Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

पत्रकारितेचे विद्यार्थी त्रस्त
विद्यापीठ व महाविद्यालयांची बेपर्वाई
नागपूर, २२ एप्रिल / प्रतिनिधी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि पत्रकारितेचा अभ्यासक्रम चालवणाऱ्या विविध महाविद्यालयांच्या बेपर्वाईचा फटका विद्यार्थ्यांना बसला असून परीक्षेच्या गोंधळामुळे १४९

 

विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.
मंगळवारी २१ एप्रिलपासून सुरू होणारी परीक्षा विद्यापीठाने पुढे ढकलली असली तरी परीक्षा होईल की नाही अशा संभ्रमात विद्यार्थी आहेत. विद्यापीठाने महाविद्यालयांना ११ मे पर्यंत नियमित शिक्षक नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. जे महाविद्यालयांसाठी अशक्यप्राय आहे. विद्यापीठाचा जनसंवाद विभाग आणि पत्रकारिता अभ्यासक्रम सुरू असलेल्या इतर महाविद्यालयांमध्ये अतिशय गरीब परिस्थितीतून आलेले विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पत्रकारितेच्या परीक्षा रद्द झाल्यास त्यांच्या शिक्षणावर आणि पुढील करिअरवर प्रश्नचिन्ह उभे राहील, अशी प्रतिक्रिया जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांनी दिली आहे.
विद्यापीठाच्या निर्देशानुसार पत्रकारितेच्या महाविद्यालयांमध्ये मान्यताप्राप्त शिक्षक असणे आवश्यक केले आहे. ऐन परीक्षेच्या तोंडावरच विद्यापीठाने कारवाईचा बडगा उगारून महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांना वेठीस धरले आहे तर महाविद्यालयांनी वर्षांनुवर्षे नियमित शिक्षक महाविद्यालयात नियुक्त करण्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले आहे. मंगळवारी २१ एप्रिलला परीक्षा सुरू होणार होती. तरी विद्यापीठाने मान्यताप्राप्त शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र देण्यास नकार दिला. त्यावर विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. सध्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्या तरी परीक्षा सुरू होईपर्यंत विद्यार्थ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार असणार आहे. खुद्द विद्यापीठाच्या जनसंवाद विभागामध्ये नियमित शिक्षक नसताना महाविद्यालयांमध्ये नियमित शिक्षकांची सक्ती विद्यापीठ कशी काय करू शकते, असा प्रश्न महाविद्यालयांतर्फे उपस्थित करण्यात येतो आहे. तसेच पत्रकारितेमध्ये नियमित शिक्षकच मिळत नसल्याची अडचण महाविद्यालयांच्या प्राचार्यानी एक बैठकीत नुकतीच कुलगुरूंकडे बोलून दाखवली.
यावर्षी पत्रकारितेसाठी १४९ विद्यार्थी दाखल झाले आहेत. त्यामध्ये कित्येक जण हे विविध वृत्तवाहिन्या किंवा मुद्रित माध्यमातून काम करीत आहेत. विविध महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या- विद्यापीठ जनसंवाद विभाग- ३०, अरुण जोशी महाविद्यालय- १२, उमाठे महाविद्यालय-२५, धनवटे नॅशनल महाविद्यालय- ३४, इंदुताई पत्रकारिता महाविद्यालय- ३, उदय टेकाडे याचे वादग्रस्त महालक्ष्मी जगदंबा महाविद्यालय- ७, अग्निहोत्री महाविद्यालय- ३, वध्र्याचे चिंतामणी महाविद्यालय- १४, चंद्रपूरचे आर.टी. भोसले महाविद्यालय- १० आणि सेंट्रल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मास कम्युनिकेशनमध्ये ११ विद्यार्थी पत्रकारितेचे शिक्षण घेत आहेत.