Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९
नवनीत

जी व न द र्श न
..नाहीतर विनाश अटळ

 

इसवी सनापूर्वी ५९९मध्ये वैशाली राज्यातील कुंडलपूर येथे महावीरांचा जन्म झाला. राजघराण्यात जन्म घेऊनही साऱ्या सुखोपभोगांना ठोकरून त्यांनी दीक्षा घेतली. त्याकाळी भारत समृद्ध देश होता. राजवाडे, गगनचुंबी इमारती, प्रासाद, मंदिरं, नाटय़शाळा, सार्वजनिक स्नानगृहं, नृत्यशाळा यांची रेलचेल होती. नाचगाणी, भोगविलास, पशुबळी, यज्ञ यांना ऊत आला होता. राजे विलासी व प्रजा असंयमी झाली होती. दैहिक सुखासाठी, जिव्हालौल्यासाठी अनाचार वाढत होता. जातिभेदाचा नंगानाच सुरू होता. स्त्री ही एक भोग्य वस्तू समजली जात होती. भरबाजारात तिचा लिलाव होत होता. दासी, भोगदासी म्हणून तिला कुणीही सहज प्राप्त करून घेत होता. अश्वमेध, गोमेध, नरमेध, पशुबली यांच्या रक्ताने यज्ञवेदी रंगून गेल्या होत्या. निराधार, निरपराध पशूंच्या किंकाळय़ांनी आसमंत भरून गेलं होतं. (मेघदूतमध्ये कालिदासाने नदीचं पाणी पशूंच्या रक्ताने लाल झालं होतं असं म्हटलंय.) समृद्धीच्या प्रदर्शनासाठी कुणी १०० घोडे, तर कुणी ५०० गायी यज्ञात बळी देत होते. अशावेळी महावीरांनी दीक्षा घेतली. आजूबाजूचं वातावरण बघून त्यांचं मन करुणेनं द्रवलं. बारा वर्षे मौन तप करून पुढे बेचाळीस वर्षे त्यांनी गावोगावी विहार केला. जगातल्या अनेक दु:खांची कारणं शोधून त्यांनी धर्माची शेकडो तत्त्वं सांगितली. त्यातली मुख्य अहिंसा, अचौर्य, सत्य, अपरिग्रह व ब्रह्मचर्य होत. सर्व प्राण्यांना जगण्याची इच्छा असते. आपल्याला जसे दु:ख प्रिय नाही, तसे सर्व प्राणिमात्रांनाही दु:ख प्रिय नाही, असं त्यांनी म्हटलं. आज जग भोग, लालसा, सत्ता, संपत्ती, जिव्हालौल्य याच्यामागं धावतं आहे. त्यातूनच भ्रष्टाचार, बलात्कार, अत्याचार, हिंसा, युद्ध, अतिरेकी कारवाया होत आहेत. हिरवे डोंगर नष्ट होताहेत. पशुधन नष्ट होत आहे. पाण्यासाठी वणवण होते आहे. पर्यावरणाचा तोल ढळतो आहे. अशावेळी महावीरांच्या तत्त्वांना अनुसरणं मानवजातीला हिताचं होईल. सूक्ष्म जिवापासून मानवापर्यंत कुणाचीच हिंसा करू नका म्हणून यज्ञबळी थांबवले. स्त्रीला मानाचं स्थान दिलं. जातिभेद नाकारून कुणीही परमात्मा होऊ शकतो म्हटलं, अनेकांत तत्त्वाचं महत्त्व सांगून धर्माधर्मातले कलह मिटवून बंधुभाव वाढवला. सहिष्णुता निर्माण केली. संत विनोबा म्हणाले - ‘उशिरा जागे झालात म्हणून घाबरू नका, स्वस्थही बसू नका. एवढय़ात सूर्योदय झालाय असं समजून कामाला लागा.’ अजूनही वेळ गेलेली नाही. जागे व्हा, नाहीतर विनाश अटळ आहे.
लीला शहा

कु तू ह ल
महिन्यांची नावे
महिन्यांना नावे कशी दिली जातात? आकाशदर्शनाच्या दृष्टीने ती कशी उपयुक्त ठरतात?
चैत्र, वैशाख इ. चांद्रमहिने आहेत. चांद्रमहिना अमावस्येला संपतो. अमावस्या समाप्तीकाली सूर्य कोणत्या राशीत आहे, त्यावरून संपणाऱ्या व त्यानंतर सुरू होणाऱ्या चांद्रमहिन्याचे नाव ठरते. मीन राशीत सूर्य असताना जो चांद्रमहिना संपतो तो फाल्गुन आणि सुरू होतो तो चांद्रमहिना चैत्र. याप्रमाणे मेष राशीत सूर्य असताना वैशाख महिना सुरू होतो. याप्रमाणे सूर्याच्या बारा राशींतील वास्तव्यावरून बारा चांद्रमहिन्यांची नावे ठरतात.
या संकेताचा किंवा निकषाचा परिणाम म्हणून चैत्र महिन्यात पौर्णिमेचा चंद्र ‘चित्रा’ नक्षत्रात असतो म्हणून तो चैत्र. याचाच अर्थ असा की, ‘चित्रा’ हे नक्षत्र चैत्र महिन्यात सूर्यास्ताच्या सुमारास उगवते. मध्यरात्रीच्या सुमारास मध्यमंडलाजवळ येते आणि पहाटे मावळते. स्थूलमानाने असे म्हणता येईल की, चैत्र महिन्यात चित्रा तारकेचे दर्शन रात्रभर होते. येथे स्थूलमानाने म्हणण्याचे कारण असे की, प्रत्येक ताऱ्याची उगवण्याची व मावळण्याची वेळ रोज ठराविक असत नाही. कोणत्याही दिवशीची ताऱ्याची उदयाची वेळ आदल्या दिवशीपेक्षा चार मिनिटे अगोदर येते. याचाच अर्थ असा की, एखाद्या दिवशी रात्री ८ वाजता उगवणारा तारा त्यानंतर पंधरा दिवसांनी रात्री ७ वाजताच उगवेल. जो नियम उदयाच्या वेळेला तोच नियम अस्ताच्या वेळेलाही लावायचा. याप्रमाणे प्रत्येक महिन्याचा पौर्णिमेचा चंद्र त्या त्या महिन्याच्या नक्षत्राजवळ असतो. जसे चैत्र (चित्रा), वैशाख (विशाखा), ज्येष्ठ (ज्येष्ठा), आषाढ (आषाढा), श्रावण (श्रवण), भाद्रपद (भाद्रपदा), आश्विन (आश्विनी), कार्तिक (कृत्तिका), मार्गशीर्ष (मृगशीर्ष), पौष (पुष्य), माघ (मघा) आणि फाल्गुन (फाल्गुनी).
हेमंत मोने
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२

दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
सत्यजित राय

भारतीय कलात्मक चित्रपटाचे जनक असा नावलौकिक मिळवणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे दिग्दर्शक सत्यजित राय यांचा जन्म ३ मे १९२१ रोजी झाला. प्रख्यात बंगाली साहित्यिक सुकुमार राय यांचे ते सुपुत्र. प्रेसिडेन्सी कॉलेजातून पदवी संपादन केल्यानंतर काही काळ ते शांतिनिकेतनमध्ये होते. एका नोकरीच्या निमित्ताने ते लंडनला गेले असता त्यांच्यावर चित्रपट कलेचा प्रभाव पडला. १९४७ च्या सुमारास त्यांनी कलकत्ता फिल्म सोसायटीची स्थापना केली. ‘पाथेरी पांचाली’ या त्यांच्या पहिल्याच चित्रपटाला कान्स चित्रपट महोत्सवात सुवर्णपदक मिळाले. औद्योगिक क्रांतीमुळे भारतातील ग्रामीण समाजावर झालेले परिणाम हा या चित्रपटाचा विषय. भारतीय समाजाची नाडी अचूक ओळखणाऱ्या राय यांनी यानंतर एकापेक्षा एक असे सरस चित्रपट दिले. १९६० च्या दशकात मध्यमवर्गीय भारतीय गृहिणी नोकरदार बनून घराबाहेर पडते हे ‘महानगर’ या चित्रपटातून त्यांनी प्रभावीपणे दाखवले. १९५५ ते १९९२ म्हणजे जवळजवळ चार दशके त्यांच्या चित्रपटांनी भारतीयच नव्हे, तर पाश्चात्त्य रसिकांनाही भुरळ पाडली. त्यात प्रामुख्याने ‘अपराजितो’, ‘अपूर संसार’, ‘जलसाथर’, ‘देवी’, ‘रवींद्रनाथ टागोर’, ‘चारुलता’, ‘शतरंज के खिलाडी’ हे त्यांचे उल्लेखनीय चित्रपट. लहान मुलांसाठीही त्यांनी काही चित्रपट काढले. आपल्या घराण्याचा साहित्यिक वारसा चित्रपटाचा पसारा सांभाळून त्यांनी यशस्वीपणे चालवला. वडिलांचे बंद पडलेले ‘संदेश’ हे नियतकालिक त्यांनी पुन्हा सुरू केले, तसेच ७ विज्ञान कथा, १० कथासंग्रह, १७ कादंबऱ्या त्यांनी प्रकाशित केल्या. ते स्वत: उत्तम फोटोग्राफर असल्याने अनेक पुस्तकांचे रेखाटन त्यांनी केले. स्वत:च्या चित्रपटांचे लेखन, दिग्दर्शन, संगीत, प्रसिद्धी, पोस्टर्सही ते स्वत:च करत. मुद्रणकलेच्या क्षेत्रात ‘रे-रोमन’ आणि ‘रे-बिझार’ या टाइप्सना जन्म दिला त्यांनीच. पद्मश्री, मॅगेसेसे, ऑस्कर लाइफ टाइम अचिव्हमेंट, ऑक्सर विद्यापीठाची डी. लीट. आणि भारतरत्न यासारखे सन्मान त्यांना मिळाले. २३ एप्रिल १९९२ रोजी कोलकात्यात त्यांचे निधन झाले.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
फटाके व आंधळा भिकारी
अपंग, कुष्ठरोग्यांसाठी आनंदवन निर्माण करून त्यांना आनंदमय जीवन देणाऱ्या आणि त्यांच्यासाठी आयुष्यभर कार्य करणाऱ्या बाबा आमटेंच्या बालपणीची ही हकिकत. मुरलीधरला फटाके उडवायला फार आवडायचे. त्यांच्यातून निर्माण होणारा झगझगाट, त्यांचे सभोवताल दणाणून टाकणारे आवाज त्याला भारून टाकायचे. दिवाळी जवळ आली होती. मुरलीधरचे फटाके उडवायचे बेत सुरू झाले. कुठले फटाके आणायचे.. बाजारात यंदा नवे कुठल्या प्रकारचे फटाके आले आहेत. मोठ्ठे फटाके आणि माळा कुठल्या यांची माहिती गोळा झाली. मुरलीधरचे वडील श्रीमंत असामी होते. मुलाच्या आनंदासाठी भरपूर पैसे खर्चायला ते नेहमीच तयार असायचे. त्यावर्षी मुरलीधरने ठरवले आपले फटाके आपणच खरेदी करूया. म्हणजे आपल्या आवडीप्रमाणे, मनाप्रमाणे फटाके घेता येतील. वडिलांकडून चांगले खिसा भरून पैसे घेऊन तो फटाक्यांच्या दुकानात खरेदीसाठी गेला. दुकानं फटाक्यांनी ठासून भरलेली होती. सगळीकडे अतिशय आकर्षक दिसणारे फटाके मांडून ठेवलेले होते. मुरली दुकानाच्या पायऱ्या चढणार तोच त्याची नजर दुकानाच्या पायऱ्यांशेजारी बसलेल्या आंधळय़ा भिकाऱ्याकडे गेली. दीनवाण्या चेहऱ्याने तो येणाऱ्या-जाणाऱ्यांकडे याचना करत होता. कितीतरी माणसं येत होती, खरेदी करून जात होती; पण कुणी त्याच्या हातावर चार पैसे ठेवत नव्हते. मुरलीधर गलबलला. त्याने पटकन खिशात हात घातला. फटाके उडवण्यापेक्षा त्याला माझ्या पैशांची गरज आहे, म्हणून त्याने फटाके खरेदी न करता सगळे आंधळय़ाला देऊन टाकले.
ही करुणा, दुसऱ्याबद्दलचा कळवळा आणि मदत करण्याची इच्छा प्रत्येकात उपजत असते. काहींच्यात ती खूप विकसित होते. काहीजण आयुष्यात खूप आत्मकेंद्रित होतात. इतरांकडे पाहण्यासाठी वेळ आणि दृष्टी दोन्हींचा अभाव निर्माण होतो त्यांच्यात. प्रत्येकाने ही जाणीव ठेवली तर आपल्या क्षमतेप्रमाणे थोडेफार समाजाचे ऋण प्रत्येकजण फेडू शकतो.
आजचा संकल्प - मी दुसऱ्यांशी प्रेमाने, करुणेने आणि कृतज्ञतेने नेहमी वागेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com