Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

उद्यापासून बेझनबाग मैदानावर आंबेडकरी-तिबेटियन महोत्सव
नागपूर, २२ एप्रिल / प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त क्रांतिज्योती महिला मागासवर्गीय संस्थेतर्फे २४, २५ व २६ एप्रिलला बेझनबाग मैदानावर सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. ही माहिती रेखा लोखंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. आंबेडकरी जनतेला एकत्र आणण्याच्या

 

हेतूने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यावेळी निर्वासित तिबेटी नागरिकांना भारतात येऊन ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भारत-तिबेट समन्वय केंद्र व गोठणगाव येथील नारग्योलीन तिबेटीयन सेटलमेंट सेन्टरतर्फे ‘धन्यवाद भारत’ हा सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात येणार आहे.
२४ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता बौद्ध धम्मगुरू भदंत आर्य नागार्जून भंते सुरेई ससाई यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी विचारवंत अमृत बनसोड राहणार आहेत. राजस्थानच्या डॉ. कुसुम मेघवाल व मुंबईच्या डॉ. अनुला हजारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी डॉ. आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या जीवनावरील प्रदर्शन व तिबेटियन आरोग्य शिबिराचे भंते सुमेध यांच्या हस्ते उद्घाटन होईल. रात्री ८ वाजता प्रा. मनीष गवई हे ‘मी आंबेडकर बोलतोय’ हे एकपात्री नाटक सादर करणार आहेत.
२५ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता ‘धन्यवाद भारत’ हा सांस्कृतिक कार्यक्रम तिबेटियन नागरिक सादर करणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आचार्य एशी फुन्सुक, तेंझिन लक्ष्ये, सांगपोजी हे उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी नवी दिल्लीचे मनोजकुमार हे राहतील. यावेळी भारत व तिबेट यांच्यातील संबंधांवर चर्चा होणार आहे.
२६ एप्रिलला सकाळी ८ वाजता १५ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी धावण्याची स्पर्धा होईल. सकाळी १० वाजता आंबेडकरांच्या जीवनावर प्रश्नमंजुषा होईल. सायंकाळी ६ वाजता प्रल्हाद गजभिये यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचा समारोप होईल. यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर दुपारे, कुलदीप अग्निहोत्री, उत्पादन शुल्क अधिकारी सुधीर भगत, हिमाचल प्रदेशातील महिला तिबेटियन असोसिएशन धर्मशाळेच्या बी. शिरीन, डॉ. आंबेडकर अर्बन को-ऑप बँकेचे संचालक अशोक कोल्हटकर, प्राचार्य रमेश माटे, योगाचार्य पांडुरंग वासनिक हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. परिषदेला सांगपोजी, कर्मा वांगदुल, तेझीन वांगमो, बुमकी डोलमा, दीपज्योती वाल्दे, इंदु मेश्राम, सविता गोटे, पमिता कोल्हटकर, मीरा सरदार, निलू बोरकर, सुनीता उके, मधुलिका बोरकर, विपश्यना लोखंडे, दीपा फुलेकर, साहेबराव सिरसाट, संदेश मेश्राम, राजकुमार प्रकाश, अनंत लोखंडे आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.