Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

रायगड लोकसभा मतदारसंघात प्रचंड पोलीस बंदोबस्त
अलिबाग, २२ एप्रिल/प्रतिनिधी

 

रायगड लोकसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रे संवेदनशील, तर ५९ मतदान केंद्रे चिंताजनक म्हणून घोषित करण्यात आले असून, ४४ चिंताजनक मतदान केंद्रांवर संपूर्ण मतदान प्रक्रियेचे ‘डिजीटल रेकॉर्डिग’ करण्यात येणार असल्याची माहिती रायगड लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. निपुण विनायक यांनी दिली. या पाश्र्वभूमीवर उद्या (गुरुवारी) मतदारांना निर्भयपणे मतदान करता यावे, म्हणून जिल्हा पोलिसांनी कडक बंदोबस्त आजपासूनच सर्वत्र तैनात केला आहे.
निर्भय वातावरण निर्मितीसाठी प्रचार समाप्तीपासूनच सुरक्षा दलांचे सशस्त्र संचलन करण्यात येत असून, मतदानाच्या दिवशी दोन पोलीस अधीक्षक, १० पोलीस उपअधीक्षक, २५ पोलीस निरीक्षक, ११५ पोलीस उपनिरीक्षक, २६०० पोलीस जवान, ६०० गृहरक्षक दलाचे जवान, १०० पोलीस महिला होमगार्ड, एक एसआरपी कंपनी, एक रेल्वे पोलीस दलाची कंपनी आणि एक विशेष निमलष्करी पोलीस दलाची कंपनी असे ३७५२ अधिकारी व कर्मचारी एवढा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला आहे. राज्य राखीव दल, भारतीय रेल्वे आणि गुजरात राज्य पोलिसांच्या कंपन्या रायगडमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. मतदानाच्या प्रक्रियेस बाधा आणू शकतील असा पूर्वइतिहास असलेल्या ६२२ समाजकंटकांना ताब्यात घेण्यात आले आहे, तर ४५१६ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
निवडणुकीच्या कामासाठी पाच प्रकारे विशेष प्रकारची प्रतिबंधात्मक योजना करण्यात आली असून त्यात पोलीस बंदोबस्त पोलिसांचे कम्युनिकेशन प्लॅन, बाहेरून येणाऱ्या पोलीस जवानांचा बंदोबस्त प्लॅन, प्रतिबंधात्मक प्लॅन, त्याचप्रमाणे समाजकंटकाविरुद्ध केलेल्या कारवाईची योजना आह़े
समाजविघातक शक्तींवर वचक बसावा आणि आमजनतेत सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी प्रत्येक गावात पोलीस संचलन सुरू आह़े संवेदनशील मतदान केंद्रात क्षेत्रीय पोलीस अधिकारी दर दोन तासांनी भेट देतील. मतदान केंद्र परिसरात मोबाइल वापरास बंदी घातली आह़े रायगड लोकसभा मतदारसंघातील बुरखाधारी मतदार असलेल्या मतदान केंद्रावर महिला मतदारांची ओळख पटविण्यासाठी महिला पोलिसांची नियुक्ती करण्यात आली असून, अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांची विशेष नजर ठेवली जाणार आह़े