Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

कोकण निवडणुकीत गाजला पर्यावरणाचा मुद्दा!
अभिमन्यू लोंढे
सावंतवाडी, २२ एप्रिल

 

कोकणच्या निसर्गसौंदर्याचा ऱ्हास होणाऱ्या प्रकल्पाविरोधात आवाज उठविणारा मुद्दा लोकसभा निवडणुकीत गाजला. हा मुद्दा मतदानाच्या स्वरुपात कोणाला लाभ मिळवून देतो, हे उद्या २३ एप्रिलला होणाऱ्या मतदानातन स्पष्ट होणार आहे. कोकणच्या पर्यावरणाच्या मुद्यामुळे अन्य सर्वच मुद्दे फिके पडले. वीज भारनियमन, प्रचंड महागाई, दहशतवाद, पाणी असे अनेक मुद्दे प्रचारात आले. रोजगाराचा मुद्दाही समोर आला, पण कळणे येथील खाण प्रकल्प आंदोलन व सुरक्षा रक्षकाचा गेलेला बळी यामुळे पर्यावरणाचाच मुद्दा आघाडीवर राहिला. खाण व औष्णिक वीज प्रकल्प विरोधातील मते त्यामुळे निश्चित झाली.
या निवडणुकीत नारायण राणे, उमेदवार नीलेश राणे यांनी शिवसेनेचे उमेदवार सुरेश प्रभू यांच्यावर सडकून टीका केली. या टीकेला प्रभू यांनी मवाळ भाषेत उत्तर देताना १३ वर्षे त्यांचा सोबती म्हणून चाललो, पण पुत्रप्रेमापोटी ते आरोप करीत असल्याची टीका केली.
नारायण राणे यांच्याच सिंधुदुर्ग म्हणून त्यांना ओळखले जात होते. पण या निवडणुकीत शिवसेना नेत्यांनी त्यांना जिल्ह्यात खिळवून ठेवले, हे नाकारून चालणार नाही. खासदार संजय राऊत यांनी रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचाराची राळ उठवून दिली.
राऊत यांच्यावर शिवसेनेचा पगारी नोकर म्हणून नारायण राणे यांनी टीका केली. त्यावर आपण प्रामाणिक पगारी नोकर असल्याचे राऊत यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली वरवडे येथे घडलेल्या घटना वगळता प्रचाराची समाप्ती शांतपणे झाली.
प्रभू, राणे व डॉ. परुळेकर यांनी विकासाची संकल्पना मांडली. ही भूमिका मांडताना प्रभू व परुळेकर यांनी पर्यावरणाचा मुद्दा आणून राणे यांची अडचण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राणे यांनी लोकांचा विरोध असणारे प्रकल्प आणले जाणार नाहीत, असे सांगितले.
या निवडणुकीत ग्रामीण भागातील विशेषत: जिल्हा परिषद मतदारसंघात जाहीर प्रचार सभा झाल्या. पावसाळा तोंडावर आल्याने लोक आपल्या कामात व्यस्त होते, तसेच आंबा, काजूपीक आल्याने लोकांची उपस्थिती कमीत असो. त्यामुळे उद्या होणाऱ्या मतदानप्रसंगी सर्वाना जागविणे महत्त्वाचे ठरणार आहे.