Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

आयुर्वेद व आधुनिक शास्त्रात समन्वय हवा -डॉ. बाहेती
नागपूर, २२ एप्रिल / प्रतिनिधी

आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकीय शास्त्र यांचा परस्पर संबंध असून दोन्ही शाखांनी समन्वय ठेवून कार्य करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. मुकुंद बाहेती यांनी

 

केले.
नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनचा (निमा) ६१ वा स्थापना दिन हनुमाननगरातील श्री आयुर्वेद महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाहेती बोलत होते. निमाचे जिल्हा शाखाध्यक्ष डॉ. नाना पोजगे, श्री आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जुमळे, निमाचे केंद्रीय सचिव डॉ. रवींद्र बोथरा, डॉ. सुरेश खंडेलवाल, डॉ. मंगेश भलमे, डॉ. शुभांगी बिजवे, डॉ. भावना भलमे, डॉ. मृण्मयी मासोदकर प्रामुख्याने उपस्थित होत्या. आयुर्वेद हे प्राचीन शास्त्र असून त्याचा उल्लेख वेदातसुद्धा आढळतो. आयुर्वेदातूनच नव्या वैद्यकीय ज्ञानाची निर्मिती झाली याची उदाहरणे देऊन डॉ. बाहेती यांनी आयुर्वेदाची महती सांगितली. आयुर्वेदातील दिनचर्या, ऋतुचर्या, आहार-विहार, योग, पथ्य-अपथ्य, लंघन, पंचकर्म आदींची सविस्तर माहितीही त्यांनी दिली. रुग्णाचा आजार दूर करण्यासाठी आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्राचा वापर करणे आवश्यक आहे. यासाठी समन्वयाची भूमिका ठेवणे गरजेचे असल्याचेही डॉ. बाहेती म्हणाले.
याप्रसंगी डॉ. जुमळे, डॉ. बोथरा, डॉ. भेंडे, डॉ. राठोड यांनीही विचार मांडले. कार्यक्रमास शहरातील दीडशे डॉक्टर्स उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ. शीतल ठोसर यांनी केले. डॉ. मृण्मयी मासोदकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला डॉ. विकास सिरसाट, डॉ. प्रवीण डांगोरे, डॉ. आशीष घोडमारे, डॉ. मधुसुदन गुप्ता, डॉ. दिलीप फाये, डॉ. मोहन येंडे, डॉ. बांडेबुचे, डॉ. फरकसे प्रामुख्याने उपस्थित होते.