Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९
क्रीडा

‘मिस्टर इंडिया’साठी २५० शरीरसौष्ठवपटू
विजेत्याला एक लाखाचे इनाम
मुंबई, २२ एप्रिल / क्री. प्र.

देशातील आघाडीच्या शरीरसौष्ठवपटूंचे कसलेले सौष्ठव पाहण्याची संधी सीनियर राष्ट्रीय बॉडीबिल्डिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या निमित्ताने क्रीडाचाहत्यांना मिळणार आहे. २३ ते २५ एप्रिल या कालावधीत ही स्पर्धा रंगणार असून देशभरातील तब्बल २५० स्पर्धक यात सहभागी होत आहेत. या शरीरसौष्ठवपटूंमधून अजिंक्य ठरणारा खेळाडू ‘मिस्टर इंडिया २००९’ म्हणून ओळखला जाईल. गोरेगाव स्पोर्ट्स क्लब येथे ही स्पर्धा रंगणार आहे.
ही स्पर्धा नऊ गटात खेळविली जाणार असून त्यात विजयी ठरणाऱ्या खेळाडूंमध्ये चॅम्पियन ऑफ चॅम्पियन किताबासाठी लढत होईल.

सुपर किंग्जचा सामना डेअरडेव्हिल्सशी
दरबान, २२ एप्रिल / पीटीआय

गेल्या वर्षी इंडियन प्रीमियर लीगमध्ये अंतिम फेरीपर्यंत धडक मारणाऱ्या परंतु यंदा पहिल्या सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला उद्या दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाविरुद्ध झुंजायचे आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाने दुसऱ्या सामन्यात मात्र बंगलोर रॉयल चॅलेंजर्स संघाला ९२ धावांनी नमवून पहिल्या विजयाची चव चाखली होती, दिल्ली डेअरडेव्हिल्सनेही सलामीच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबवर मात करून गुणांचे खाते उघडले होते.

अनुपस्थित राहिल्यास पुरस्कार काढून घेणार
नवी दिल्ली, २२ एप्रिल/पीटीआय

पद्म पुरस्कार वितरण प्रसंगी अनुपस्थित राहणाऱ्या महेंद्रसिंग धोनी आणि हरभजन सिंग यांची क्रीडा मंत्रालयाने गंभीर दखल घेतली असून अशा समारंभांना पूर्वसूचना न देता गैरहजर राहणाऱ्या खेळाडूंचे पुरस्कार काढून घेण्यात यावेत अशी शिफारस त्यांनी केली आहे.

पहिल्या विजयासाठी राजस्थान रॉयल्स लढणार
केप टाऊ न, २२ एप्रिल/ पीटीआय

आयपीएलच्या पहिल्या सत्रातील विजेता ठरलेल्या शेन वॉर्नच्या राजस्थान रॉयल्स संघाला दुसऱ्या सत्रात मात्र विजयाची चव चाखायला मिळाली नसल्याने ते नक्कीच पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत असतील. तर गेल्या सामन्यात मिळालेल्या विजयाने कोलकाता नाइट रायडॉर्स संघाचा आत्मविश्वास चांगलाच दुणावलेला असल्याने विजयाचा ध्वज उंचाविण्यासाठीच ते प्रयत्नशील असतील. पहिल्या सामन्यात बेंगळुरू रॉयल चॅलेंर्जसकडून राजस्थानच्या संघाला मानहीकारक पराभव स्वीकारावा लागला होता. विजयासाठी आवश्यक असलेल्या १३३ धावाही त्यांना करता आल्या नव्हत्या.

रॉयल चॅलेंजर्स उपान्त्य फेरीत पोहचेल -कॅलिस
केप टाऊन, २२ एप्रिल, पीटीआय

आयपीएलच्या पहिल्या सत्रात जरी बेंगळुरू रॉयल चॅलेंजर्स संघाला अंतिम स्थानावर समाधान मानावे लागले असले तरी दुसऱ्या सत्रात मात्र संघात सकारात्मक बदल झाले असून यावेळी उपान्त्य फेरीत पोहोचण्याची आशा दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जॅक्स कॅलिस याने व्यक्त केली आहे. संघाचे मालक उद्योजक विजय मल्या हे पहिल्या सत्रातील कामगिरीने संघावर संतापले होते. पण या सत्रात मात्र पहिल्या विजयाने ते खूश झाले आहेत. दुसऱ्या सत्रात खेळताना मात्र त्यांनी नव्याने सुरुवात करण्याचे ठरविले आहे.

सर बेनेगल रामाराव आंतर बँक क्रिकेट : देना बँक-युनियन बँक यांच्यात अंतिम झुंज
मुंबई, २२ एप्रिल/क्री.प्र.
देना बँक आणि युनियन बँक यांनी ५३ व्या सर बेनेगल रामाराव आंतर बँक क्रिकेट स्पर्धेच्या सीनियर गटातून अंतिम फेरीत धडक मारली आहे. देना बँकेने उपान्त्य लढतीत यजमान रिझव्‍‌र्ह बँकेचे आव्हान संपुष्टात आणताना ३९ धावांनी चुरशीचा विजय मिळविला तर युनियन बँकेने बँक ऑफ महाराष्ट्रचे २१८ धावांचे आव्हान केवळ तीन बळींच्या मोबदल्यात पार केले.

डॉ. के. एम. मुन्शी स्मृती ट्वेन्टी-२० क्रिकेट :
एस. व्ही. पी. विद्यालय, युनायटेड स्पोर्टस विजयी
मुंबई, २२ एप्रिल/क्री.प्र.
भवन्स कॉलेज (अंधेरी) येथे सुरू असलेल्या डॉ. के. एम. मुन्शी स्मृती १४ वर्षांखालील खेळाडूंच्या ट्वेन्टी २० क्रिकेट स्पर्धेत एस. व्ही. पी. विद्यालय संघाने दहिसर स्पोर्टस् फाऊंडेशनवर ६१ धावांनी विजय मिळवून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

क्रिकेटने गाठली नवी ‘उंची’एव्हरेस्टवर रंगला क्रिकेटचा सामना
लंडन, २२ एप्रिल / पीटीआय

जगातील सर्वाधिक उंचीचे शिखर असलेल्या एव्हरेस्टच्या १६९४५ फुटांवर क्रिकेटचा खेळ आज रंगला. तेन्झिंग व हिलरी अशी नावे असलेल्या दोन संघांत ही लढत खेळली गेली. हिलरी संघाने ही लढत ३६ धावांनी जिंकली. तेन्झिंग संघाचे नेतृत्व हेडीन मेनने केले तर हिलरी संघाचे कर्णधारपद न्यूझीलंडच्या ग्लेन लुईसने भूषविले. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी १५ खेळाडूंची निवड केली होती. त्याशिवाय, वैद्यकीय पथक व खेळपट्टी तयार करणारे पथकही सोबत होते. एव्हरेस्टवरील खेळपट्टीपर्यंत पोहोचण्यासाठी या सर्व खेळाडूंनी नऊ दिवस ट्रेकिंग केले. या सामन्यातून दोन्ही संघांनी अडीच लाख पौंड इतकी रक्कम गोळा केली असून ती कल्याणकारी कामासाठी वापरण्यात येणार आहे. लॉर्ड ट्रॅव्हरनर्स व हिमालयन ट्रस्ट, ब्रिटन यांच्यामार्फत ही रक्कम उभी करण्यात आली.

जाहिरात ब्रेक नव्हे स्ट्रॅटेजी ब्रेक
दरबान, २२ एप्रिल / पीटीआय

सामन्यात देण्यात येणारा स्ट्रॅटेजी ब्रेक कायम राहणार असल्याचे, इंडियन प्रीमियर लिगचे अध्यक्ष ललित मोदी यांनी स्पष्ट केले आहे. आयपीएल क्रिके ट स्पर्धेचे दुसरे पर्व दक्षिण आफ्रिकेत सुरू झाले आहे. स्पर्धेत सामन्यादरम्यान दर दहा षटकांनंतर साडेसात मिनिटांची विश्रांती दिली जाते. त्यावर अनेक खेळाडूंनी नाराजी दर्शवली होती. त्यात प्रामुख्याने गोलंदाजी एकदम थांबवल्याने गोलंदाजांची लय बदलते, असे काहींनी सांगितले होते. याकडे लक्ष्य वेधत मोदी यांनी याकडे लक्ष पुरवणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले , ‘‘खेळाडूंच्या सूचनांचा नक्कीच विचार करण्यात येईल. विश्रांती किती वेळाची असावी यावर अनेकांची भिन्न मते आहेत. काहींना तर केवळ दोनच मिनिटांच्या विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे तसा प्रयोगही आम्ही कदाचित करू.’’ दरम्यान स्ट्रॅटेजी ब्रेक हा संघांना त्यांचे डावपेच आखण्यासाठी दिलेला वेळ आहे, असे सांगत आयोजकांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र याच वेळेत जास्तीत जास्त जाहिराती मिळवत पैसा कमावणे हेच ब्रेक देण्यामागचे कारण असल्याची टीका काही खेळाडूंनी केली आहे.

मोदींनी केली पीटरसनची कानउघडणी
पोर्ट एलिझाबेथ, २२ एप्रिल / पीटीआय

‘आपले वर्तन इतरांना आदर्श वाटेल असे असावे,’ असे सांगत आयपीएल क्रिकेट स्पर्धेचे सर्वेसर्वा ललित मोदी यांनी पंचांच्या निर्णयावर सामन्यादरम्यान नाराजी व्यक्त करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार केव्हीन पीटरसनची कानउघडणी केली आहे.
चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यात एका चेंडूवर ऑस्ट्रेलियन पंच सायमन टफेल यांनी पीटसरनला पायचीत बाद दिले होते. त्यावर भर मैदानात पीटरसनने टफे ल यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. त्याच्या या कृत्याने ललित मोदी जाम भडकले. ते म्हणाले, ‘‘आयपीएल स्पर्धा शिस्तीतच होत आहेत. प्रत्येक क्षणावर आमची नजर आहे. त्यामुळे खेळाडू असो अथवा कोणीही आयपीएलमध्ये बेशिस्त वर्तन खपवून घेतले जाणार नाही.’’ प्रत्येक खेळाची काही मूल्ये असतात. त्यामुळे ‘काही’ खेळाडूंनी त्या मूल्यांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असा टोला लगावत ते म्हणाले, ‘‘प्रत्येक खेळाडू हा येणाऱ्या पिढय़ांसमोर आदर्श आहे. त्यामुळे त्यांनी तसेच वर्तन केले पाहिजे. क्रिकेटसारख्या महान खेळातून चांगल्या मूल्यांचा प्रसार जगभर झाला. त्याचे भान खेळाडूंनी राखले पाहिजे. कारण, साऱ्या जगाचे लक्ष्य आयपीएल स्पर्धेवर आहे.

राष्ट्रीय पुरस्कारांबाबतच्या शिफारशीवर गृहमंत्रालय करणार विचार
नवी दिल्ली, २२ एप्रिल / पीटीआय

राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यास अनुपस्थित राहणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार न देण्याचा जो निर्णय क्रीडा मंत्रालयाने घेतला आहे, त्याच्यावर गृहमंत्रालय विचार करणार असून त्यानंतरच ही शिफारस मंजूर करण्यात येईल. गृहसचिव मधुकर गुप्ता यांनी सांगितले की, आम्ही या प्रकरणात लक्ष घालणार आहोत. क्रीडा मंत्रालयाने विविध राष्ट्रीय क्रीडा संघटना, भारतीय ऑलिम्पिक संघटना व गृहमंत्रालयाला पत्र पाठवून जे खेळाडू राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांच्या (राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन, द्रोणाचार्य व ध्यानचंद) तसेच सर्वोच्च नागरी पुरस्कारांच्या (पद्म पुरस्कार) वितरण सोहळ्यास उपस्थित राहणार नाहीत, त्यांना तो दिला जाणार नाही, असे म्हटले होते. पद्म पुरस्कार वितरण प्रसंगी अनुपस्थित राहणाऱ्या महेंद्रसिंग धोनी आणि हरभजन सिंग यांची क्रीडा मंत्रालयाने गंभीर दखल घेतली असून अशा समारंभांना पूर्वसूचना न देता गैरहजर राहणाऱ्या खेळाडूंचे पुरस्कार काढून घेण्यात यावेत अशी शिफारस त्यांनी केली आहे. संयुक्त क्रीडा सचिव आय. श्रीनिवास यांनी यासंदर्भात राष्ट्रीय क्रीडा संघटना, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन आणि केंद्रीय मंत्रालयाला पाठविलेल्या पत्रात जे खेळाडू राजीव गांधी खेल रत्न, अर्जुन, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद अशा राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभांना तसेच पद्म पुरस्कारासारख्या नागरी सोहळ्यांना अनुपस्थित राहण्यासाठी पूर्वसूचना आणि योग्य कारण देणे बंधनकारक केले आहे.

हमझा मुजतबाचे चार गोल; इंडियन ऑइलचा मोठा विजय
बॉम्बे गोल्ड कप हॉकी
मुंबई, २२ एप्रिल / क्री. प्र.

४७व्या बॉम्बे गोल्ड कप हॉकी स्पर्धेत आघाडीचा खेळाडू हमझा मुजतबा याने केलेल्या चार गोलच्या जोरावर इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने माजी विजेत्या पश्चिम रेल्वेला ९-१ असा पराभवाचा तडाखा दिला. हमझाने दुसरा, पाचवा, सहावा व नववा गोल केला. इंडियन ऑइलने पहिल्या सत्रात ४-१ अशी आघाडी घेत सामन्याचा निकाल स्पष्ट केला होता. हमझाव्यतिरिक्त रोशन मिन्झ, दिदार सिंग, सुनील यादव व कमलेश परिहार यांनीही आपल्या संघासाठी गोल केले. ब गटातील एका लढतीत एअर इंडियाने रुरकेलाच्या पंपोश इलेव्हनवर ४-० अशी मात केली. मध्यंतरालाच एअर इंडियाने ३-० अशी आघाडी घेतली होती. एअर इंडियाला भारताचा माजी कर्णधार धनराज पिल्लेसारख्या कसलेल्या खेळाडूची साथ लाभली. त्याने मैदानावर आपल्या उपस्थितीचा ठसा उमटविला. समीर दाद, ब्रुनो लुगुन, संदीप मायकेल व ब्रोजेनसिंग यांना गोल करण्याची संधी धनराजमुळे मिळाली.