Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९

अब तुम्हारे हवाले..
पुन्हा संधी मिळेल

‘‘विकास ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. गेली काही वर्षे या प्रक्रियेत मी वेगाने काम करत आहे. काही केले आहे आणि आणखी खूप काही करायचे आहे. या शहरासाठी आणखी जे काम करायचे आहे, त्याला गती मिळावी म्हणून मला निवडून द्या अशी भूमिका मी जाहीर केली आहे आणि माझी ही भूमिका पुणेकर स्वीकारतील व मला निवडून देतील,’’ असा विश्वास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व आरपीआय आघाडीचे उमेदवार खासदार सुरेश कलमाडी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला. आपल्या विजयाचे समीकरण मांडताना कलमाडी यांनी सांगितले की, मतदारसंघाची पुनर्रचना झाल्याने पुण्यातील मतदारांची संख्या वाढली असून, त्याचाच मला लाभ मिळेल आणि गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्याने मी निवडून येईन.

पुणेकरांना परिवर्तन हवे
‘‘विकासकामांमधील भ्रष्टाचार, गैरकारभार, अनेक योजनांचा उडालेला फज्जा आणि त्यामुळे पुण्याला आलेल्या बकालपणा याला पुणेकर कंटाळले असून, त्यांना परिवर्तन हवे असल्याचे गेल्या तीन आठवडय़ांच्या प्रचारात पाहायला मिळाले. याशिवाय भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतलेले श्रम आणि समाजाच्या विविध वर्गातून मिळणारा पाठिंबा पाहता मी ५० हजारांहून अधिक मताधिक्याने विजयी होईन!’’ भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार अनिल शिरोळे यांनी आज असा विश्वास व्यक्त केला. आपल्या प्रचारासाठी युतीतील कार्यकर्ते, तसेच विविध संस्था, संघटना व मित्र परिवार मिळून एकूण सात ते दहा हजार कार्यकर्ते गेले तीन आठवडे मतदारांच्या संपर्कात होते.

मतदारांचा माझ्यावर विश्वास
‘‘राजकारणात माझी पाटी कोरी असली, तरी स्वच्छ चारित्र्य, प्रामाणिकपणा व लोकांचे प्रेम या माझ्या जमेच्या बाजू आहेत. प्रत्यक्ष गाठीभेटींबरोबरच अत्याधुनिक ‘वेबटॉक’च्या माध्यमातून पुण्याच्या समस्या व त्यावरील उपाय घेऊन मी मतदारांसमोर गेलो. मनातील दुखाला वाचा फोडणारा आणि न विकला जाणारा उमेदवार मिळाल्याने मतदार पूर्ण विश्वासाने माझ्या मागे उभे राहिले आहेत,’’ असा विश्वास पुणे लोकसभा मतदारसंघातील बहुजन समाज पक्षाचे उमेदवार डी. एस. कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

पुणे हीच माझी व्होटबँक!
जातीपाती, धर्म आणि सामाजिक भेदाच्या राजकारणामुळे पुण्याच्या विकासाला खीळ बसली आहे. म्हणूनच, अशा पॉकेट्सच्या जोरावर मी प्रचार केला नाही. संपूर्ण पुणे हीच माझी ‘व्होट बँक’ आहे!.. .. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार रणजित शिरोळे सांगत होते. संपूर्ण शहर पिंजून काढणाऱ्या प्रचारफेऱ्यांच्या जोडीला राज ठाकरे यांच्या विक्रमी सभेच्या धडाक्याने आपण पुणेकरांना मतांची साद घातली आहे. तेवढय़ाच उत्स्फूर्ततेने ते आपल्याला प्रतिसाद देतील, असा विश्वास रणजित व्यक्त करतात.

पुणेकर साथ देतील
‘‘महापालिकेच्या विकासकामात चाळीस टक्के भ्रष्टाचार होतो, त्याला आळा घालण्यासाठीच निवडणुकीसाठी उभे राहिलो आहोत. पुढारी, ठेकेदार आणि नोकरशाह यांच्यातच चाळीस टक्के निधी विभागला जातो. विकासाची कामे दिसतात मात्र त्याचा प्रत्यक्षात दर्जा घसरलेला असतो. भ्रष्टाचारविरोधी लढाईसाठी रिंगणात उभे राहिलो आणि त्यासाठी पुणेकर आपल्याला साथ देतील. पीपल्स गार्डियनचे लोकसभेचे उमेदवार अरुण भाटिया यांनी आपल्या उमेदवारी मागील भूमिका ‘लोकसत्ता’कडे मांडली. त्या वेळी भ्रष्टाचार विरोधी लढाईत पुणेकर साथ देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकांना बदल हवा आहे..
वैयक्तिक संपर्क, गाठीभेटी, कोपरा सभा, पत्रके, तसेच ई- मेल व एसएमएसद्वारे आपण साडेसहा लाख मतदारांपर्यंत पोहोचलो. निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर मिळालेल्या अवघ्या अकरा दिवसात इतक्या मतदारांपर्यंत पोहोचण्यात आपल्याला यश आले असून आपला ‘बदलनामा’ मतदारांना भावतो आहे, याचे विशेष समाधान आहे. लोकांना बदल हवा आहे, आणि उद्याच्या मतदानातून ते तो करतील. सांगत होते पुणे लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार व माजी पोलीस अधिकारी विक्रम बोके. प्रचाराची सांगता झाल्याने रिलॅक्स मूडमध्ये त्यांनी मनमोकळा संवाद साधला.

राजा शिवछत्रपती मालिकेत उद्या ‘अफझलखानाचा वध’
पुणे, २२ एप्रिल/प्रतिनिधी

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सध्या प्रक्षेपित केल्या जाणाऱ्या ‘राजा शिवछत्रपती’ या लोकप्रिय मालिकेत येत्या शुक्रवारी अफजलखानाच्या वधाचा प्रसंग पाहायला मिळेल. छत्रपती शिवाजीमहाराज व अफझलखान यांची भेट प्रतापगडाच्या पायथ्याशी ठरते व शिवाजीमहाराज या दगाबाज अफझलखानाचा कसा वध करतात हा प्रसंग या मालिकेत अत्यंत चित्तथरारक अशा पद्धतीने चित्रित करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजीमहाराजांचे अलौकिक कार्य रोमहर्षक पद्धतीने सांगणाऱ्या या मालिकेने आता चांगली गती घेतली आहे. शिवाजीमहाराजांचे काम डॉ. अमोल कोल्हे या तरुण अभिनेत्याने केले असून, अफझलखानाच्या भूमिकेत शैलेश दिगंबरे पहावयास मिळतील. राजा शिवछत्रपती ही मालिका ‘स्टार प्रवाह’वर सोमवार ते शुक्रवार दरम्यान रोज रात्री ८.३० वाजता प्रक्षेपित केली जाते.

सोशालिस्ट फ्रंटचे मतदारांना आवाहन
पुणे, २२ एप्रिल/प्रतिनिधी

मतदारबांधवांनी आपले मत भारनियमनाच्या विरोधात, लोकांना व्यसनाधीन करणाऱ्यांच्या विरोधात आणि शेतक ऱ्यांच्या फसव्या कर्जमाफीच्या विरोधात देऊन आपला असंतोष व्यक्त करावा आणि अन्य कोणालाही मत द्यावे, असे आवाहन सोशालिस्ट फ्रंटच्या बैठकीत मतदारांना करण्यात आले. सोशालिस्ट फ्रंटच्या बैठकीस प्रताप होगाडे, संजीव साने, एम. आर. खान, सुभाष वारे, संजीव गायकवाड, नसरुद्दीन इनामदार आदी पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी मतदारांना आवाहन करण्याचा निर्णय घेण्यात आला. काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी ही अत्यंत संवेदनाहीन, बेदरकार व मुजोर असून, लोकांच्या समस्यांशी काहीही देणे-घेणे नसलेली आघाडी आहे. मागील पाच वर्षांत महिला आरक्षण विधेयक, असंघटितांना संरक्षण विधेयक, अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक हे प्रलंबित ठेवले, तर भाजप-सेना युती धर्मवाद, जात व अस्मितेच्या राजकारणात अडकल्यामुळे लोकांच्या वेदनांपासून कोसो मैल दूर आहेत. राष्ट्राच्या विकासाचा कोणताही सुस्पष्ट कार्यक्रम त्यांच्याकडे नाही. म्हणून इतर उमेदवारांना मतदान करावे, असेही आवाहन करण्यात आले. सर्व सजग व संवेदनशील मतदारांना आणि समता, बंधुता निर्माण करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांना सोशालिस्ट फ्रंटचे मावळ मतदारसंघातून निवडणूक लढविणारे उमेदवार मारुती भापकर व पुण्यातील उमेदवार अमानउल्लाह खान यांना मते देऊन विजयी करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

कडक उन्हात मतदारांना बाहेर काढण्याचे पक्षांसमोर आव्हान
पिंपरी, २२ एप्रिल / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकांसाठी कधी नव्हे तेवढी उत्सुकता निर्माण झाली असताना चाळीस अंशापेक्षा जास्त तापमान असल्याने रणरणत्या उन्हात मतदारांना बाहेर काढण्याचे आव्हान सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांसमोर आहे. मावळ आणि शिरुर मतदारसंघात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत थेट लढत आहे. मावळात सेनेचे जिल्हाप्रमुख गजानन बाबर आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आझम पानसरे यांच्यात तर शिरुरमध्ये सेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव आणि राष्ट्रवादीचे आमदार विलास लांडे यांच्यात जोरदार लढत होत आहे. अतिशय चुरशीच्या वातावरणात आमने-सामने होत असलेल्या या दोन्ही लढतीकडे राजकीय वतुर्ळाचे लक्ष लागले आहे. विचित्र मतदारसंघ म्हणून मावळकडे पाहिले जाते. तर, शिरुर हा विस्तीर्ण पसरलेला मतदारसंघ आहे. शहरी भाग, झोपडपट्टय़ा, वाडय़ा, वस्त्या आणि छोटय़ा गावांचा समावेश असणाऱ्या या दोन्ही मतदारसंघात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना बरेच कष्ट घ्यावे लागले. आता प्रत्यक्ष मतदान करवून घेण्याची तितकीच अवघड जबाबदारी उमेदवार तसेच त्यांच्या समर्थकांवर आहे. हक्काचे अधिकाधिक मतदार बाहेर काढू शकणाऱ्या उमेदवारास त्याचा निश्चितपणे फायदा होणार असला तरी मतदारांमध्ये निरुत्साह असल्याचे दिसते, त्यात सकाळी दहापासून रणरणत्या उन्हाचा चटका जाणवतो आहे. अशा परिस्थितीत सकाळीच अधिकाधिक मतदान उरकून घेण्याचा कल उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांंमध्ये दिसून येतो आहे.

वीजकपातीची वेळ निश्चित करण्याची इंडियन मेडिकल असोसिएशनची मागणी
पुणे, २२ एप्रिल/ प्रतिनिधी

पूर्वसूचना न देता कोणत्याही वेळेला वीजकपात केली जात असल्याने त्याचा परिणाम रुग्णालय रुग्णसेवेवर होत आहे. त्यामुळे कपातीबाबत वेळ ठरविण्यात यावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेच्या वतीने करण्यात आली आहे. शाखेचे अध्यक्ष डॉ. दिलीप सारडा, सचिव डॉ. माया तुळपुळे, डॉ. अरुण हाळबे यांनी याबाबत ‘महावितरण’कडे निवेदन दिले आहे. शहरामध्ये मागील काही दिवसांपासून कोणत्याही वेळेला वीजपुरवठा खंडीत केला जातो. वीजकपातीच्या वेळा रोजच्या रोज बदलल्या जातात. अशा परिस्थितीमध्ये रुग्णालयांमधील नियोजन कोलमडून पडते. जीवरक्षक यंत्रणा त्याचप्रमाणे एखादी शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन असल्यास त्यामध्ये अनेक अडचणी येतात. त्यामुळे वीजकपातीबाबत ठराविक वेळा असाव्यात व त्याबाबत रुग्णालयांना पूर्वसूचना देण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. रुग्णालयांमध्ये जनरेटरची व्यवस्था असते. मात्र, त्याचा बोजा रुग्णांवरच पडतो. काही छोटय़ा रुग्णालयांना जनरेटरचा खर्च परवडणाराही नसतो. त्यामुळे विजेच्या प्रश्नाबाबत तातडीने विचार व्हावा. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने रुग्णालयांना अखंडीत विजेबाबतच्या सूचना केल्या आहेत. मात्र, त्यानुसार थेट राज्याच्या ग्रीडमधून रुग्णालयांना वीज देण्याबाबतचा विचार व्हावा, अशा मागण्याही असोसिएशनच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

न्यू कोपरे ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार
पुणे, २२ एप्रिल / खास प्रतिनिधी

न्यू कोपरे ग्रामस्थांची पुनर्वसन प्रकल्पात फसवणूक झाली असून त्याच्या निषेधार्थ लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकत असल्याचा इशारा न्यू कोपरे पुनर्वसन हक्क संरक्षण कृती फौंडेशनने दिला आहे. याबाबत फौंडेशनने राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र दिले
आहे. कर्वेनगर येथील सव्‍‌र्हे क्रमांक १६, १८, १९, ५१ व ५३ वर न्यू कोपरे पुनर्वसन प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पात ग्रामस्थांना सदनिका देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु ते न पाळता या प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार केला असल्याची तक्रार फौंडेशनचे अध्यक्ष सुरेश मोरे यांनी केली आहे. या प्रकल्पाची चौकशी होऊन ग्रामस्थांना न्याय मिळण्यासाठी निवडणुकीवर बहिष्कार टाकत असल्याचे पत्र मोरे यांनी दिले आहे.

लोणावळ्यात दगडाने ठेचून मजुराचा खून; एक गंभीर
लोणावळा, २२ एप्रिल/वार्ताहर

लोणाळा रेल्वे स्टेशन परिसरात मटण मार्केटच्या मागील बाजूस मंगळवारी एका मजुराचा दगडाने डोके ठेचून खून करण्यात आला, तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला. मंगळवारी पहाटेच्या वेळी हा प्रकार घडला. हत्त्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकले नसले, तरी मयत व जखमी या दोघांमध्येच बाचाबाची होऊन खून झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. यातील मयताचे नाव अद्याप समजू शकले नाही, जखमीचे नाव बलराज परशुराम कैकाडी (वय अंदाजे ४० वर्षे) असे आहे. दीड वर्षांपूर्वी ५ ऑक्टोबर २००७ च्या रात्री अशीच भयंकर घटना लोणाव़ळयात भाजी मंडई परिसरात घडली होती. यात गर्दुल्यांनी नशापानाकरिता सात निष्पाप मजुरांची दगडाने ठेचून हत्त्या केली होती. त्याच पध्दतीने हा खून झाला असल्याने यामागे कोणी गर्दुली आहे का? याचाही शोध सुरू आहे. पोलीस निरिक्षक शांतीलाल मोरे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. खुना मागील नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी लवकरच या प्रकरणाचा छडा लावू असे सहायक पोलीस निरीक्षक. मोरे यांनी व्यक्त केला.

गाडीच्या धडकेने दोन ठार
लोणावळा, २२ एप्रिल/वार्ताहर

पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल ट्रेझर (कार्ला) समोर रस्ता ओलांडणाऱ्या दोघांना गाडीची धडक बसून झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. यात सिंधु सुरेश वाघमारे (रा. फांगणे वसाहत, ता. मावळ) याचा जागीच तर, सुरेश काळूराम वाघमारे (वय २५, रा. फांगणे वसाहत) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुंबईला जाणारी इंडिकाला एमएच-०५-एबी-६८२१ हा अपघात झाला.