Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९
विशेष

ओबामांचा ‘बो!’
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा एकीकडे अमेरिकी अर्थव्यवस्था मंदीच्या खाईतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत असताना दुसरीकडे आपल्या छोटय़ा मुलींचा हट्टही पुरविताना दिसत आहेत. व्हाइट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्षांच्या कुटुंबात एका कुत्र्याची भर पडली असून, या लहानशा कुत्र्याची दखल अमेरिकी माध्यमांसह जगभरातील प्रसारमाध्यमांनी घेतली. आपल्या मुलींसाठी ओबामा यांनी बो नावाचा हा कुत्रा आणला. जागतिक पेचप्रसंग सोडविताना घरातल्यांचे कोडकौतुक करण्याकडे ओबामा लक्ष देत असल्याचे अशा घटनांवरून लक्षात घ्यायला हरकत नाही. केवळ ओबामा यांनाच नव्हे तर जगातील अन्य काही नेत्यांनाही कुत्रा, मांजर असे प्राणी पाळायची आवड होती. अगदी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्षही त्यास अपवाद नाहीत.

जातीयवादाच्या रोगाची राजकारणालाही लागण
ब्राह्मण समाजाची मते बहुसंख्येने कोणाकडे जाणार, हा पुण्याच्या निवडणुकीतील प्रमुख मुद्दय़ांपैकी एक मुद्दा झाला, हे यंदाच्या लोकसभा निवडणुकीचे वैशिष्टय़ ठरले. आतापर्यंत जनसंघ-भारतीय जनता पक्ष अशा हिंदूत्ववादी पक्षाची हमखास मते एवढाच उल्लेख होणारी ही मते आपला परंपरागत पक्ष कितपत सोडतील, यावर निवडणुकीचा निकाल बऱ्याच अंशी अवलंबून राहणार असल्याने या मतांकडे कधी नव्हे एवढय़ा उत्सुकतेने पाहण्यात येऊ लागले आहे. ब्राह्मण समाजाची स्वतंत्र राजकीय अस्मिता यामुळे जागी होईल, ही जमेची बाजू का संपूर्ण समाजाच्या दृष्टीने हानिकारक बाब? उत्तर पुणेकरांनी द्यायचे आहे. पुण्यामध्ये ब्राह्मण समाजाची मतदारसंख्या साडेचार लाखावर आहे.

आठवणीतली सुभाषिते..
जगभरात एकूण दहा हजारांहून अधिक भाषा बोलल्या जात असून त्यातील निम्म्याहून अधिक नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यापैकी भारतात ज्या १६५२ भाषा बोलल्या जातात, त्यातील २२ भाषा मान्यताप्राप्त आहेत. एखादी भाषा नष्ट होणे म्हणजे त्या भाषेशी निगडीत सर्व सांस्कृतिक आणि सामाजिक दस्तऐवज कायमचे काळाच्या पडद्याआड जाणे होय. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघाने २००८ हे आंतरराष्ट्रीय भाषा वर्ष म्हणून जाहीर केले होते. संस्कृत ही भारतीय उपखंडातील एक प्राचीन आणि समृद्ध साहित्याची परंपरा असणारी भाषा. देवनागरी लिपीतील सर्व भाषांची जननी. मात्र आधुनिकतेच्या रेटय़ात ही भाषाही हळूहळू ऱ्हास पावत आहे. युनोने जाहीर केलेल्या भाषा संवर्धनाच्या या उपक्रमात आपलेही योगदान असावे, याहेतूने मुंबईतील सुभाष भांडारकर यांनी लहानपणी पाठ केलेली आणि अद्याप स्मरणात असलेली संस्कृत सुभाषिते संकलीत करून त्याचे एक पुस्तक ‘आठवणीतील संस्कृत सुभाषिते' म्हणून प्रसिद्ध केले. बहुतांश इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या आताच्या पिढीला या संस्कृत सुभाषितांचा आस्वाद घेता यावा म्हणून त्यांचा मराठी तसेच इंग्रजीत भावार्थही या पुस्तकात त्यांनी दिला आहे.
लोभमूलानि पापानि व्याधयो रसमूलका !
स्नेहमूलानि दुखानि त्रयं त्यक्त्वा सुखी भवेत !!
अर्थात- सर्व पापांचे मूळ अतिलोभात, सर्व व्याधींचे मूळ अभक्ष्यभक्षणात, तर सर्व दुखांचे मूळ अतिमोहात आहे. ही त्रयी
टाळून जीवनात सुखी व्हा!
किंवा
वैद्यराज नमस्तुभं यमज्येष्ठसहोदर !
यमस्तु हरति प्राणान् त्वं तु प्राणान् धनान्यपि !!
अर्थात- हे यमाच्या वडिलबंधो वैद्यराजा, तुला माझा नमस्कार असो
यम प्राणच हरण करतो, पण तू तर प्राण व धन दोन्हींचे हरण करतोस !
अशी अनेक संस्कृत सुभाषिते या पुस्तकात त्याच्या मराठी आणि इंग्रजी भावार्थासह देण्यात आली आहेत.
वरं पर्वतदुर्गेषु भ्रान्तं वनचरै सह !
मूर्खजनसंपर्को सुरेन्द्रभवनेष्वपि !!
मुर्खाच्या संगतीत इन्दाच्या महालात राहण्यापेक्षा एखाद्या अरण्यात जनावरांच्या संगतीत राहणे श्रेयकर होय ! या सुभाषिताने आपल्याला ‘मुर्खाचा मालक होण्यापेक्षा शहाण्याचा नोकर होणे चांगले' या वाक्प्रचाराची आठवण होते. आठवणीतली ही सुभाषिते संकलित करून सुभाष भांडारकरांनी नव्या पिढीला संस्कृत भाषेतील संस्कृत भाषेतील या मौलिक विचारसौदर्याचा परिचय करून दिला आहे. एखाद्या भाषेच्या संवर्धनासाठी व्यक्तिगतरित्या काय करता येऊ शकते याचा वस्तुपाठच त्यांनी या उपक्रमाद्वारे समाजापुढे ठेवला आहे.
संपर्क-०२२-२६६५१३८४.
प्रशांत मोरे
moreprashant2000@gmail.com