Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९

फूल और कांटे.. प्रचाराची मुदत अधिकृतपणे संपली असली तरी नाशिकमध्ये अप्रत्यक्ष मार्गाने अथवा छुप्या पद्धतीने सुरू झालेला प्रचार व पडद्याआडचे डावपेच यामुळे अंतिम चरणात निवडणूक अधिकाधिक गुंतागुंतीची बनत आहे. त्यामुळेच की काय, येथील खासदारकी ही जणू गुलबकावलीचे फूल प्राप्त करण्याएवढीच असाध्य गोष्ट असल्याची जाणीव तिन्ही प्रमुख उमेदवारांना झाल्याचे त्यांची देहबोली सांगते. त्या अनुषंगाने, प्रचाराची काटेरी वाट तुडवल्यावर का होईना शेवटी हाती असचं गुलाबाचं फूल येवो ही समीर भुजबळ यांची मनोकामना म्हणायची की, प्रतिस्पध्र्याना कसे नामोहरम करायचे या विवंचनेने ग्रासलेल्या दत्ता गायकवाडांच्या चेहऱ्यावरची अस्वस्था दिवसेंदिवस गहन बनत चाललेला हा प्रश्न सोडवायचा तरी कसा, त्याचे निदर्शक म्हणायची? तिसरे प्रतिस्पर्धी हेमंत गोडसे यांचा हा पवित्रा म्हणजे आपण देखील विजयाचा झेल टिपण्यास सज्ज असल्याचा संदेश समजायचा का?

रणरणत्या उन्हात आज उमेदवारांची ‘अग्नि’परीक्षा
प्रतिनिधी / नाशिक

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, दिंडोरी, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि रावेर या सहाही लोकसभा मतदार संघांत गुरूवारी मतदान होत आहे. मतदारसंघांची पुनर्रचना, त्यामुळे नव्याने निर्माण झालेली समीकरणे, बहुरंगी लढती, बंडखोरी, गटबाजी अशा विविध मुद्दय़ांमुळे जवळपास सर्वच ठिकाणच्या निवडणुका कधी नव्हे एवढय़ा चुरशीची होत आहेत. एवढे दिवस प्रचारासाठी जिवाचे रान करणाऱ्या उमेदवारांनी तसेच त्यांच्या समर्थकांनी आता आपले सगळे लक्ष प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेवर केंद्रीत केले आहे.

पहिले ते मतदान!
भाऊसाहेब : चल आटप की लवकर भावडय़ा, साडेसात वाजाया आले.
भावडय़ा : आज सकाळी सकाळी अगदी साडेसाती सारखे मागे लागलात माझ्या ते..
भाऊसाहेब : मद्दान सुरू झालं की समद्यांच्या अदुगर मत टाकायचा आपला नेम हाय.
भाऊराव : एवढय़ा वर्षांनंतरही तुमचा उत्साह तसाच टिकून आहे, हे विशेष. नाहीतर हा भावडय़ा, चार वेळा हाका मारायला लागल्या तेव्हा उठला झोपेतून.

नवमतदारांना हवा विकासमार्गी खासदार
पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण

नाशिक / प्रतिनिधी

उत्तर महारष्ट्रातील आठ लोकसभा मतदारसंघातील नवमतदारांना स्थानिक समस्या सोडविणारा, विकासावर भर देणारा, जाती-धर्माचे कोणतेही राजकारण न करणारा खासदार हवा आहे. शिक्षण-आरोग्य या समस्यांबरोबर बेरोजगारांचे प्रश्न खासदाराने सोडवावेत ही या नवमतदारांची अपेक्षा असल्याचे एका पाहणीत आढळून आले. येथील हं.प्रा.ठा. महाविद्यालयाच्या नामदार गोपाळकृष्ण गोखले स्कूल ऑफ कम्युनिकेशन अ‍ॅण्ड जर्नालिझम विभागातील विद्यार्थ्यांनी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, िदडोरी, जळगाव, रावेर, नंदुरबार, धुळे, अहमदनगर आणि शिर्डी अशा आठ मतदारसंघात जाऊन प्रत्यक्ष प्रचार यंत्रणेचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे मतदार, नवमतदार, उमेदवार, कार्यकर्ते यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन मते आजमावली. नवमतदारांच्या अपेक्षा काय आहेत यावर विशेष भर देण्यात आला.

होय, मी लोकशाहीप्रधान भारतात राहतो !
लोकसभेसाठी आज मतदान. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आविष्कार करण्याची आणखी एक संधी यानिमित्ताने मतदारांना उपलब्ध झाली आहे. अनेक प्रश्नांवर सर्वसामान्य नागरीक बऱ्याचदा कोणाच्यातरी दडपणामुळे उघडपणे काहीच बोलत नाही, परंतु त्याच्या मनात दडलेल्या सुप्त भावना तो मतपेटीद्वारे व्यक्त करतो, असा आजवरचा अनुभव आहे. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मतदारांच्या मनात सुरू असलेल्या भावनांची ही एक प्रातिनिधीक प्रतिक्रिया. लोकांनी, लोकांसाठी चालविलेले लोकांचे राज्य म्हणजे लोकशाही. लोकशाहीने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क दिल्यामुळे प्रासंगिक विषयांवर आपले मत नोंदवण्यास आपण सज्ज झालो. पावसाळ्यात तुंबलेले पाणी असो, गणपती विसर्जन करावे की नाही असा विषय असो, प्रत्येक गोष्टीवर भाष्य करायचे हा भारतीय नागरिकांचा स्वभाव. त्यास मी अपवाद कसा?

जळगावमध्ये उमेदवारांपेक्षा नेत्यांची प्रतिष्ठा पणास
घडामोडी, जळगाव / वार्ताहर

जळगाव लोकसभा मतदारसंघातील १५ लाख ४९ हजार ३९१ मतदार एकूण १३ उमेदवारांमधून आपला प्रतिनिधी निवडण्यासाठी गुरूवारी मतदानाला सामोरे जाणार आहेत. उमेदवारांची गर्दी असली तरी राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार अ‍ॅड. वसंत मोरे व भाजपचे ए. टी. पाटील यांच्यात मुख्य लढत होत आहे. विकासकामांच्या मुद्यांपासून तर राष्ट्रीय पातळीवरील देशाची सुरक्षितता, वाढती महागाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयांवर प्रामुख्याने जाहीर प्रचार सभांमध्ये भर देण्यात आला.

जीवन निर्माण संस्थेतर्फे मतदान जागृती अभियान
नाशिक / प्रतिनिधी

जगातील सर्वात मोठय़ा लोकशाहीचा मान आपल्याला मिळतो याचा सर्वानी अभिमान बाळगावा आणि तिचे पावित्र्य सर्वानी मतदान प्रक्रियेत भाग घेवून राखावे, असे आवाहन येथील जीवन निर्माण सामाजिक व बहुउद्देशीय संस्थेतर्फे करण्यात आले आहे. मतदानास जाताना निवडणूक आयोगाने दिलेले छायाचित्र मतदार ओळखपत्र नसल्यास १४ प्रकारच्या पुराव्यापैकी एकतरी पुरावा घेवून जाणे, तसेच कोणत्याही पक्षाच्या वाहनातून मतदानास जाणे टाळावे, राजकीय पक्षांकडून, नेत्यांकडून किंवा कार्यकर्त्यांकडून दिली जाणारी प्रलोभने, देणगी, बक्षीस रुपाने दिली जाणारी वस्तू वगैरे स्वीकारून लोकशाहीची थट्टा करू नये, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी कर्मचाऱ्यांना मदत करतानाच त्यांच्याशी वाद-विवाद होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. मतदान केंद्रावर जाताना भ्रमणध्वनी नेण्यास परवानगी नसल्यामुळे घरीच ठेवून जावे अन्यथा नियमानुसार गुन्हा दाखल होवू शकतो, असे संस्थेने म्हटले आहे. भ्रष्टाचारी, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांना मतदान करणे टाळावे, प्रत्येकाने मतदान अवश्य करावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, उपाध्यक्ष राम बोरसे, संजय बेदाडे, विनोद पाटील, कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. अनिल खैरनार, संजय अहिरराव, मेघा खैरनार, चारुशीला पाटील, सुषमा बेदाडे आदींनी केले आहे.

दिंडोरीतील पंचरंगी लढतीला नाराजीचे ग्रहण
वणी / वार्ताहर

मतदानाच्या पूर्वसंध्येपर्यंत दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अफवा पसरविण्याचे उद्योग सुरूच असल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून काय खरे आणि काय खोटे हेच त्यांना समजेनासे झाले आहे. अपक्ष उमेदवार भिका बर्डे यांचे निधन झाल्याने मतदारसंघात आता पंचरंगी लढत होणार आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार नरहरी झिरवाळ, भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण, माकपचे जिवा पांडु गावीत यांच्यात मुख्य लढत होत असून माकप वगळता इतर सर्वच पक्षांना नाराजीचा सामना करावा लागला. झिरवाळ यांच्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील या नेत्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेतल्या. पक्षातील नाराज मंडळींची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सर्वच नेत्यांनी करून पाहिला, परंतु तो फारसा यशस्वी झाला नसल्याचेच नंतर दिसून आले. राष्ट्रवादीच्या प्रचार फेऱ्यांवर त्याचा स्पष्टपणे परिणाम अनेक ठिकाणी जाणवला. दिंडोरीत आघाडीचे अनेक बडे नेते प्रचारापासून अलिप्त असून प्रतिस्पर्धी उमेदवाराशी त्यांनी सलोख्याचे संबंध प्रस्थापित केल्याची चर्चा आहे. कळवण, दिंडोरी, सुरगाणा, नांदगाव व चांदवडमध्येही विविध अफवा पसरल्या आहेत. या अफवा कशा थांबवाव्यात, हा प्रश्न आघाडीसमोर आहे. चांदवडमध्ये आजी-माजी आमदारांमधील संघर्षांची झळ झिरवाळ यांना बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पाश्र्वभूमीवर झिरवाळ यांचे अधिक लक्ष निफाड व येवला या दोन मतदारसंघांकडे लागले आहे. दुसरीकडे भाजप-सेना युतीचे उमेदवार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मात्र स्वपक्ष व मित्रपक्षातील नाराजी मिटविण्यात लवकर यश मिळविले. आघाडीतील नाराज मंडळींचे मिळणारे सहकार्य चव्हाण यांच्यासाठी अधिक महत्वाचे ठरत असून चव्हाण हे सर्वच विधानसभा मतदारसंघांमधून आघाडी मिळवतील असा दावा युतीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. अधिकाधिक मतदान होण्यासाठी युतीने नियोजन केले असून पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपवली असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात येते. माकपचे जिवा पांडु गावीत हे मात्र नाराजीच्या चक्रव्यूहापासून दूरच राहिले. त्यामुळे त्यांच्या प्रचारात तिसऱ्या आघाडीचे सर्वच घटक गंभीरपणे सामील झाल्याचे चित्र दिसले. निफाड, येवला मतदारसंघात मात्र त्यांची ताकद मर्यादित असल्याने त्याचा परिणाम त्यांच्या मताधिक्यावर होणे शक्य आहे.