

‘सीबीआय’च्या पथकाशी अभियंत्याने चांगलीच झटापट केली.
संदेश शर्मा (रा. नंदनवन) हे आरोपीचे नाव असून तो दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळात वरिष्ठ मंडळ अभियंता आहे. अविनाश नारनवरे हा त्याच्या कार्यालयात हेल्पर आहे. तो या महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात आजारपणाच्या (सिक) रजेवर होता. ही रजा मंजूर करावी, असा अर्ज त्याने संदेश शर्मा याच्याकडे दिला. हा अर्ज मंजूर करण्यासाठी शर्माने दोन हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार अविनाश नारनवरे याने ‘सीबीआय’ कार्यालयात केली. ‘सीबीआय’चे अधीक्षक जॉन थॉमस यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. एस. पाटील, राजविक्रम ऋषी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बुधवारी दुपारी रेल्वे स्थानकावरील दोन क्रमांकाच्या फलाटावर असलेल्या संदेश शर्मा याच्या कॅबीन परिसरात सापळा रचला. अविनाश नारनवरे कॅबीनमध्ये गेला असता संदेशने तेथे रक्कम स्वीकारली नाही. नारनवरेला घेऊन तो रेल्वे स्थानकाबाहेर पार्सल कार्यालयाजवळ आला. मोटारसायकल काढली. ती सुरू करून त्याने नारनवरेकडून रक्कम घेतली व खिशात ठेवत तो वेगात निघून गेला.
‘सीबीआय’चे पथक त्याच्याजवळ पोहोचू शकले नाही. नंदनवनमधील संदेश शर्माच्या बंगल्यासमोर तैनात असलेल्या शिपायाला लगेचच हे कळवून काही कर्मचारी त्याच्या मागोमाग निघाले. संदेश शर्मा दुपारी दोन वाजता जयपूर कोईंमतूर एक्स्प्रेसने तिरुपतीला जाणार असल्याचे समजल्याने या पथकाने घाई केली नाही. संदेश शर्मा दुपारी दोन वाजता त्याच्या कुटुंबासह दोन क्रमांकाच्या फलाटावर आला असता ‘सीबीआय’च्या पथकाने लगेचच त्याला पकडले आणि झडती सुरू केली. या प्रकाराने संदेश हादरला. त्याने ‘सीबीआय’च्या पथकाशी झटापट केली. ‘सीबीआय’च्या अधिकाऱ्यांनी ओळख सांगूनही संदेश शर्माने त्यांना जुमानले नाही. रक्कम घेतलीच नाही, असे म्हणत त्याने पुन्हा झटापट केली. यामुळे दोन क्रमांकाच्या फलाटावर गोंधळ उडाला. या प्रकाराने त्याचे कुटुंबीयही हादरले. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांच्या मदतीने त्याला घट्ट पकडून रेल्वे पोलीस ठाण्यात आणण्यात आले. आपण रक्कम घेतलेली नाही, फसवले जात असल्याचा आरोप तो करीत होता. त्याच्याजवळ लाचेची रक्कम न सापडल्याने ‘सीबीआय’च्या पथकाने त्याच्या नंदनवनमधील बंगल्याची झडती घेतली. सायंकाळी सात वाजताच्या सुमारास त्याच्या घरी लाचेची रक्कम सापडली, असे ‘सीबीआय’चे पोलीस निरीक्षक राजविक्रम ऋषी यांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या ठाण्यात पत्रकारांना सांगितले. राजविक्रम ऋषी यांच्या तक्रारीवरून रेल्वे पोलिसांनी आरोपी संदेश शर्माविरुद्ध सरकारी कामात अडथळा व सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याबद्दल गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे दोन क्रमांकाच्या फलाटावर काहीवेळ गोंधळ उडाला होता.