Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

निवडणुकीसाठी एसटी बसेस पुरविल्यामुळे प्रवाशांचे हाल
चिपळूण, २२ एप्रिल/वार्ताहर

 

लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर प्रासंगिक कराराच्या नावाखाली येथील मध्यवर्ती बसस्थानकातून सुमारे ३० गाडय़ा मतदान अधिकाऱ्यांना देण्यात आल्याने गाडय़ांचे वेळापत्रक कोलमडले आहे. याशिवाय ३३ बसफेऱ्या रद्द झाल्याचे वृत्त असून, त्यामुळे प्रवाशांची मोठय़ा प्रमाणावर गैरसोय झाली आहे. ऐन निवडणुकीत महामंडळाकडून लूट सुरू असून, पोफळी मार्गावर वाढीव तिकीट दर आकारला जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी येथील निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, मतदान केंद्रावर काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी राजापूर, रत्नागिरी, लांजा अशा ठिकाणी जादा गाडय़ा देण्यात आल्या आहेत. या गाडय़ा प्रासंगिक तत्त्वावर देण्यात आल्याने व मुळातच येथील बसस्थानकात गाडय़ांची कमतरता असल्याने तालुक्यातील कमी भारमान असणाऱ्या ३३ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. या बसफेऱ्या येथील आगर व्यवस्थापनाने एकाएकी बंद केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. या प्रवाशांना अर्धा-अर्धा तास एसटीची वाट पाहात ताटकळत बसावे लागते. पोफळी मार्गावर प्रवाशांची संख्या जास्त असल्याने या मार्गावर जादा गाडय़ा सोडण्यात आल्या आहेत. यापूर्वीही या मार्गावर ज्यादा गाडय़ा सोडल्या जात होत्या. मात्र या गाडय़ांचे तिकीट हे साध्या गाडीच्या तिकिटानुसार घेतले जात होते. मात्र आता त्याच स्वरूपाच्या गाडय़ांमधून वाढीव तिकीट घेतले जात असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे.