Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

वन्यजीव संशोधन केंद्रासाठी मदत करणार -बी. मुजुमदार
नागपूर, २२ एप्रिल / प्रतिनिधी

नागपुरात वन्यजीव संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) बी. मुजुमदार यांनी दिले.
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठामध्ये ‘वन्यजीव स्वास्थ व व्यवस्थापन’ विषयावर

 

आयोजित एकदिवसीय चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरूण निनावे होते. प्रमुख पाहुणे म्हणून वन्यजीव स्वास्थ व व्यवस्थापन समन्वयक डॉ. डी.बी. सरोदे उपस्थित होते. मानव आजही अप्रत्यक्षपणे जंगलावरच अवलंबून आहे. मनुष्यप्राण्यांच्या हीतासाठी जंगलांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. मनुष्याने जंगलाचा नाश केल्यास, निसर्गाचे संतुलन बिघडून जगाला विनाशाला सामोरे जावे लागेले, असा इशाराही मुजूमदार यांनी दिला. वन्यजीवांचे सृष्टीमधील महत्त्व, नष्ट होणाऱ्या वन्यजीवांच्या प्रजाती आदींबाबत डॉ. सरोदे यांनी माहिती दिली. तसेच, नागपुरात वन्यजीव संशोधन केंद्र स्थापन करण्याबाबतची भूमिकाही त्यांनी मांडली. सादरीकरणामध्ये प्राधान्याचे विषय आणि भविष्यात कृती आराखडा तयार करण्याविषयीची माहिती देऊन डॉ. सरोदे म्हणाले की, सर्व विभाग जोपर्यंत एकत्र येणार नाहीत, तोपर्यंत निसर्गाच्या संरक्षणासाठी ठोस पावले उचलली जाणार नाहीत. वनखात्याच्या मदतीने नागपुरात वन्यजीव संशोधन केंद्र स्थापन करण्यात येईल, असे सांगून मत्स्य व पशु विज्ञान विद्यापीठात वन्यजीव पारंगत पदवी(मास्टर डिग्री) सुरू करण्याचे आश्वासन डॉ. निनावे यांनी दिले. निसर्गप्रेमी संस्थेकडून आर्थिक सहकार्य मिळाल्यास विद्यापीठ अनेक उपयुक्त संशोधन करू शकते, अशी माहिती कुलगुरू डॉ. निनावे यांनी दिली. चर्चासत्रात वन्यजीव व मत्स्य व्यवस्थापनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, प्राणी संग्रहालय आणि वनातील अडचणी, वन्यप्राणी आहार व्यवस्थापन, गिधाड संरक्षण आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. संचालन डॉ. शिरीष उपाध्ये यांनी केले. चर्चासत्रात वनविभागाचे अधिकारी, पशुसंवर्धन विभाग, विद्यापीठ नागपूर आणि नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाचे शास्त्रज्ञ उपस्थित होते.