Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

गावठी दारूविरुद्ध महिलांचा उद्रेक
जितेंद्र पराडकर
संगमेश्वर, २२ एप्रिल

 

कोकणात कष्टकरी समाज मोठय़ा संख्येने आहे. दिवसभर शेतीच्या हंगामात शेतामध्ये राबायचे व अन्य वेळी मोलमजुरी करून उदरनिर्वाह करायचा. कष्टाने थकलेल्या शरीराला मोकळीक देण्याच्या दृष्टीने सायंकाळी कष्टकरी समाजाचे पाय गावठी दारू अड्डय़ांकडे वळतात व दिवसभराची निम्मी कमाई दारूवर खर्च होते. या सर्वांचा परिणाम संसारावर होतो. यापूर्वी महिलांनी गावठी दारूविरुद्ध लढे दिले, परंतु त्याला यश आले नाही. मात्र गतवर्षीपासून तंटामुक्त गाव अभियान सुरू झाले आणि अवैध दारू विक्रेत्यांची पळता भुई थोडी झाली. अनेक वर्षे दारू व्यवसायामधून गब्बर बनलेल्या काही विक्रेत्यांनी मात्र तंटामुक्त समितीलाही न जुमानल्याने ठिकठिकाणच्या महिला या छुप्या दारूधंद्याविरुद्ध आक्रमक बनल्या असून, नारीशक्तीचा हा उद्रेक कायम राहिल्यास कोकणातून अवैध गावठी दारूचे उच्चाटन होणे शक्य होणार आहे.
कोणत्याही प्रकारची दारू ही शरीरास अपायकारकच आहे. काळ्या गुळापासून कोकणात तयार केली जाणारी गावठी दारू तर शरीरास सर्वाधिक धोकादायक आहे. या काळ्या गुळामध्ये चक्क किडे पडलेले असतात व दारू चढण्यासाठी त्यामध्ये बॅटरीचे सेलही टाकले जातात. अशा प्रकारे तयार केले जाणारे रसायन अनेक दिवस कुजत घातले जाते व त्यानंतर तयार केली जाणारी गावठी दारू शरीरावर घातक परिणाम करते. ही दारू विषारी बनून असंख्य कष्टकरी मंडळी मृत्यू पावल्याची उदाहरणे रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापूर्वी घडली आहेत.
‘गावठी दारू शरीरास घातक आहे’ एवढे सांगून ती दररोज पिणाऱ्या मंडळींचे प्रबोधन होत नाही. याचबरोबर अवैध दारूधंदे उद्ध्वस्त करण्यासाठी जिल्हा स्तरावर असणारे दारूबंदी खाते आपले कर्तव्य चोखपणे पार पाडत नसल्याने प्रत्येक वेळी याची जबाबदारी स्थानिक पोलीस ठाण्यांवर येते. स्थानिक पोलिसांकडून दारूबंदी खाते आपली जबाबदारी पार पाडत नसल्याचा सूर लावला जातो व यामध्ये दारू व्यावसायिकांचे फावते.
कोकणातील कष्टकरी मंडळींच्या संसाराची सूत्रे घरातील महिलेकडे असतात. घरातील कर्त्यां पुरुषाने आपल्या कमाईतील पैसे घरातील महिलेकडे आणून दिले तरच ती संसार चालवू शकते. अन्यथा बऱ्याच वेळी संसार चालविण्यासाठी या महिलेला स्वत:च मोलमजुरी करावी लागते अथवा छोटय़ा-छोटय़ा वस्तूंच्या विक्रीतून चार पैसे गाठी मारावे लागतात. सायंकाळी दारू पिऊन घरी येणाऱ्या नवऱ्याकडून घरात घातल्या जाणाऱ्या गोंधळाला पत्नी व मुले कंटाळलेली असतात. अवैध गावठी दारूधंद्याविरुद्ध यापूर्वी महिला आक्रमक झाल्या होत्या, परंतु त्यांना अपेक्षित नेतृत्व कधी लाभले नाही. गतवर्षीपासून सुरू झालेल्या तंटामुक्त गाव अभियानामुळे गावातून गावठी दारू हद्दपार करणे क्रमप्राप्त ठरले. यासाठी गावाला १५ गुण ठेवण्यात आल्याने अनेक गावांतून दारू व्यावसायिकांना पर्यायी व्यवसाय सुरू करून देण्यात आले व हा व्यवसाय सोडल्यामुळे त्यांचे जाहीर सत्कार करून त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यात आले.
गावातील तंटामुक्त समितीला न जुमानणाऱ्या काही परंपरागत अवैध दारू व्यावसायिकांसमोर रणरागिणीचा अवतार धारण करीत महिलांनीच धडा शिकविण्याचा निर्धार केला व त्याला यशही येऊ लागल्याने कोकणातून गावठी दारू हद्दपार करणे कठीण नसल्याचे महिलांनी दाखवून दिले आहे. संगमेश्वर तालुक्यातील धामापूर, ताम्हाने गावी यापूर्वी महिलांनी छुप्या अवैध दारू अड्डय़ांवर व भट्टय़ांवर चाल करून निर्मिती व धंदे उद्ध्वस्त करण्याचे धाडस दाखविले आहे, तर आरवली येथे गावठी दारूधंद्यातून गब्बर बनलेल्या मंडळींना महिलांनी एकत्र येऊन धंदे बंद करण्यास भाग पाडले आहे. देवरुखनजीकच्या तुळसणी गावातील २५० महिलांनी महिला मंडळाच्या अध्यक्षा वहिदा मुकादम यांच्या नेतृत्वाखाली थेट देवरुख पोलीस ठाण्यावर मोर्चा नेऊन संपूर्ण गावाला वेठीस धरणाऱ्या व महिलांना शिवीगाळ करून धमकावणाऱ्या चंद्रकांत लाड या दारू व्यावसायिकास अटक करायला पोलिसांना भाग पाडले.