Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

साखळी खेचून प्रवाशांना लुटले!
नागपूर, २२ एप्रिल/ प्रतिनिधी

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशाच्या सीमेवरील आमला सेक्शनमध्ये गेल्या दोन दिवसांपासून रेल्वे थांबवून लुटण्याच्या घटना घडत आहेत. घोराडोंगरी रेल्वे स्थानकाजवळ आज आणि बैतुल रेल्वे स्थानकाजवळ काल रात्रीच्या सुमारास रेल्वेची साखळी खेचून खिडकीतून पर्स पळवल्या

 

गेल्या.
भिलाईचा रहिवासी असलेला हेमंतपुरी गोस्वामी (२५) हा युवक बहिणीसह समता एक्सप्रेसने दुर्गला चालला होता. हेमंतपुरी दिल्लीला बहिणीसह गाडीत बसला. रात्री साडे अकराच्या सुमारास गाडी बैतुल रेल्वे स्थानकाहून निघाली. काही मिनिटे होत नाही तोच गाडीची साखळी खेचली गेली. गाडी थांबताच तीन-चार अनोळखी इसमांनी स्लिपर क्लासमध्ये बसलेल्या हेमंतपुरीच्या बहिणीची क्रिम रंगाची ‘पर्स’ पळवली. त्यावेळी ती झोपेत होती. चोरटे खिडकीजवळ एकाचवेळी जमा झाले. अंधार असल्याने प्रवाशांना त्यांचे चेहेरे दिसले नाही. या महिलेचे पती लष्करात असून तिच्या पर्समधून ‘आर्मी स्मार्ट कार्ड’देखील चोरीला गेले. चोरटय़ांनी सोन्याचे मंगळसूत्र, दोन मोबाईल सेट, एटीएम कार्ड असा २३ हजार ५५० रुपयांचा ऐवजही लंपास केला.
आमला सेक्शनमधील दुसऱ्या एका घटनेत मध्य प्रदेशच्या देवास येथील रहिवासी सुजाता रंगारी यांना चोरटय़ांनी लुटले. सुजाता रंगारी ६३२३- अहिल्यानगरी एक्सप्रेसने स्लिपर क्लासमधून इटारसीहून कोलापथ्थरला जात होत्या. कालाआखर ते घोराडोंगरी रेल्वे स्थानकादरम्यान गाडीची साखळी खेचली गेली. गाडी थांबताच दोन इसमांनी खिडकीतून २७ हजार रुपयांचा ऐवज पळवला. त्यात सोन्याचे मंगळसूत्र, दोन मोबाईल सेट, १३ हजार रुपये रोख असे सामान आहे. नागपूर लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल केला.