Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

यवतमाळ जिल्ह्य़ात भीषण पाणीटंचाई
घोटभर पाण्यासाठी जीवाचे हाल
यवतमाळ, २२ एप्रिल / वार्ताहर

एकीकडे सूर्य आग ओकत असल्यामुळे शरीराची होणारी काहिली आणि दुसरीकडे त्याचवेळी पाण्याच्या थेंबाथेंबासाठी ग्रामीण भागात महिलांना करावी लागणारी पायपीट पाहून कोणाचेही काळीज चर्र व्हावे, अशी भीषण पाणी समस्या सध्या जिल्हा प्रशासनाला आणि जिल्हा परिषदेला

 

अस्वस्थ करीत आहे.
जिल्ह्य़ातील नदी-नाले आटले असून विहिरींची पातळीदेखील खोल गेली आहे. ३०० फूट खोदूनही पाणी लागत नाही म्हणून अनेक ठिकाणी विंधन विहिरी खोदण्याच्या कार्याला खीळ बसली आहे. तशातच केळापूर-घाटंजी भागात फ्लोराईडयुक्त पाण्याच्या समस्येने जिल्हा आरोग्य यंत्रणासुद्धा हादरून गेली आहे. फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे हाडे ठिसूळ होऊन आदिवासी भागात राहणाऱ्या जनतेच्या अनारोग्याची भीषण समस्यादेखील जलसंकटाने निर्माण केली आहे. त्यामुळे केळापूर आणि घाटंजी तालुक्यातील फ्लोराईडयुक्त पाणी असलेले हातपंप (विंधन विहिरी) सील करण्यात आले आहेत. अशा प्लोराईडयुक्त जलस्रोत असलेल्या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. गावात जेव्हा पाण्याचा टँकर येतो, तेव्हा पाण्यासाठी गावकऱ्यांची रेटारेटी होते.
पाणी समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्री मनोहर नाईक यांनी खनिकर्म विभागाकडून प्राप्त होणाऱ्या अधिकार शुल्कातून तेरा कोटी रुपये पाणी पुरवठय़ासाठी मंजूर केल्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्य़ात १२०० च्या वर गावे आहेत आणि त्यातील ८० ते ८५ गावे घोटभर पाण्यासाठी जीवाचे रान करीत असल्याचे दृश्य दिसत आहे. दारव्हा तालुक्यातील ब्रह्मी येथे महिलांना आणि लहान मुलांनासुद्धा पाण्यासाठी डोक्यावर घागरी घेऊन आणि हातात प्लॉस्टीकच्या डबक्या घेऊन ३-३ किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.
अडाण प्रकल्पाप्रमाणे जिल्ह्य़ात पुसद तालुक्यातील पुस-सिंचन प्रकल्प हाही एक मोठा प्रकल्प आहे. मात्र, पुस धरणातसुद्धा ११ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे तर निम्न पुस प्रकल्पात १४.१० टक्के उपलब्ध आहे. पुस प्रकल्पातील पाण्याची पातळी ३८५ मीटर असून पाणीसाठा ११ दशलक्ष घनमीटर एवढा आहे.
पैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पैनगंगासुद्धा जास्त दिवस तग धरणार नाही असे चित्र आहे. त्यामुळे माळ पठारावरील गावातसुद्धा टँकरने पाणीपुरवठा करावा लागेल. आर्णी तालुक्यात अनेक गावांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या भागातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प म्हणजे अरुणावती हा आहे. अरुणावती धरणातसुद्धा फक्त चार टक्के पाणी शिल्लक आहे. नदीचे पात्र कोरडे आहे. मारेगाव तालुक्यात सगनापूर, हेटी, गारगोटी भुरकी, सागपोड, डबरीपोड, उमरीपोड इत्यादी आदिवासीबहुल गावांमध्ये महिलांना अक्षरश: तीन ते चार किलोमीटर पायपीट करून पाणी आणावे लागते.