Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘ग्रीन जनरेशन’ घडवताना..सोनाली कोलारकर- सोनार
२२ एप्रिल २०१०! बरोबर वर्षभरानंतर ‘वसुंधरा दिवस’ चाळीशीत पदार्पण करणार आहे. २२ एप्रिल १९७० साली उद्विग्न मनाने युनायटेड नेशन्सने पाणी, प्रदूषण याविषयी जागतिक पातळीवर

 

कोणीच गांभीर्याने काही खबरदारी, उपाययोजना करत नाही म्हणून वसुंधरा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. ही जनजागृती मोहीम होती परंतु, निव्वळ भाषणबाजी व पोस्टर्स लावून साजरा करण्याचा हा दिवस ठेवायचा नाही, याची मनाशी खूणगाठही बांधण्यात आली होती. प्रामाणिकपणे प्रदूषण कमी करण्याचे प्रयत्न संशोधनात्मक पातळीवरही व्हावेत, यासाठी केलेली ती मुहूर्तमेढही होती आणि याच प्रयत्नातून मग १९७२ साली युनायटेड नेशन्स एन्व्हिरॉन्मेंटल प्रोग्राम (यूएनईपी) ची स्थापना झाली. जागतिक पर्यावरण दिवस (५ जून) आणि वसुंधरा दिवस (२२ एप्रिल) हे दोन ‘पृथ्वी बचाव, पर्यावरण बचाव’ कार्यक्रम किंबहुना मोहीम राबवण्याचे, आखण्याचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्याच्या काटेकोर अंमलबजावणीला सुरुवात करण्याचे दिवस म्हणून जाहीर करण्यात आले.
कालचा वसुंधरा दिवस हा असाच प्रामाणिक प्रयत्नांची मुहूर्तमेढ करण्याचा होता. काल अनेक संशोधक व संघटनांनी प्रदूषण मुक्तीसाठी काय प्रयत्न करता येऊ शकतील, याचे विचारमंथन केले. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, प्रत्यक्षात त्या उपाययोजना जागतिक पातळीवर सादर केल्या. ‘यूएनईपी’ने यावर्षी ‘ग्रीन जनरेशन’ ही थीम (मध्यवर्ती संकल्पना) ठेवली आहे. २०१० ची ही तयारी आहे. २०१०, २२ एप्रिलपासून जगात प्रदूषण मुक्तीचे सामान्यजनांपर्यंत अनेक उपाय उपलब्ध झाले असतील. यासाठी २००९ सालापासून प्रयत्न करायला हवेत. नवी पिढी ही हिरवाईप्रेमी व्हायला हवी. तिने चुकांची पुनरावृत्ती होणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष देऊन मागील पिढी, नवी पिढी आणि येणारी पिढी अशा सगळ्यांनाच हिरवाईच्या गारव्यात लपेटण्याचा चंग बांधला पाहिजे. त्यासाठी शाळांपासून ऑफिसेस्पर्यंत ते निवासस्थानापर्यंत सर्वत्र हिरवाई जपण्याचे उपाय योजले पाहिजेत. यूएनईपी वसुंधरेची चाळीशी मोठय़ा उत्साहात साजरी करणार आहे आणि म्हणूनच उपाय योजले पाहिजेत म्हणजे नेमके काय, याचे प्रशिक्षणच देण्यात येणार आहे. ग्रीन स्कूल्स, ग्रीन एज्युकेशन, सकट ग्रीन टेक्नोलॉजी हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा इथे मांडण्यात आला आहे.
‘ग्रीन जनरेशन’ तयार करताना यूएनईपीने त्यांच्या साईटवर इंधन बचत करणाऱ्या दहा सर्वात उत्तम कार्सची माहिती दिली आहे, क्लिन कार टेक्नोलॉजी वापरण्याचे तंत्र सांगितले आहे. अशा आठ नवीन तंत्रज्ञानाची यादीच दिली आहे. इंधन बचतीद्वारा ‘ग्रीन लिव्हिंग’, रोजचे राहणीमान बदलण्याचे मार्ग सांगितले आहेत आणि याशिवाय या वर्षभरात सामान्यातल्या सामान्यांपासून उच्चस्तरीय संशोधकांपर्यंत सर्वाना आवाहन करण्यात आले आहे की, खरोखरच व्यावसायिक पातळीवर, प्रत्यक्ष जीवन जगताना प्रदूषण कमी करण्याचे प्रभावी उपाय तसेच, तंत्रज्ञान आणि संशोधन जगासमोर मांडायचे आहेत. नवीन ग्रीन टेक्नोलॉजीज् तातडीने शोधायला यूएनईपी मदत करणार आहे. ग्रीन जनरेशन ही अशी तयार होणार आहे. जनमनातून खरोखरच हिरवाई टिकवण्यासाठी आणि प्रदूषण मुक्तीसाठी तातडीने पावले उचलण्यासाठी जागतिक पातळीवर सुरुवात व्हावी म्हणून कालचा २२ एप्रिल हा फार महत्त्वाचा दिवस होता. आजवर प्रदूषण मुक्तीचे प्रयत्न भरपूर झाले परंतु, अजूनही म्हणावे तसे ठोस उपाय सापडलेले नाहीत. काहींची अंमलबजावणी झाली नाही. परिणाम सगळेच भोगत आहेत. अवकाळी पाऊस, प्रचंड तापमान बदल, भयंकर उन्हाळा या सर्वाचा सामना भयावह चित्र निर्माण करणारा आहे. पर्यावरण, पृथ्वी रक्षण हे भाषणांचे विषय न राहता खरोखरच तसे तंत्रज्ञान आणि जनजागृती निर्माण होण्याची गरज यूएनईपीने कळकळीने मांडली आहे. वसुंधरेला आणि पर्यायाने मानव जातीला वाचवणे याच पिढीच्या हाती आहे. म्हणूनच ‘ग्रीन जनरेशन’ ही मोहीम महत्त्वाची आहे. \www.earthday.net या साईटला भेट देऊन या मोहिमेत सगळेच ‘जीवनप्रेमी’ सहभागी होऊ शकतात. मोहिमेला नुकतीच सुरुवात झालीय! गो ग्रीन.!