Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

वर्धा जिल्ह्य़ातील पाणवठे कोरडे; १४९ गावे टंचाईग्रस्त
कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
वर्धा, २२ एप्रिल / प्रतिनिधी

वर्धा जिल्ह्य़ातील पाणवठे कोरडे झाले असून हक्काचा पाणीपुरवठा समजल्या जाणाऱ्या सिंचन प्रकल्पांनीही न्यूनतम पातळी गाठली आहे. जिल्ह्य़ात १४९ गावे पाणी टंचाईग्रस्त आहेत.
आष्टीला ममदापूर तलावातून पुरवठा होतो. सेलू तालुक्यातील केळझर येथे पाण्याची ओरड सुरू

 

झाली आहे. पाण्याची पातळी खालावल्याने सार्वजनिक कुपनलिकेतून अल्पपुरवठा तसेच भारनियमनाने गावातील पाणीपुरवठय़ाचे जलकुंभ भरले जात नाही. केवळ २० मिनिटातच नळ बंद करण्याचा प्रकार होत असल्याने केळझर पाणी टंचाईला सामोरे जात आहे.
आर्वी तालुक्यातील रोहणा येथे दर पाच दिवसामागे पाणीपुरवठा होऊ लागला आहे. खासगी विहिरींचे अधिग्रहण, नळदुरूस्ती, अर्धवट योजना पूर्ण करणे, विंधनविहिरी अशा योजना अद्याप मार्गी लागल्या नसल्याचे चित्र आहे. दरवर्षी टंचाई भासणाऱ्या मोई, बोरखेडी, बांबर्डा, चामला, पंचाळा, पोरगव्हाण, लिंगापूर, दलपतपूर, नवी आष्टी, चिंचोली, अंतोरा, लहान आर्वी अशा गावात कायमस्वरूपी नळयोजना मार्गी न लागल्याने यावर्षीच्या टंचाईत पाण्यावरून या गावात भांडणे लागल्याचे चित्र आहे. जानेवारीपासून पाणीपुरवठा ठप्प झालेल्या लहान आर्वीत सार्वजनिक विहिरीवर एकच झुंबड दिसून येते.
पाटबंधारे खात्याने दिलेल्या माहितीनुसार सध्या ६.२४ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. जिल्ह्य़ातील बोर या सर्वात मोठय़ा जलाशयात ११.१६ टक्केच पाणी शिल्लक आहे. धाम-१९.१२, पोथरा-७.९५, डोंगरगाव-२६.५७, पंचधारा-३.८९, मदन-२९.९६, लालनाला-३७.२८, अशी मध्यम प्रकल्पाची जलसाठय़ाची टक्केवारी असून १७ लहान प्रकल्पात १३.९० टक्के साठा आहे तर कुऱ्हा, बिदापूर व कन्नमवारग्राम प्रकल्प कोरडे पडले आहे. हे वर्ष दुष्काळाचे चटके देणार आहे.