Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

चर्च हल्ला प्रकरणाचा सेक्युलर फोरमतर्फे तीव्र निषेध
नागपूर, २२ एप्रिल / प्रतिनिधी

ऑल इंडिया सेक्युलर फोरमच्या बैठकीत सावनेरच्या डग्लस चर्चवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. असे हल्ले टाळण्यासाठी तसेच सामाजिक सद्भाव टिकवून ठेवण्यासाठी सामान्य नागरिकांसोबतच शासनानेही पावले उचलावी, असे मत उपस्थितांनी मांडले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुरेश खैरनार होते. उत्तर अंबाझरी मार्गावरील राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या

 

सभागृहात ही बैठक पार पडली.
चर्चवरील हल्ला प्रकरणात षडयंत्र रचून बहुजनांचा वापर करण्यात आला. मूठभर लोकांकडून धर्माच्या नावावर बहुजनांवर बहुजनांकडून प्रहार करण्यात येत आहे. हे षडयंत्र ओळखण्याची आवश्यकता असल्याचे मत डॉ. यशवंत मनोहर यांनी मांडले. मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध आणि मानवतावाद मानणारा ओबीसीतील एक वर्ग या सर्वानी एकत्र येऊन अशा घटना घडू नये यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात अस्वस्थता पसरली असल्याचेही डॉ. मनोहर यांनी स्पष्ट केले.
काही धर्माध शक्ती ओबीसींना हाताशी धरून समाजविघातक कृत्य करवून घेत आहेत. त्यामुळे ओबीसींनी सावध राहण्याची गरज असल्याचे मत अहमद कादर यांनी मांडले. असे हल्ले होऊच नये यासाठी कठोर उपाययोजना राबवल्या पाहिजे, असे नागेश चौधरी म्हणाले. सावनेर शहर हे सर्वधर्म समभाव जपणारे गाव आहे. या गावातील शांतता भंग व्हावी, यासाठी काही दृष्ट प्रवृत्ती काम करीत आहेत.
या दृष्ट प्रवृत्तींपासून सावध राहण्याचे आवाहन बाबासाहेब समर्थ यांनी याप्रसंगी केले.
प्रमोद मून यांनी जशास तसे उत्तर देणे, हाच योग्य मार्ग असल्याचे स्पष्ट केले. जोपर्यंत प्रत्त्युत्तर दिले जाणार नाही तोवर अल्पसंख्यकांवर असे भ्याड हल्ले होतच राहतील, असेही मून म्हणाले. ज्ञानेश्वर रक्षक यांनी ओबीसींना धर्मच नसल्याचे सांगून मानवतावादी दृष्टीकोन रुजवण्यासाठी प्रबोधनाची गरज असल्याचे नमूद केले. चर्चसमोर सामुदायिक प्रार्थना करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. अल्पसंख्यक समाजावर व त्यांच्या धार्मिक स्थळांवरील हल्ले थांबवण्यासाठी कठोर उपाययोजनांची गरज असल्याचे खैरनार म्हणाले. कट्टर हिंदुत्ववाद्यांच्या कटापासून सावध राहण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी आमदार एस.क्यू. जमा, अर्थशास्त्रज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, प्रा. पारसे, विजय मोकाशी, भाऊ पंचभाई, अमर रामटेके यांनीही विचार मांडले. बैठकीला विविध क्षेत्रात काम करणारी मंडळी उपस्थित होती.