Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

नळ कोरडे, रस्ते अंधारात
नागपूर, २२ एप्रिल/ प्रतिनिधी

गेल्या एक महिन्यापासून नगरसेवकांसह अधिकारीही निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने दुर्लक्षित राहिलेल्या वीज आणि पाण्याच्या समस्येने आता तोंड वर काढले आहे. सीमावर्ती भागासह मध्यवस्तीतही न होणारा पाणी पुरवठा आणि बंद असलेल्या पथदिव्यांमुळे नागरिक

 

त्रस्त झाले आहे.
खरे तर फेब्रुवारी महिन्याच्या शेवटीच शहरातील पाणी टंचाईने तोंड वर काढले होते. कधी जलशुद्धीकरण केंद्रात नवी यंत्रे लावण्याच्या कारणावरून तर कधी कन्हान नदी आटल्याचे कारण देऊन महापालिकेने दोन -दोन दिवस पाणी पुरवठा बंद ठेवला. मात्र याच काळात निवडणुकीच्या हंगामाला सुरुवात झाल्याने प्रशासन आणि नगरसेवकांनीही पाणी टंचाईकडे दुर्लक्ष केले. मध्य, पूर्व आणि उत्तर नागपुरात सध्या भीषण पाणी टंचाई आहे. या भागाला पाणी पुरवठा करणारी कन्हान नदी आटल्याने पेंच प्रकल्पातील पाणी या वस्त्यांकडे वळते करण्यात येत आहे.
प्रत्येक वॉर्डात टँकरची मागणी सातत्याने वाढतच चालली आहे. धरमपेठ भागात २४ बाय ७ ही योजना प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येत आहे. मात्र तेथेही आवश्यक पाणी पुरवठा होत नसल्याची नागरिकांची बोंब आहे. पश्चिम नागपुरात सध्या एकच वेळ पाणी पुरवठा होत आहे. उत्तर, मध्य आणि पूर्व नागपुरात सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनीच पाण्यासाठी आंदोलने केली. मात्र परिस्थितीत बदल झाला नाही.
कन्हान नदी आटली, पेंचची पातळी कमी झाली असली तरी शहराला आवश्यक असणारा पाणी पुरवठा होत असल्याचा दावा महापालिकेच्याच मासिकात जलप्रदाय विभागाने केला आहे.
गेल्या पाच वर्षांत मोठय़ा प्रमाणात गळती थांबवण्याचे कामही पूर्ण करण्यात आले. जलकुंभावरील पाण्याचा हिशेब कळावा म्हणून फ्लोमीटर्स लावण्यात आली. असे असताना एकूण होणारा पाणी पुरवठा आणि वितरीत होणारे पाणी यातील अंतर अधिक आहे. हे पाणी कुठे जाते हे महापालिकेच्या स्थापनेपासून आजपर्यंत कुणालाही कळले नाही.
चोवीस तास पाणी पुरवठा ही योजना राबवताना पाण्याचा अपव्यय टाळणे हा उद्देश होता, असे प्रशासनाचे म्हणणे असले तरी पिण्याचा वापर झाडे जगवण्यासाठी, अंगणातील लॉन हिरवी ठेवण्यासाठी सुरू आहे. शहरातील एका भागात पिण्याचे पाणी मिळत नाही आणि दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचा असा अपव्यय सुरु आहे. टँकर मालकांची देयके थकल्याने त्यांनी जुनी देणी दिल्याशिवाय टॅंकर देणार नाही, असा इशारा दिला आहे. या पाश्र्वभूमीवर पुढील काळात पाण्यावरून हिंसक आंदोलने होण्याचा धोका वाढला आहे.
पाण्यासोबतच पथदिव्यांचा प्रश्नही गंभीर झाला आहे. शहरातील बाजारपेठा वगळता नागरी वस्त्यांमधील पथदिवे बंद आहेत. प्रमुख रस्तेच नव्हे तर अंतर्गत रस्त्यांवरही अंधार आहे. गरज नसेल अशा ठिकाणी हायमास्ट लावण्यात आले मात्र, अर्धे दिवे बंदच आहेत. ग्रेटनाग रोडचे उदाहरण याबाबत देता येईल. बैद्यनाथ चौकातील हायमास्ट गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहेत. वल्लभभाई पटेल चौकातील स्थिती यापेक्षा वेगळी नाही. कोटय़वधी रुपयांचे पोल कंत्राटदारांनी खरेदी केली. त्याचे शोधनही महापालिकेने केले, मात्र पोल लावण्यातच आले नाही, ते विविध झोन कार्यालयात पडून आहेत.
पोल खरेदीच्या कामात होणाऱ्या कोटय़वधी रुपयांच्या गैरव्यवहारातून महापालिकेची फसवणूक सुरुच आहे. नागपूर येथे तयार होणारे पोल नामांकित कंपन्यांचे वेष्टन लावून चढय़ा दराने महापालिकेला विकले जात आहेत. विद्युत विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि कंत्राटदारांच्या संगनमताने होत असलेला हा गैरव्यवहार गेल्या अनेक वर्षांपासून सुरुच आहे. याचा परिणाम शहरातील विद्युत व्यवस्थेवर झाला आहे. रस्ते गुळगुळीत करण्यात आले मात्र ते आंधारात बुडाले आहेत.
यासंदर्भात महापौर माया इवनाते यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी पाणी टंचाईवर मात करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. पथदिव्यांबाबत नगरसेवकांच्याही तक्रारी आहेत, याकडे लक्ष देण्यास विद्युत विभागाला सांगण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.