Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

वेल्वेट कलाकार निनाद पाचपोर लिम्का बुकात
नागपूर, २२ एप्रिल/प्रतिनिधी

इंद्रधनुषी रंगांचे, विविध आकाराचे, लहानमोठे वेल्वेटच्या कागदाचे तुकडे आणि त्यातून निर्माण होणारी कलाकृती बघणाऱ्याच्या मनाचा ठाव घेते. मात्र, या कलावंताला एक दिवस हा छंद त्याला लिम्का बुकमध्ये घेऊन जाईल याची कल्पनाही नसते. मित्राच्या आग्रहाखातर, कुठलीही अपेक्षा न बाळगता लिम्का बुकमध्ये ही कलाकृती पाठविली जाते आणि त्याची निवडसुद्धा होते.

 

नागपूर शहरातील निनाद पाचपोर यांच्या कलाकृतीची लिम्का बुकने दखल घेतली असून, लिम्का बुकच्या २८व्या आवृत्तीत त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. गुरगाव येथे अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या हस्ते या आवृत्तीचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले.
केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेत फार्मासिस्ट म्हणून कार्यरत निनाद पाचपोर यांना वयाच्या २१व्या वर्षांनंतर वेल्वेटच्या कागदांपासून कलाकृती तयार करण्याचा छंद जडला. सुरुवातीला त्यांनी भेटकार्ड बनवायला सुरुवात केली. कुठलेही प्रशिक्षण न घेता त्यांचा हा छंद वाढतच गेला आणि मग सुरई, कुंडय़ांवर विविध रंगांच्या वेल्वेट कागदाच्या तुकडय़ांनी सजावट करायला सुरुवात केली. गालीचे ही त्यांच्या वेल्वेट कलाकृतीची खासियत आहे. नागपूर शहरात त्यांच्या कलाकृतीचे प्रदर्शनसुद्धा भरले आहे. सुमारे ७२ हजार लहानमोठय़ा तुकडय़ांचा वापर करून त्यांनी वेल्वेटचे सुमारे ३५० आकर्षक डिजाईन तयार केले आहेत. आतापर्यंत ६,५०० ग्रिटींग कार्ड त्यांनी तयार केले आहेत. याशिवाय ते उत्तम रांगोळी कलाकार आहेत.
या कलेतून मनात आणले तर उत्पन्न मिळू शकते पण, मानसिक समाधान नाही. म्हणूनच शेवटपर्यंत ही कला छंद म्हणूनच जोपासणार, असे निनाद पाचपोर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. ही कला शिकताना सातत्य हवे, तरच त्यातून उत्कृष्ट निर्मिती होऊ शकते. नोकरी सांभाळून हा छंद जोपासताना बरेचदा कुटुंबाला वेळ देता येत नाही पण, कुटुंबातील सदस्यांनी हे वास्तव स्वीकारले आहे, असे पाचपोर यांनी सांगितले.
वयाच्या ५७व्या वर्षीसुद्धा ते तेवढय़ाच उत्साहाने काम करतात. सुमारे ३८ वर्षांपासून पाचपोर सातत्याने हे काम करत आहेत. कलाकृती तयार करताना त्यांच्या चेहऱ्यावर थकवा कधी दिसूनच येत नाही. ऑफीस आणि घर याचा ‘बॅलेन्स’ साधत वेल्वेटच्या कलाकृतीचा छंद जोपासणारे निनाद पाचपोर तीन वर्षांनंतर सेवानिवृत्त होतील. त्यानंतर आपण इतरांना या कलाकृतीचे ज्ञान देऊ, असे निनाद पाचपोर म्हणाले. नागपूर शहरातील एका कलावंताचे लिम्का बुकमध्ये नाव गेल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.