Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

मनमाड रेल्वे वर्कशॉपमधील गर्डर्स तंत्रज्ञान चोरीचा प्रयत्न; दोघे ताब्यात
मनमाड, २२ एप्रिल / वार्ताहर

 

भारतीय रेल्वेच्या मनमाड सेंट्रल इंजिनिअरिंग वर्कशॉपचे महत्वपूर्ण उत्पादन असलेल्या ४०० फुटी स्पॅनच्या लोखंडी गर्डर्सचे तंत्रज्ञान व्हिडिओ चित्रीकरणाच्या सहाय्याने चोरून नेण्याचा प्रयत्न बुधवारी कर्मचाऱ्यांनी हाणून पाडला. कोकण, काश्मिर तसेच उत्तर प्रदेश राज्यात रेल्वेच्या मोठय़ा पुलांसाठी लागणारे ४०० फुटी स्पॅनचे गर्डर्सची निर्मिती मनमाड रेल्वे वर्कशॉपमध्ये होते. भारतात केवळ मनमाडमध्ये ते तयार केले जातात. इतर खासगी कंपन्यांनाही त्याची निर्मिती अद्याप करता आलेली नाही.
हे वैशिष्टय़पूर्ण तंत्रज्ञान चोरून नेण्यासाठी गोहाटी येथील रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर संगनमत करून दोन ठेकेदार रेल्वेचे अधिकारी असल्याचे भासवून वर्कशॉपमध्ये शिरले आणि त्यांनी कारखान्यातील गुप्त माहिती मिळवित छायाचित्रे काढली, व्हिडिओ चित्रीकरण केल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र, या दोन जणांची बोलण्याची पद्धत लक्षात घेता ते रेल्वेचे अधिकारी नसल्याचा संशय कर्मचाऱ्यांना आला. ही बाब त्यांनी मुख्य वर्कशॉप व्यवस्थापकाच्या निदर्शनास आणून दिली. प्रारंभी या तक्रारीकडे मुख्य कारखाना प्रबंधकांनी दुर्लक्ष करून कारवाई करण्यास टाळाटाळ केली. पण, वर्कशॉपमधील सर्वच कामगार संघटनांच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी दबाव आणल्यानंतर कारवाईचा निर्णय घेण्यात आला. अधिकारी बनून आलेल्या दोघा संशयितांविरुद्ध रेल्वे सुरक्षा दलाकडे तक्रार देण्यात आली आहे. या दोघांकडील कॅमेरे व इतर वस्तु जप्त करण्यात आल्या आहेत.
आयएसओ प्रमाणपत्र मिळवून देणारे ४०० फुटी गर्डर्सचे गुप्त राखण्यात आलेले तंत्रज्ञान चोरीच्या या प्रयत्नाचा कामगार संघटनांनी निषेध केला आहे. या कारखान्यात कोणत्याही बाहेरील व्यक्तीस प्रवेश नाही. छायाचित्रे काढता येत नाही. या परिस्थितीत संशयितांनी घुसखोरी करून तंत्रज्ञान पळविण्याचा प्रयत्न केल्यामुळे कामगारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.