Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९

आबांचा शिवसेना-भाजपवर हल्लाबोल
पनवेल/प्रतिनिधी -
सर्वसामान्य नागरिकांना मताधिकार मिळण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी त्याग केला आहे. त्यामुळे कोणाला मत दिले तर देश शक्तिशाली आणि अखंड राहील, याचा विचार करा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळमधील उमेदवार आझम पानसरे यांनाच मत द्या, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांनी मंगळवारी येथे केले. नवीन पनवेलच्या सीकेटी शाळेच्या मैदानात आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. भारनियमन, प्रकल्पग्रस्तांच्या समस्या, सेझला होणारा विरोध आदी स्थानिक प्रश्नांवर भाष्य करण्याचे टाळत आबांनी शिवसेना आणि भाजपच्या धोरणांवर हल्लाबोल केला. केंद्रातील मनमोहन सिंग सरकारने मंदीची लाट थोपविली आणि विकास दर आठ टक्के राखला. भाजप नेते मात्र देशाच्या धर्मनिरपेक्षतेवर हल्ला करीत आहेत. ते हात तोडण्याची नव्हे तर देश तोडण्याची भाषा करीत आहेत. राममंदिराबाबतची त्यांची खरी घोषणा ‘मंदिर वही बनाएंगे, मगर तारीख नही बताएंगे’ अशीच असायला हवी, या शब्दांत त्यांनी भाजपचा समाचार घेतला. सत्तेवर आल्यास सुरक्षा देण्याच्या गप्पा मारणारे अडवाणी गृहमंत्री असतानाच कारगिलमध्ये युद्ध झाले आणि संसदेवरही हल्ला झाला, याकडे त्यांनी लक्ष वेधले. भाजपवर टीका करताना रंगात आलेल्या आबांची गाडी काहीशी घसरली आणि त्यांच्या पक्षाध्यक्षाला (बंगारू लक्ष्मण) एक लाखाची लाचसुद्धा घेता आली नाही, पकडला गेला, असे धक्कादायक विधान त्यांनी केले. संसदेवर हल्ला करणाऱ्या अफझल गुरूच्या नावाचेही त्यांना विस्मरण झाले आणि त्याचा उल्लेख त्यांनी चार ते पाच वेळा ‘अझहर’असा केला. विशेष म्हणजे व्यासपीठावरील एकाही नेत्याने ही चूक त्यांच्या लक्षात आणली नाही.
छत्रपतींच्या नावाने वडा काढण्याएवढे ते लहान नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी शिव-वडय़ाऐवजी ‘उद्धव भजी’ सुरू करावीत, आम्ही त्यांना सवलत देऊ, असे ते म्हणाले. एकेकाळी क्रांतीची स्वप्ने पाहणाऱ्या शेकापने अस्तित्वासाठी शिवसेनेशी केलेली युती म्हणजे राजकीय व्यभिचार आहे, अशा शब्दांत त्यांनी शेकापवर टीकास्त्र सोडले. आबांच्या या फटकेबाजीत उपस्थित हजारो श्रोत्यांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यांच्यापूर्वी माजी खासदार रामशेठ ठाकूर, शाम म्हात्रे, जगदीश गायकवाड, महेश तपासे आदींची भाषणे झाली.

काँग्रेसचा भ्रष्टाचार अधिक भयानक’
पनवेल/प्रतिनिधी -
शिवसेना-भाजपसारख्या जातीयवादी पक्षांशी युती केल्याबद्दल काँग्रेसचे नेते शेकापवर टीका करीत आहेत; परंतु जातीयवादापेक्षा काँग्रेसचा भ्रष्टाचार, बेरोजगारी, अपुरी सुरक्षा, ढासळती अर्थव्यवस्था अधिक भयानक आहे, अशी टीका शेकापचे आमदार विवेक पाटील यांनी येथे केली. मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचा तपशील देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार गजानन बाबर यांना सर्व तालुक्यांतून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने त्यांचा विजय निश्चित आहे, असा दावा त्यांनी केला. शेकापचे अस्तित्व धोक्यात आल्याने त्यांनी शिवसेना-भाजपशी युती केली आहे. तसेच शेकाप हा आता लहान पक्ष झाला आहे, अशी टीका काँग्रेस नेते करीत आहेत; परंतु हाच निकष लावला तर सव्वाशे वर्षांच्या या जुन्या पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी का करावी लागली, तसेच मावळ मतदारसंघाच्या जागावाटपात राष्ट्रवादीऐवजी आपल्या पदरात उमेदवारी का पाडता आली नाही, असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीचे श्रेय काँग्रेस घेत आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी केलेल्या ‘देता की जाता’ या आंदोलनामुळेच त्यांना तो निर्णय घ्यावा लागला, असे प्रतिपादन त्यांनी केले. काँग्रेस सरकार शेतकऱ्यांच्या जमिनी भांडवलदारांच्या घशात घालू पाहत आहे. शिवसेना-भाजप-शेकाप युतीने मात्र वेळोवेळी हे प्रयत्न हाणून पाडले आहेत. राज्यात आणि केंद्रात शिवसेना-भाजपचे सरकार आले तर रायगडमधील सेझ प्रकल्प रद्द करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी आम्हाला दिले आहे, असे ते म्हणाले. यावेळी शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख बबन पाटील, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे आदी उपस्थित होते.

मनसेचे कार्यकर्ते बजावणार नकाराधिकार!
पनवेल/प्रतिनिधी -
मावळ व रायगड लोकसभा मतदारसंघात मनसेचा उमेदवार नसल्याने, व पक्षाने कोणालाही पाठिंबा दिला नसल्याने या मतदारसंघात मनसे कार्यकर्ते नकाराधिकार बजावणार असल्याची माहिती मनसेचे शहर अध्यक्ष सुरेश सावंत यांनी दिली आहे. मनसेच्या मतदारांनीही ‘१७ अ’चा अर्ज भरून नकाराधिकार वापरावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. ज्या मतदारसंघात मनसेचे उमेदवार नाहीत तेथे तटस्थ राहून सामाजिक कामे सुरू ठेवण्याचा आदेश पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.