Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

कामठी तालुक्यात रोजगार हमी योजनेचा फज्जा
नागपूर, २२ एप्रिल / प्रतिनिधी

ग्रामसेवकांच्या बहिष्कारामुळे राज्य शासनाने नव्याने सुरू केलेल्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचा कामठी तालुक्यात फज्जा उडाला आहे. नऊ महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीकडे कामाची मागणी करूनही शेकडो मजुरांच्या रिकाम्या हाताला अद्याप काम मिळाले नाही. त्यामुळे

 

योजनेतील तरतुदीनुसार बेरोजगार मजुरांना बेकारी भत्ता देण्याची मागणी जोर धरत आहे.
राज्यातील आघाडी सरकारने मोठा गाजावाजा करून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची घोषणा केली. एवढेच नाही तर मागेल त्याला काम आणि वाजवी दामाबरोबरच मागणी करूनही काम न मिळाल्यास रोजगा र भत्ता देण्याची जनतेला हमी दिली. त्यानुसार १५ एप्रिलला प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये या योजनेचा श्रीगणेश झाला.
विशेष ग्रामसभेत या योजनेची घोषणा करण्यात आल्याने मजुरांनी विहित अर्ज भरून आपल्या कामाची नोंद केली. कृती आरखडय़ानुसार ८० टक्के कामे जलसंधारणाची व २० टक्के इतर कामे असे या योजनेच्या कामाचे स्वरूप आहे.
यात खडीकरण, शेततळे, साठवणी बंधारे, रोपवाटिका, वृक्ष लागवड इत्यादी कामांचा समावेश आहे. १८ वर्षांवरील महिला-पुरुषांना स्वत:च्या गावापासून ५ कि.मी. अंतरापर्यंत काम देण्याचे शासनाचे धोरण आहे. या योजनेंतर्गत काम करणाऱ्या महिलांना विविध सोयी देण्याचीही तरतूद आहे.
मागणी केल्याच्या १५ दिवसात काम देणे बंधनकारक आहे, असे असताना कामठी परिसरातील शेकडो मजुरांनी कामाची मागणी करूनही त्यांना काम देण्याबाबत अद्याप तोडगा न निघाल्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. याला ग्रामसेवकांचा अघोषित बहिष्कार कारणीभूत ठरला आहे. सध्या परिसरातील रब्बी हंगामातील शेतीची कामे आटोपल्यानंतर शेकडो मजूर रोजगाराच्या शोधात आहेत. तेव्हा प्रशासनाने यावर त्वरित तोडगा काढून रोजगार मजुरांच्या रिकाम्या हाताला त्वरित काम देण्याची मागणी जोर धरत आहे.