Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९
राज्य

कोकण निवडणुकीत गाजला पर्यावरणाचा मुद्दा!
अभिमन्यू लोंढे
सावंतवाडी, २२ एप्रिल

कोकणच्या निसर्गसौंदर्याचा ऱ्हास होणाऱ्या प्रकल्पाविरोधात आवाज उठविणारा मुद्दा लोकसभा निवडणुकीत गाजला. हा मुद्दा मतदानाच्या स्वरुपात कोणाला लाभ मिळवून देतो, हे उद्या २३ एप्रिलला होणाऱ्या मतदानातन स्पष्ट होणार आहे. कोकणच्या पर्यावरणाच्या मुद्यामुळे अन्य सर्वच मुद्दे फिके पडले. वीज भारनियमन, प्रचंड महागाई, दहशतवाद, पाणी असे अनेक मुद्दे प्रचारात आले.

आरक्षणाबाबत दिशाभूल थांबविण्याचे मराठा-ओबीसी समन्वय समितीचे आवाहन
नाशिक, २२ एप्रिल / प्रतिनिधी
यंदाच्या निवडणुकीत मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला मुख्य विषय बनवला जात आहे. या गदारोळात काही जणांनी आपण म्हणजे जणू मराठा व ओबीसी समाजाचे एकमेव नते असल्याच्या आविर्भावात आपली संकुचित भूमिका जाहीर करून साऱ्या मराठा व ओबीसी समाजाला वेठीस धरले आहे.

कर्नाटकाच्या सहा जिल्ह्य़ात ‘सर्च’चा नवजात बालसेवा कार्यक्रम
गडचिरोली, २२ एप्रिल / वार्ताहर

डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांच्या ‘सर्च’ या संस्थेचा ‘नवजात बालसेवा’ हा उपक्रम कर्नाटकातील सहा जिल्ह्य़ांवर राबविला जाणार आहे. बालमृत्यू कमी करण्याच्या उद्देशाने जगातील विविध ठिकाणाचे पथक या उपक्रमाचा अभ्यास करण्यासाठी ‘सर्च’ मध्ये येत आहेत. याच उद्देशाने कर्नाटक राज्यातील आरोग्य खात्याचे पथक १७ ते २० एप्रिल दरम्यान सर्चमध्ये आले होते.

मनमाड रेल्वे वर्कशॉपमधील गर्डर्स तंत्रज्ञान चोरीचा प्रयत्न; दोघे ताब्यात
मनमाड, २२ एप्रिल / वार्ताहर
भारतीय रेल्वेच्या मनमाड सेंट्रल इंजिनिअरिंग वर्कशॉपचे महत्वपूर्ण उत्पादन असलेल्या ४०० फुटी स्पॅनच्या लोखंडी गर्डर्सचे तंत्रज्ञान व्हिडिओ चित्रीकरणाच्या सहाय्याने चोरून नेण्याचा प्रयत्न बुधवारी कर्मचाऱ्यांनी हाणून पाडला. कोकण, काश्मिर तसेच उत्तर प्रदेश राज्यात रेल्वेच्या मोठय़ा पुलांसाठी लागणारे ४०० फुटी स्पॅनचे गर्डर्सची निर्मिती मनमाड रेल्वे वर्कशॉपमध्ये होते. भारतात केवळ मनमाडमध्ये ते तयार केले जातात.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे डॉ. आगाशे यांचे व्याख्यान
नाशिक, २२ एप्रिल / प्रतिनिधी

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे नाशिक विभागीय केंद्र व कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने २४ एप्रिल रोजी नाटय़चित्र अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांचे ‘घाशिराम कोतवाल ते शेवरी- नाटय़ चित्रपट प्रवास’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारकमध्ये सायंकाळी सहाला हा कार्यक्रम होणार आहे. पुण्याच्या थिएटर अकॅडमीची निर्मिती असलेले व विजय तेंडुलकर लिखित तसेच डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘घाशिराम कोतवाल’ या नाटकातून डॉ. आगाशे यांनी आपल्या अभिनयाची रंगभूमीला ओळख करून दिली. या नाटकाने अमेरिका, बर्लिन, लिली, बेलग्रेड, क्युबेक, बाल्टीमोर, लंडन, पॅरिस, मास्को या देशात रसिकांची दाद मिळवली. मराठी रंगभूमीसाठी हे नाटक मैलाचा दगड ठरले. अभिनयाबरोबर प्रयोगशील जाणिवेतून त्यांनी ‘ग्रिप्स थिएटर’ ची चळवळ भारतात रूजवण्याचे काम केले. त्यातून अनेक चांगल्या धाटणीच्या नाटय़कृती रसिकांना अनुभवता आल्या. पुण्याच्या फिल्म अ‍ॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ुटचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. कलाक्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ ने सन्मानित केले.

रायगड लोकसभा मतदारसंघात प्रचंड पोलीस बंदोबस्त
अलिबाग, २२ एप्रिल/ प्रतिनिधी

रायगड लोकसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रे संवेदनशिल तर ५९ मतदान केंद्रे चिंताजनक म्हणुन घोषीत करण्यात असुन, ४४ चिंताजनक मतदान केंद्रांवर संपुर्ण मतदान प्रक्रीयेचे ‘डिजीटल रेकॉर्डीग’ करण्यात येणार असल्याची माहिती रायगड लोकसभा मतदारसंघाचे निवडणुक निर्णय अधिकारी डॉ.निपुण विनायक यांनी दिली. या पाश्र्वभुमिवर उद्या, (गुरुवारी) मतदारांना निर्भयपणे मतदान करता यावे म्हणून जिल्हा पोलिसांनी कडक बंदोबस्त आजपासुनच सर्वत्र तैनात केला आहे. निर्भय वातावरण निर्मीतीसाठी प्रचारसमाप्ती पासुनच सुरक्षा दलांचे सशस्त्र संचलन करण्यात येत असुन, मतदानाच्या दिवशी दोन पोलिस अधिक्षक, १० पोलिस उपअधिक्षक, २५ पोलीस निरीक्षक, ११५ पोलिस उपनिरीक्षक, २६०० पोलिस जवान, ६०० गृहरक्षक दलाचे जवान, १०० पोलिस महिला होमगार्ड, एक एसआरपी कंपनी, एक रेल्वे पोलीस दलाची कंपनी आणि एक विशेष निम लष्करी पोलीस दलाची कंपनी असे ३७५२ अधिकारी व कर्मचारी एवढा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला आहे.