Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

वाशीम जिल्ह्य़ातील टंचाईग्रस्त गावांमध्ये तातडीने उपाययोजना
वाशीम, २२ एप्रिल / वार्ताहर

वाशीम जिल्ह्य़ातील सहा तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांची पाहणी करण्यात येणार असून पाणी टंचाईग्रस्त गावांना तहसीलदार, गटविकास अधिकारी भेट देऊन प्रस्ताव तयार करणार आहेत. या प्रस्तावांना तातडीने त्याच ठिकाणी मंजुरी देण्यात येणार असल्याची माहिती

 

जिल्हाधिकारी उदय राठोड यांनी पाणी टंचाईबाबत आयोजित सभेत दिली.
प्रत्येक तालुक्यात नायब तहसीलदार, मंडळ निरीक्षक, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, भूवैज्ञानिक, पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक यांची १० ते १२ पथके तयार करून तीन दिवसात प्रत्यक्ष पाणी टंचाईबाबत आढावा घेणार आहेत. जिल्ह्य़ात प्रस्तावित ७० गावांतील ७८ विंधन विहिरींपैकी ५९ गावातील ६५ विंधन विहिरींना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ३८ गावांतील ३८ विंधन विहिरींचे काम प्रगतिपथावर असून २१ गावांतील २७ विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
प्रस्तावित ३८ गावांतील ३७ नळयोजनांच्या दुरुस्तीपैकी ३९ गावांतील १५ योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. मंजूर २९ गावांतील ५ योजना प्रगतिपथावर असून एका योजनेचे काम पूर्ण झाले आहे. २५२ गावांतील ५७७ विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती प्रस्तावित असून २४९ गावांतील ५४७ कामांना मंजुरी असून ही कामे प्रगतिपथावर आहेत. ११ गावांतील प्रस्तावित तात्पुरत्या नळयोजनांपैकी ८ गावातील ८ कामांना मंजुरी मिळाली असून त्यापैकी ७ कामे प्रगतिपथावर असून एका योजनेचे काम पूर्ण झाले आहे. प्रस्तावित १५२ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावयाच्या कामापैकी प्रत्यक्षात ६० गावांना ४९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. २४ गावांतील २८ विहिरींचे खोलीकरण, गाळ काढण्याचे काम प्रस्तावित असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
जिल्ह्य़ातील ११ गावांना तात्पुरती नळयोजना राबवण्याचे प्रस्तावित असून त्यापैकी ५ योजनांना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी ४ गावातील योजना प्रगतिपथावर असून एका योजनेचे काम पूर्ण झाले आहेत. ३८ गावातील ३७ नळयोजनांची विशेष दुरुस्ती करावयाची असून त्यापैकी १३ कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी ५ योजनांची कामे प्रगतिपथावर असून एका योजनेचे काम पूर्ण झाले आहे. ७० गावांतील ७८ नवीन विंधन विहिरी घेण्यात येणार आहेत. त्यापैकी ६० कामांना मंजुरी मिळाली आहे.