Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

नियोजनाशिवाय २४ तास पाणी अशक्य -डॉ. दहासहस्त्र
नागपूर, २२ एप्रिल / प्रतिनिधी

वाढत्या लोकसंख्येचा विचार करता शहरातील पाणी व्यवस्थेची रचना आणि पाण्याचे नियोजन केले तर शहराला चोवीस तास पाणी पुरवठा करणे शक्य आहे. त्यासाठी समाजामध्ये जागृती करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव डॉ. संजय

 

दहासहस्त्र यांनी केले.
राजाराम सीताराम दीक्षित वाचनालय, भारतीय जलसंसाधन संस्था, इंडियन वॉटर वर्क्‍स असोसिएशन, इन्स्टिटय़ूट ऑफ पब्लिक हेल्थ इंजिनिअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या डॉ. मनोहर गंगाधर पटवर्धन स्मृती जलसंवाद व्याख्यानमालेत डॉ. दहासहस्त्र बोलत होते. अरुणा सबाने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला राजाराम वाचनालयाचे अध्यक्ष प. न. जोशी, भारतीय जलसंसाधन संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत डोईफोडे, इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअर्सचे अध्यक्ष मधुकर दाते, संजीवनी पटवर्धन आदी उपस्थित होते.
शहरात सवार्ंना समसमान व शुद्ध पाणी मिळावे यासाठी पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांत पाण्याचा अपव्यय जास्त होत असल्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने चोवीस\ / सात प्रमाणे पाणी पुरवठय़ाची योजना आखली त्याप्रमाणे काम सुरू केले. शहरातील पाणी पुरवठय़ामध्ये परिवर्तन करण्याची गरज आहे. शहरातील वाढती लोकसंख्या बघता पाण्याच्या दबावाचे तंत्र आणि जुनी पाईप लाईन दुरस्त केली तर शहराला हवा तेवढा पाणी पुरवठा करणे शक्य होऊ शकते. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने बदलापूरमध्ये चोवीस तास पाणी पुरवठा करण्यासाठी योजना आखली असून त्यानुसार पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विकनशील देशासमोर आज पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पाण्याचे महत्त्व काय आहे याची जागृती करणे आवश्यक आहे.
आपल्याकडे गेल्याकाही वर्षांत लोकसंख्या वाढल्यामुळे पाण्याचा तिपटीने वापर वाढला आहे. मात्र त्या पद्धतीने नियोजन करण्यात आलेले नाही. अनेक वर्ष जुन्या पाईपलाईन बदलवण्यात आल्या नाहीत. त्यामुळे पाण्याचा अपव्यय मोठय़ा प्रमाणात होत आहे. झोपडपट्टी भागातील गोरगरीबांना २७ टक्के पाणी पुरवठा केला जातो त्यातील दहा टक्के पाण्याचा अपव्यय होतो. प्राधिकरणाने हायड्रोलिक मॉडेल तयार केले असून त्याद्वारे पाण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती डॉ. सहस्त्रबुद्धे यांनी दिली. यावेळी अरुणा सबाने यांचे अध्यक्षीय भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजाराम वाचनालयाचे अध्यक्ष प.न. जोशी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय श्रीकांत डोईफोडे व उद्धवराव वानखेडे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे संचालन सु.गो. देशपांडे यांनी केले.