Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

कर्नाटकाच्या सहा जिल्ह्य़ात ‘सर्च’चा नवजात बालसेवा कार्यक्रम
गडचिरोली, २२ एप्रिल / वार्ताहर

 

डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांच्या ‘सर्च’ या संस्थेचा ‘नवजात बालसेवा’ हा उपक्रम कर्नाटकातील सहा जिल्ह्य़ांवर राबविला जाणार आहे. बालमृत्यू कमी करण्याच्या उद्देशाने जगातील विविध ठिकाणाचे पथक या उपक्रमाचा अभ्यास करण्यासाठी ‘सर्च’ मध्ये येत आहेत. याच उद्देशाने कर्नाटक राज्यातील आरोग्य खात्याचे पथक १७ ते २० एप्रिल दरम्यान सर्चमध्ये आले होते. कर्नाटकात एकूण १८ जिल्ह्य़ांमध्ये बालमृत्यूची भीषण समस्या असून हे १८ जिल्हे अतिशय मागास व अविकसित आहेत. या जिल्ह्य़ांमध्ये बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘सर्च’ चा नवजात बालसेवा कार्यक्रम वापरता येईल का? हे पाहण्यासाठी कर्नाटकचे पथक सर्चमध्ये दाखल झाले. पथकात कर्नाटक राज्य आरोग्य खात्याचे आयुक्त श्रीनिवासाचार्य, आरोग्य सचिव मदनगोपाल, डॉ. मोहनराज, आरोग्य उपसंचालक, डॉ. मंजुला, कुटुंब व बालकल्याणच्या डॉ. साधना, डॉ. नासीर, डॉ. जगदीश इत्यादी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. तसेच सर्च मध्ये येण्याअगोदर मार्च- २००९ मध्येच बंगलोर येथे सर्चच्या नवजात बालसेवा पद्धतीवर बंगलोर आरोग्य खात्याने परिषद आयोजित केली. आरोग्य खात्याचे वरिष्ठ अधिकारी व बालरोगतज्ज्ञांना ‘सर्च’च्या कार्यक्रमाची विस्तृत माहिती देण्यात आली. या परिषदेनंतर सर्चचा नवजात बालसेवा कार्यक्रम सविस्तर समजून घेण्यासाठी ८ सदस्यांच्या पथकाला गडचिरोली येथे पाठविण्यात आले. ४ दिवसांच्या या प्रशिक्षणात सर्चच्या नवजात बाळ विभाग पथक व डॉ. अभय बंग यांनी बालमृत्यू विषयाची वैज्ञानिक व तांत्रिक माहिती पथकाला दिली. ‘सर्च’ कार्यक्षेत्रातील बोधली आंबेशिवणी या गावाला भेट देऊन स्त्री आरोग्यदूत नवजात बाळाला वाचविण्याचे काम व औषध उपचार कशा पद्धतीने करतात याविषयी सर्चचे डी. परांजपे, डॉ. बैतुले, प्रिया परांजपे, महेश देशमुख यांनी दिले. सुरुवातीला कर्नाटकातील सहा जिल्ह्य़ांत सर्च हा कार्यक्रम राबविला जाईल, असा निर्णय घेऊन सर्च चमू च्या मदतीने त्या कामाचे नियोजन करण्यात आले. बालमृत्यू नक्कीच कमी करता येईल, हा विश्वास मनाशी बाळगून कर्नाटकचे पथक रवाना झाले.