Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

अकोला शहरासाठी २०० बोअर
अकोला, २२ एप्रिल/ प्रतिनिधी

अकोला महानगरातील टंचाईग्रस्त भागात २०० बोअर करून पाणी जलवाहिन्यांद्वारे थेट नागरिकांच्या घरात पोहोचवण्याची योजना महापालिकेने आखली आहे. यासाठी युद्धस्तरावर

 

हालचाली सुरू केल्या आहेत.
काटेपूर्णा प्रकल्पातील जलसाठय़ाने तळ गाठल्यामुळे अकोला महानगरापुढे भीषण पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. कापशी तलाव आणि वान प्रकल्पामधून शहराला पाणीपुरवठा करण्याच्या योजना पूर्ण होण्यास अद्याप अवधी आहे. सध्या पाच दिवसआड नागरिकांना पाणीपुरवठा महापालिके कडून केला जातो. यातही अनियमितता असल्यामुळे नागरिकांना हातपंप, विहिरी आणि परिसरातील अन्य जलस्रोतांवर दिवस काढावे लागत आहेत. गोरक्षण मार्ग, जठारपेठ, डाबकी रोड, हरीहर पेठ, माळीपुरा, अकोटफैल, तारफैल, रणपिसेनगर, अमानखां प्लॉट, आदी भागात पाणीटंचाईने कळस गाठला आहे. शहरातील अशा टंचाईग्रस्त भागाची पाहणी करून २०० बोअर करण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. या बोअर करून जलवाहिन्यांना जोडण्यात येतील आणि ते पाणी घरोघरी पोहोचवण्यात येईल, असे या योजनेचे स्वरूप आहे. जलवाहिन्या ठिकठिकाणी फुटल्यामुळे अकोट तालुक्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा होईनासा झाला आहे. फुटलेल्या जलवाहिनीमधून पाणी भरण्यासाठी बैलगाडी घेऊन गावकऱ्यांना वणवण भटकावे लागत असल्याची विदारक स्थिती अनेक गावांमध्ये निर्माण झाली आहे.
अकोट तालुक्यातील रोहणखेड, कावसा, पाटसूल, पुंडा, बांबर्डा, गरसोळ, रेल, धारेल, चोहोट्टा, गिरजापूर, वरुर जऊळका, करोडा गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावकरी बैलगाडय़ा घेऊन जलवाहिन्या फुटल्या आहेत त्या ठिकाणाहून पाणी भरून आणत असल्याचे दृष्य या भागात दिसते. हातपंपही बंद पडले आहेत. त्यामुळे रोजगाराकडे दुर्लक्ष करून गावकऱ्यांना केवळ पाण्यासाठी भटकावे लागत आहे.