Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

कामठी क्रीडा संकुलाचे काम निधीअभावी रखडले
नागपूर, २२ एप्रिल / प्रतिनिधी

बहुविध क्रीडा परिषदेचेच्या वतीने कामठीत सुरू असलेले तालुका क्रीडा संकुलाचे बांधकाम चार वर्षांपासून निधी अभावी रखडले आहे. आघाडी सरकारच्या वतीने चार वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील खेळाडूंचा दर्जा सुधारावा याकरिता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुल

 

बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.
माजी राज्यमंत्री अ‍ॅड. सुलेखाताई कुंभारे यांच्या हस्ते कामठी तालुका क्रीडा संकुलाचे भूमिपूजनही करण्यात आले. मात्र, क्रीडा संकुलाचे बांधकाम अद्याप पूर्ण झाले नाही. ते निधी अभावी पडून आहे. या क्रीडा संकुलाच्या बांधकामाकरिता ६० लाख रुपयांचा निधी राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आला होता. बांधकामाचे कंत्राट नागपूर येथील एका खासगी कंत्राटदाराला देण्यात आले होते. कंत्राटदाराने बास्केट बॉल, क्रीडांगण कार्यालय, इमारत, ४०० मीटर धावपट्टीचे काम सुरू केले. मात्र, निधी न मिळाल्यामुळे अर्धवट काम सोडून दिले. या क्रीडा संकुलनात शासनाच्या वतीने ४०० मीटर धावण्याचा ट्रॅक, बॅडमिंटन, कोर्ट, व्हॉलीबॉल खेळाचे क्रीडांगण व प्रशासकीय कामाकरिता इमारत तयार करण्यात येणार होती. क्रीडा संकुल बांधकाम जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मार्गदर्शनात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कंत्राटदाराकडून करण्यात येणार होते. जिल्हाधिकारी या जिल्हा बहुविध क्रीडा परिषदेचे अध्यक्ष आहेत.
जिल्ह्य़ातील प्रत्येक तालुका क्रीडा संकुलाचे बांधकाम हे त्यांच्या मार्गदर्शनात होते. कामठी येथील क्रीडा संकुलाचे रखडलेले बांधकाम आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी जातीने लक्ष देऊन मार्गी लावण्याची मागणी कामठी तालुक्यातील क्रीडाप्रेमी जनतेने आणि खेळाडूंनी केली आहे.