Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

आरोपींच्या सुटकेसाठी शनिवारी सावनेर बंद
नागपूर, २२ एप्रिल / प्रतिनिधी

सावनेरातील डगलस मेमोरियल चर्चवर हल्ला करण्याच्या आरोपात अटक करण्यात आलेले खरे आरोपी नसून त्यांची त्वरित सुटका न केल्यास शनिवारी, २५ एप्रिलला सावनेर बंद पुकारण्याचा

 

इशारा जय शिवाजी सामाजिक संस्थेने पत्रकार परिषदेत दिला.
या चर्चमध्ये गरीब लोकांना पैसा किंवा शिक्षण सुविधांचे प्रलोभन दाखवून त्यांचे धर्मातरण करण्यात येत होते. हल्ला प्रकरणात ज्यांना अटक झाली ते प्रत्यक्षात आरोपीच नाहीत. पोलिसांनी त्यांना बळजबरीने कोठडीत डांबले आहे. खरे आरोपी मोकाट आहेत. अटक झालेल्यात मराठा सेवा संघाचा सावनेर शाखेचा अध्यक्ष विक्रम गमे हासुद्धा आहे. गमे शेतातून परतल्यावर दुपारी ४ वाजतापर्यंत घरीच होता. बबलू आठणकर व अरुण चाफले हेसुद्धा कामावर गेले होते व त्याचा पुरावाही आहे. ओळखपरेडमध्ये रेव्हरंड मार्क्स साखरपेकर यांनी आरोपींना ओळखण्यास नकार दिलेला आहे. स्थामिक आमदार व काँग्रेसच्या नेत्यांच्या दबावावरून निर्दोश लोकांना गोवण्यात आले आहे, असा आरोप करून संस्थेचे अध्यक्ष दिनेश इंगोले यांनी ही घटना चुकीच्या पद्धतीने हाताळल्याबद्दला बजरंग दलाचा निषेधही केला.
हल्ला करण्यापूर्वी एक तास अगोदर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती मात्र, पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडला. यापुढे पोलिसांनी घटनेची सखोल चौकशी करून खऱ्या आरोपींना अटक करावी, धमार्ंतरणाला आळा घालावा, मिशनऱ्यांच्या आमिशाला गरीब लोक बळी पडणार नाहीत व गावात दहशतीचे वातावरण निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन उपाध्यक्ष प्रशांत ठाकरे यांनी केले. यावेळी संस्थेच्या सदस्यांनी स्थानिक आमदारांवरही आरोप केले. आमदारांनी उंटावरून शेळ्या हाकलण्याऐवजी तालुक्याच्या विकासाकडे लक्ष द्यावे. धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करू नयेत, अन्यथा हिंदू समाज त्यांना माफ करणार नाही, असा इशारा देऊन इंगोले यांनी, २५ एप्रिलच्या बंदमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी केले. पत्रकार परिषदेला सचिव पांडुरंग भोंगाडे, कोषाध्यक्ष रमेश वानखेडे, गजेन्द्र कोमुजवार, संदीप मानकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.