Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

लग्नप्रसंगात नेत्यांना घुसखोरीची संधी!
मांडव पडले ओस, कार्यालये वाहताहेत ओसंडून
नागपूर, २२ एप्रिल / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकांची धामधूम, वरून आग ओकणारा सूर्य, तप्त वातावरणात गजबजलेली बस- रेल्वेस्थानके, मंगल कार्यालये, हॉटेल्स, टपऱ्या, बाजारपेठा.. या वातावरणातही लग्नसराईचा उत्साह ओसंडून वाहताना दिसतो आहे. विदर्भात लोकसभा निवडणुकीचे मतदान आटोपलेले असले तरी भविष्यात विधानसभा निवडणुकाही होणार असल्याने नेत्यांना या

 

लग्नप्रसंगात घुसखोरीची संधीच चालून आली आहे.
ग्रामीण भागात मार्च, एप्रिल व मे महिना म्हणजे लगीनघाईचे दिवस. या दिवसात बाजारपेठा गर्दीने फुलून जातात. लाखो रुपयांची उलाढाल होते. लग्नतारखांमुळे कुठे जावे असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. त्यातच लग्नांमध्ये ‘मुहूर्ता’चे बंधन पाळले जात नसल्याचे चित्र सार्वत्रिक झाले आहे. नवरदेवाची वरातही कधी वेळेत निघत नाही वा पोहोचत नाही. नवरदेवाच्या मित्र परिवाराचा वेगळाच गोंधळ तर कुठे ‘झुम बराबर झुम शराबी’चा जल्लोश. या काळात उन्हातान्हातही दररोज रस्ते गर्दीने फुलून जातात. घरासमोरील दाराऐवजी मंगल कार्यालयात होणारे विवाह, लग्नपत्रिकेत राजकीय मंडळींच्या नावांची गर्दी, नामवंतांच्या उपस्थितीसाठी टळत असलेला मुहूर्त, वऱ्हाडी मंडळींच्या मनोरंजनासाठी कार्यालयात दुपारी सुरू केलेला ऑर्केस्ट्रॉ, लग्नानिमित्त देवस्थानाला देण्यात येणाऱ्या देणग्या, मिरवणुकीत मद्यपान करुन बेहोशपणे नृत्य करणारी तरुणाई अशा विविध नवीन पद्धतींमुळे सध्या विवाह समारंभातील जुन्या प्रथा- परंपरा बंद पडत चालल्या असून नवीन प्रथांचे पेव फुटले आहे.
आज विदर्भाच्या ग्रामीण भागात लग्नाच्या प्रथा- परंपरा जपल्या जात आहेत पण, हे प्रमाण अत्यल्प आहे. विवाह समारंभासाठी हळद दळताना जात्यावर म्हटली जाणारी गीते आता ऐकावयास मिळत नाहीत. नवऱ्या मुलीच्या दारात विवाह लावले जायचे. गावातील प्रत्येक घरातील माणूस या विवाह समारंभास वधूपित्याच्या मदतीला पुढे यायचा. गावातील सार्वजनिक तरुण मंडळाच्या सहयोगाने लग्नसमारंभ मोठय़ा थाटात पार पडत असत. परंतु, सध्या मात्र खोटय़ा सामाजिक प्रतिष्ठेसाठी म्हणा की श्रम वाचवायसाठी वधू-वर पिता मुला-मुलींचे विवाह मंगल कार्यालयात लावण्यास धावपळ करताना दिसतो.
सध्या मध्यम शहरात पंचवीस हजारापासून ते एक लाखापर्यंत मंगल कार्यालयाचे एक दिवसाचे भाडे असते. मोठय़ा शहरांमध्ये ते यापेक्षाही अधिक असते. त्या ठिकाणी सर्व साहित्याची आणि वऱ्हाडी मंडळींची वाहतूक करून मंगल कार्यालयात विवाह लावण्यासाठी वधू-वर पित्यांचा आग्रह असतो. त्यामुळे आता विवाह घरासमोर होताना दिसत नाही. विवाहाच्या अगोदर नववधू-वरांना घराघरात दूध-भात, शेवई किंवा शिरा असे गोड गोड जेवण दिले जायचे. पण आता मांसाहारही दिला जातो. विवाह म्हणजे दोन जीवांच्या मीलनाचा पवित्र सोहळा. त्यासाठी लग्नाचा मुहूर्त काढतात परंतु, ऐन विवाहाच्या वेळी राजकीय पुढाऱ्यांचे आगमन होते किंवा त्यांच्या आगमनाची वाट पाहत मुहूर्त पुढे ढकलले जातात. त्यामुळे ठरलेल्या मुहूर्तावर लग्न लागत नाही. पुढारी मंडळींची भाषणबाजी झाल्याशिवाय विवाह समारंभाला अर्थ नाही, अशी भावना निर्माण होत असल्याने लग्नसोहळा हे एक राजकीय व्यासपीठच झाले आहे. या दोन जीवांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आप्तेष्ट, सगेसोयरे, हितचिंतक मंडळी आवर्जून उपस्थिती लावत असतात. परंतु, खऱ्या अर्थाने शुभाशीर्वाद देण्याचे काम वरबापाने तालुक्यातील राजकीय नेते मंडळींनाच दिलेले असते.
लग्न सोहळय़ाच्या पत्रिका पाहिल्यास त्यात नावांची अगदी गर्दी झालेली असते. एखाद्या राजकीय कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका काढताना जशी अनेकांची नावे छापली जातात, तशा पद्धतीने निमंत्रक, स्वागतोत्सुक अशा ठळक अक्षराखाली गावातील अनेकांची नावे दिली जातात. साखरपुडय़ाच्या वेळेसही राजकीय मंडळी नाक खूपसत असतात. विवाहासाठी काय ठरले आहे ते सांगण्यासाठी राजकीय मंडळींना बोलावले जाते. लग्न मुहूर्ताच्या वेळी पुढाऱ्यांची मर्जी राखणारा सत्काराचा कार्यक्रम होतो. सत्कार समारंभाच्या भाऊगर्दीत लग्नाची वेळ कधी टळून जाते हे भटजींशिवाय कुणाच्याही लक्षात येत नाही.
सध्या आधुनिक काळात नवीन चालीरितींमुळे जुन्या परंपरा बंद पडत आहेत. पूर्वी नवरदेवाला विवाहस्थळी नेताना गावातील महिला विवाहाची गाणी म्हणत असत. आज ही गाणी जवळपास संपुष्टातच आली आहेत. ही गाणी अलिखित असल्याने पुढील पिढीला या गाण्यांचे स्मरण होणे शक्य नाही. नवरा-नवरीने नाव घेण्याचा आगळावेगळा कार्यक्रमही सध्या बंद पडत चालला आहे. पाळणा, नांगर ओढणे, पेरणी असे छोटे- छोटे कार्यक्रमही इतिहासजमा व्हायला लागले आहेत. दुसऱ्या दिवशी नवरा- नवरीच्या आंघोळीपूर्वी सुपारी खेळण्याचा कार्यक्रमही होत असे. हा प्रकारही आता दिसत नाही. एकंदर विवाहाच्या पूर्वीच्या प्रथा परंपरा बंद पडत चालल्या आहेत.