Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

साडेपाच हजार कर्मचाऱ्यांचे पोस्टल बॅलेटद्वारे मतदान
नागपूर, २२ एप्रिल/प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यात नागपूर आणि रामटेक जिल्ह्य़ात सर्वसाधारण मतदानात लक्षणीय घट झाली असली, तरी यंदा पोस्टल बॅलेटचे प्रमाण वाढले आहे. सैन्यदलात विविध

 

ठिकाणी कर्तव्य बजावणारे आणि निवडणूक कर्तव्यावर असलेले सुमारे साडेपाच हजार कर्मचारी पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पोस्टल बॅलेटद्वारे १६ मे रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत येणाऱ्या मतदानाचा मतमोजणीच्या वेळी विचार करण्यात येणार आहे.
निवडणूक कर्तव्य आणि सैन्यदलात कर्तव्य बजावत असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाची व्यवस्था करण्यात येते. यंदाही निवडणूक आयोगाने पोस्टल बॅलेटची सोय केल्याने अनेक कर्मचाऱ्यांना मतदान करता आले. नागपूर आणि रामटेक जिल्ह्य़ात विधानसभेच्या एकूण १२ मतदारसंघातील सुमारे साडेपाच हजार कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा प्रशासनाने महिनाभर आधी पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्यास इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांना फॉर्म क्रमांक १२ देऊन त्याद्वारे त्यांची नोंदणी करून घेतली. यंदा निवडणूक कर्तव्यावर सुमारे २० हजार कर्मचारी होते. त्यातील सर्वच कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या पहिल्या प्रशिक्षण शिबिरात हा फॉर्म देण्यात आला होता. मात्र, अनेक कर्मचाऱ्यांनी वेळेत अर्ज न दिल्याने यंदा नागपूर आणि रामटेक मतदारसंघात २ हजार ९८९ कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा हक्क बजावता आला. नागपूर लोकसभा मतदारसंघात दक्षिण पश्चिम विभागात ३०१, दक्षिणमध्ये ४८१, पूर्व १४३, मध्य १२१, पश्चिम ४५६, उत्तर २५६ अशा एकूण १७९३ कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेट देण्यात आले होते. रामटेकमधून काटोल येथील ३७५, सावनेर ४०८, हिंगणा ८७, उमरेड १६०, कामठी ५२, रामटेक ११४ असे एकूण ११९६ बॅलेट देण्यात आले. गेल्यावर्षीपेक्षा यंदा यामध्ये वाढ झाली आहे.
सैन्यदलात विविध ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या सुमारे अडीच हजार मतदात्यांना पोस्टल बॅलेट देण्यात आले. यात नागपूर मतदारसंघात १ हजार १५८ तर रामटेकमध्ये १ हजार ३९८ मतदात्यांनी या प्रक्रियेद्वारे मतदान केले. सैन्यदलातील अशा सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेट पाठविण्यात आले. यातील अनेक अधिकाऱ्यांना इराक, इराण येथेही मतपत्रिका पाठविण्यात आल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी अविनाश कातडे यांनी दिली.