Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

केवळ गावच नव्हे, तर ‘मनं’ जोडणारा पूल
संगमेश्वर, २२ एप्रिल/वार्ताहर

 

तालुक्याच्या खाडी भागातील फुणगूस-डिंगणी हा भव्य पूल केवळ दोन गावच नव्हे, तर या गावातील ग्रामस्थांची ‘मने’ जोडणारा पूल ठरला आहे. समोरासमोर असणाऱ्या फुणगूस व डिंगणी या दोन गावांचे संबंध या पुलामुळे अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.
तालुक्याच्या खाडी भागातील डिंगणी व फुणगूस ही समोरासमोर असणारी व नजरेच्या टप्प्यातील गावे आहेत, मात्र दोन्ही गावांच्या मध्ये खाडी असल्याने जवळ असूनही ही गावे एकमेकांपासून दूर गेल्यासारखी होती. २५ वर्षांपूर्वी डिंगणी गावासाठी संगमेश्वरमार्गे रस्ता तयार करण्यात आला व हा गाव संपर्काच्या कक्षात आला.
फुणगूस हे बंदर असल्याने येथे प्रवासी होडय़ा, बोटी व मच्छिमारी नौका पूर्वीपासून लागत होत्या. परिणामी, येथील बंदरावर मोठा गजबजाट असायचा. यामुळे डिंगणीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मासळी व बाजारहाटासाठी फुणगूस येथेच जायचे व आजही जातात. हाकेच्या अंतरावरील फुणगूस गावात जाण्यासाठी डिंगणीवासीयांना होडीची वाट पाहात ताटकळत राहावे लागत असे. बँक, आरोग्य केंद्र, बाजारपेठ फुणगूस येथेच असल्याने दररोज डिंगणीवासीयांना फुणगूसला जाणे क्रमप्राप्तच असायचे. फुणगूस येथील आठवडा बाजार दर मंगळवारी भरत असल्याने या दिवशी तर येथे मोठी गर्दी होत असते.
या पुलाचे महत्त्व व उपयोग तालुक्यात डिंगणी-फुणगूसवासीयांशिवाय अन्य कोणाला अपवादानेच कळेल. या पुलाने केवळ दोन गावच नव्हे, तर गावातील ग्रामस्थांची मने खऱ्या अर्थाने जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे.