Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९

धुळ्यात सर्वाना मत विभागणीची धास्ती
धुळे / वार्ताहर

प्रचाराची रणधुमाळी संपल्याने कोणत्या भागातून आपणास अधिक प्रतिसाद मिळाला, त्या भागातील मतदारांना केंद्रापर्यंत नेण्यासाठी काय करता येईल, याविषयी सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष दिल्याने परिणामी निम्म्यापेक्षा अधिक मतदान होण्याची चिन्हे धुळे लोकसभा मतदारसंघात दिसत आहेत. प्रत्येक पक्षाचे समर्थक आपली बाजू मजबूत असल्याचा दावा करीत असले तरी प्रत्येकाला मत विभागणीची धास्ती वाटत आहे. काँग्रेस आघाडीचे उमेदवार अमरिश पटेल यांच्यासाठी शेवटच्या टप्प्यात दोंडाईचा येथे सोनिया गांधी यांची प्रचार सभा झाली.

संवेदनशील मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षकांच्या कॅमेऱ्याची नजर
धुळे / वार्ताहर

धुळे लोकसभा मतदारसंघात निर्भिड व मुक्त वातावरणात मतदान प्रक्रिया होण्यासाठी मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसराबाहेर मतदारांच्या मदतीसाठी ‘मतदार सहाय्य केंद्र’ स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी प्राजक्ता लवंगारे यांनी दिली आहे. संवेदनशील केंद्रांवर ६८ सूक्ष्म निरीक्षक मतदानाचे चित्रीकरण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी निर्भिडपणे मतदान होण्यासाठी आयोजित उपाय योजनांची माहिती दिली.

रेल्वेच्या ई तिकीटातील नियमांमुळे प्रवाशांना आर्थिक भरुदड
भुसावळ / वार्ताहर

भारतीय रेल्वेची एक संलग्न संस्था असलेल्या भारतीय रेल्वे खानपान आणि टुरिझम कंपनीद्वारे (आयआरसीटीसी) किंवा या संस्थेची मान्यता असलेल्या खासगी कंपन्या व एजंट प्रतिनिधीतर्फे इंटरनेटद्वारे विक्री केल्या जाणाऱ्या ई-तिकीटांचा प्रवासा दरम्यान प्रवाशांना मोठय़ा प्रमाणात आर्थिक भरुदड सोसावा लागत आहे. भारतीय रेल्वे प्रवाशांना वेळोवेळी विविध सुविधा उपलब्ध करून देत असते. त्याचाच एक भाग म्हणजे आयआरसीटीसी किंवा त्याच्या मान्यताप्राप्त प्रतिनिधीद्वारे इ तिकीट विक्री. ही सुविधा देण्यामागील हेतू म्हणजे आरक्षण केंद्रावरील गर्दी कमी करणे आणि प्रवाशांना घरबसल्या आरक्षण करता यावे हा आहे.

टपाल कार्यालयातही सुचल्या त्यांना कविता
अमळनेर /वार्ताहर

टपाल कार्यालयातील रूक्ष व साचेबध्द वातावरणात कार्यरत असताना एखाद्या कर्मचाऱ्याला कविता सुचणे म्हणजे आश्चर्यच म्हणावयास हवे. परंतु अशा वातावरणात केवळ एक नव्हे, दोन नव्हे तर अनेक कवितांचा संग्रहच प्रकाशित करण्याची किमया पारोळा टपाल कार्यालयातील रमेश पवार यांनी केली आहे. गावाकडील अनुभव, नातेसंबंध, ग्रामसंस्कृती या सर्वाचे वर्णन शब्दबद्ध केलेल्या रमेश पवार यांच्या ‘एक माळरान ओसाड’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन येथील रोटरी हॉलच्या प्रांगणात प्रा. इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कवी उत्तम कोळगावकर, औरंगाबादचे समीक्षक प्रा. प्रदीप देशपांडे, धुळ्याचे डाक अधीक्षक एन. एस. साबळे, कीर्ती प्रकाशनचे सूर्यकांत दाणेकर उपस्थित होते. अमळनेर तसे साहित्यिकांचे गाव. १९५३ मध्ये या गांवात अखिल भारतीय साहित्य संमेलन भरले होते.

भगूर पालिकेकडून डेली मार्केटकडे दुर्लक्ष
भगूर / वार्ताहर

नगरपालिकेमार्फत शहरात उभारण्यात आलेल्या डेली मार्केटची दुरूस्ती होत नसल्याने बाजार परिसरात अस्वच्छता निर्माण झाली असून वैतागलेल्या व्यापाऱ्यांवर बाजार सोडून रस्त्यावर भाजीविक्री करण्याची वेळ आली आहे. नगरपालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे बाजाराची दुरूस्ती होत नसल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. शिवाजी चौकाच्या अगदी बाजूला नगरपालिकेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर डेली मार्केटची संकल्पना मांडली होती. ती प्रत्यक्षात आणली गेली. मार्केट अस्तित्वात येवून दोन दशकांचा कालावधी लोटल्यानंतरही या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी रस्त्याची आरक्षित केलेली जागा नगरपालिका ताब्यात घेवू शकली नाही. परिणामी, दिशाहिन बनलेला हा बाजार बंद पडण्याची वेळ येवून ठेपली आहे. पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने बाजाराला कोणी वाली नाही. बाजारातील भाजी विक्रीचे शेड म्हणजे टांगती तलवार झाले आहे. कोणत्याही क्षणी हे शेड कोसण्याची भीती व्यापारी व विक्रेते व्यक्त करतात. बाजारातील समस्यांबाबत प्रशासन उदासिन असल्याने १९ व्यापाऱ्यांनी येथील आपला व्यवसाय बंद केला आणि जिथे जागा उपलब्ध होईल, तिथे व्यवसाय थाटून उदरनिर्वाह चालविला आहे. बाजारात जाण्यासाठी एकच मार्ग असून तेथे काही विक्रेत्यांनी पक्के बांधकाम करून अतिक्रमण केले आहे. महत्वाची बाब म्हणजे, हे अतिक्रमण काढण्यास पालिका टाळाटाळ करते. बाजार परिसराची स्वच्छता होत नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ताजा भाजीपाला येथे विक्रीला असला तरी परिसराच्या अस्वच्छतेमुळे ग्राहक येथे जाण्यास तयार होत नाही. अनेक व्यापाऱ्यांनी शिवाजी चौकात वाहतुकीस अडथळा होईल अशाप्रकारे दुकाने थाटली आहेत तर काही जणांनी रस्त्याच्या बाजूला आपला व्यवसाय चालविला आहे. लोकप्रतिनिधी या प्रश्नावर मूग गिळून गप्प आहेत. बाजारातील कॉक्रिटीकरण पूणत खराब झाले आहे. बाजारातील स्वच्छतागृह केवळ देखावा ठरले आहे. बाजारासाठी पाण्याची टाकी बांधण्यात आली, पण तिच्यात कधी पाण्याचा थेंब साठू शकला नाही. अशा विविध समस्यांच्या विळख्यात पालिकेचे हे बाजार सापडले आहे. सध्या पालिकेने बाजाराची दुरूस्ती न करता ते पूर्णपणे जमीनदोस्त करून नवीन बाजार संकुल उभारण्याची कल्पना पुढे आणली आहे. तथापि, आधीच बाजाराच्या उभारणीसाठी घेतलेल्या कर्जाची अद्याप परतफेड झालेली नसताना बाजार जमीनदोस्त करण्याचा अधिकार कसा वापरणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.