Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९

प्रचाराच्या धामधुमीत थोडी पेटपूजादेखील महत्त्वाची असते..कल्याण लोकसभा मतदारसंघातील मनसेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी प्रचार रॅलीत फि रताना मिळालेल्या उसंतीमध्ये डोंबिवलीच्या पोळीभाजी केंद्रात उभ्या उभ्या थोडी पेटपूजा करून घेतली आणि पुढच्या प्रचाराला तयार झाल्या.

रणधुमाळीच्या प्रतीक्षेत मतदार
थेट मतदारसंघातून ठाणे

जयेश सामंत

राज्यभरातील निवडणूक प्रचाराच्या तोफा कालपासून थंडावल्यानंतर येत्या २४ तारखेपासून मुंबई, ठाण्याचा रणधुमाळीत राजकीय क्षेत्रातील दिग्गज, मातब्बरांचा वावर सुरू होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार येत्या शुक्रवारी वाशीत जाहीर सभा घेऊन ठाणे लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा धडाका सुरू करतील. पवारांपाठोपाठ युती- आघाडीतील नेत्यांच्या सभांचा रतीब या मतदारसंघात सुरू होईल. त्यामुळे या भागातील निवडणूक प्रचारात खऱ्या अर्थाने रंग भरण्यास सुरू होईल. असे असले तरी मागील आठवडा- पंधरवडय़ापासून काँग्रेस आघाडी, शिवसेना- भाजप तसेच मनसेच्या उमेदवारांनी संपूर्ण मतदारसंघ िपजून काढण्यास सुरुवात केली असून मतदारसंघातील वातावरण हळूहळू ढवळून निघण्यास सुरुवात झाली आहे.

शिर्डीच्या सिंहासनाची प्रतिकृती ठाण्यातील साईमंदिरात
ठाणे / प्रतिनिधी

शिर्डी येथील साईबाबांचे सिंहासन बनवणाऱ्या कारागिरांनी ठाण्यातील काजूवाडी येथील साईमंदिरासाठी १३५ किलोचे चांदीचे सिंहासन तयार केले आहे. २४ एप्रिल रोजी आचार्य सुधांशू महाराज यांच्या हस्ते साईबाबांकरिता चांदीचे सिंहासन अर्पण करण्यात येणार आहे.
लुईसवाडी-काजूवाडी येथे साईबाबांच्या मंदिरात साईमूर्तीची प्राणप्रतिष्ठा ३० एप्रिल २००६ रोजी झाली होती. या मंदिरात नागदेवता, लक्ष्मीनारायण, हनुमान यांच्याही मूर्ती आहेत. मंदिरातील साईबाबांच्या मूर्तीसाठी चांदीचे सिंहासन करण्याचा निर्धार भक्तमंडळीनी केला होता. त्यानुसार ८२ भक्तांनी सिंहासनासाठी चांदी अर्पित केली.

..तर ठाण्याच्या महापौरांना डॉक्टरेट द्यावी
शिवसेनेची मागणी

ठाणे/प्रतिनिधी

ज्या ‘सी-टेक’ तंत्राचा वापर करून नवी मुंबईतील प्रदूषणाला आळा घातला म्हणून अमेरिकेत मेरीलँड येथे असलेल्या तामीळ विद्यापीठाच्या नवी मुंबई शाखेने ‘डॉक्टरेट’ दिली, ते तंत्र फार आधीपासून भारतात वापरात आहे आणि संजीव नाईक यांच्या ज्या कामगिरीबद्दल ही डॉक्टरेट दिली गेली, तीच कामगिरी तशीच ठाणे महापालिकेतील महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेते अशा डझनभर पदाधिकारी आणि नगरसेवकांनी केलेली असल्यामुळे या सर्वांनाच आपल्या विद्यापीठाची ‘डॉक्टरेट’ मिळावी, असे शिफारस पत्र आपण या विद्यापीठाच्या मेरीलँड केंद्राला पाठविणार असल्याचे शिवसेना ठाणे जिल्हा उपप्रमुख नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे.

मतदान केंद्र परिसरात मोबाइल वापरावर निर्बंध
ठाणे/प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्र परिसरात मोबाइल वापरावर निवडणूक आयोगाने निर्बंध घातलेले आहेत, याची दक्षतेने कडक अंमलबजावणी जिल्ह्यातील पालघर, भिवंडी, कल्याण व ठाणे मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर करावी, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी ए. एल. जऱ्हाड यांनी सोमवारी दिली.
जिल्ह्यातील मतदान केंद्रापासून १०० मीटर परिघाच्या आत मोबाइल, फोन, कॉडलेस फोन, वायरलेस सेटस्, पेजर आदी साधने घेऊन जाता येणार नाही.

वडघर-मुद्रे येथील शाळेच्या नव्या वास्तूचे उद्घाटन
प्रतिनिधी

कल्याणच्या छत्रपती शिक्षण मंडळ संचलित माणगांव तालुक्यातील (रायगड) वडघर-मुद्रे येथील सरस्वती विद्यामंदिर या शाळेच्या नव्या वास्तूचे उद्घाटन रविवार २६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. मुलुंड येथील वझे-केळकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. टी. पारटकर उद्घाटक म्हणून तर लोकसत्ताचे संपादक कुमार केतकर, निवासी संपादक सुधीर जोगळेकर, उद्योजक प्रकाश शहा आणि जयेश सेठीया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

खासगी संस्थेतील कर्मचाऱ्यांनाही ३० एप्रिलला सुट्टी
ठाणे/प्रतिनिधी :
ठाणे जिल्ह्यातील चारही मतदारसंघांमध्ये येत्या ३० एप्रिल रोजी मतदान होणार असून सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच कारखाने, दुकाने व खासगी संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ठाणे, भिवंडी, कल्याण व पालघर मतदारसंघात ३० एप्रिल रोजी मतदान आहे. केंद्र तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी सुट्टी मिळते. मात्र खासगी क्षेत्रात आतापर्यंत मतदान करण्यासाठी कामावर दोन तास उशिरा जाण्याची वा दोन तास लवकर निघण्याची मुभा दिली जात असे. यावेळी मात्र निवडणूक आयोगाने मतदार यादीत नाव असलेल्या प्रत्येकास मतदानाचा अधिकार बजावता यावा, यासाठी खासगी क्षेत्रानेही आपले कर्मचारी व कामगारांना भरपगारी सुट्टी द्यावी, असे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्य शासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती ठाण्याच्या कामगार उपायुक्तांनी दिली.

छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या धर्तीवर कल्याण स्थानकाचा विकास करणार
कल्याण / वार्ताहर

कल्याण रेल्वे स्थानकातून लाखो प्रवासी प्रवास करतात. मतदारांनी पुन्हा संसदेत जाण्याची संधी दिल्यास सीएसटी स्थानकाच्या धर्तीवर कल्याण रेल्वे स्थानकाचा विकास करीन, अशी ग्वाही कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपचे उमेदवार आनंद परांजपे यांनी दिली.
प्रचारादरम्यान कल्याण पूर्व व विठ्ठलवाडी येथे मतदारांशी संवाद साधताना कल्याण स्थानकाच्या नूतनीकरणाबाबत आपण पाठपुरावा करू असे त्यानी सांगितले. कल्याण हे मध्य रेल्वेवरील महत्त्वाचे स्थानक असून लोकलबरोबर बाहेरगावी जाणाऱ्या अनेक गाडय़ा येथे थांबतात. या स्थानकाच्या नूतनीकरणाची गरज असल्याचे परांजपे यानी सांगितले. आठ महिन्यांच्या खासदारकीच्या कालावधीत त्यांनी केलेल्या विकासकामांची माहिती त्यानी मतदारांना दिली. प्रचारादरम्यान त्यांनी शिवसेना-भाजप कार्यालयाला भेटी देऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली. मागील लोकसभा पोटनिवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतही भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन परांजपे यांनी यावेळी केले.

भाजप सत्तेवर असताना गंभीर दहशतवादी हल्ले झाले होते -नवाब मलिक
ठाणे/ प्रतिनिधी

युतीचे सरकार केंद्रामध्ये सत्तेवर असताना गंभीर दहशतवादी हल्ले झाले होते. संसदेवर अतिरेक्यांचा हल्ला भाजपच्या काळात झाला. कंदहार प्रकरण त्यांच्याच काळात झाले. लालकृष्ण अडवाणी गृहमंत्री असताना पाकिस्तानच्या खतरनाक अतिरेक्याला खंडणी देऊन सहीसलामत भाजपच्या नेत्यांनी सोडवले. अशा नेत्यांना देशाच्या सुरक्षेबद्दल काहीही बोलण्याचा हक्क नाही. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडीचे सरकार देशाला स्थिर सरकार देऊ शकेल, असा विश्वास कामगार मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला. वागळे इस्टेट येथे काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्षातर्फे संजीव नाईक यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. याप्रसंगी काँग्रेसचे शहर अध्यक्ष कांती कोळी, राष्ट्रवादीचे माजी शहर अध्यक्ष अशोक राऊळ, विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, शिक्षण मंडळ उपाध्यक्ष नंदू मोरे, मंगेश कोळी आदी उपस्थित होते. संजीव नाईक यांची घोडबंदर रोड परिसरात रॅली ठाणे लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजीव नाईक यांनी घोडबंदर रोड परिसरात मोठी रॅली काढली. ओवळा ते माजीवडा या मार्गावर ही रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत ठाणे काँग्रेस अध्यक्ष कांती कोळी, माजी अध्यक्ष बाळकृ ष्ण पूर्णेकर, नगरसेवक देवराम भोईर, महिला आघाडीच्या मनीषा पाटील तसेच अनेक पदाधिकारी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

सपाचे आर. आर. पाटील यांचा अनोखा प्रचार
भिवंडी/वार्ताहर

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सपाचे उमेदवार आर. आर. पाटील यांनी अनोख्या पध्दतीने प्रचार सुरू केला आहे. त्यांनी मतदारांशी संपर्क साधण्यासाठी एस. टी. स्थानक, यंत्रमाग कारखाने, रुग्णालय या ठिकाणी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. निवडून आल्यानंतर या समस्या सोडविण्याचे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. गेल्या दोन दिवसांपासून पाटील यांनी सायकल थेट एस. टी. स्थानकात नेऊन प्रवाशांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. शहर परिसरात यंत्रमाग कामगार मोठय़ा प्रमाणावर असल्याने त्यांच्या समस्या जाणून घेण्यासााठी त्यांनी थेट यंत्रमाग कारखान्यामध्ये धाव घेतली. कामगारांसाठी घरकुल योजना, त्यांच्या आरोग्याच्या योजना राबविण्याचा मानस व्यक्त करून भिवंडी शहर परिसरात टेक्स्टाईल पार्क उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. त्यांचे पुत्र व माजी महापौर विलास आर. पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या कोंबडपाडा, अजयनगर भागात घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधला.

मनसेमध्ये अंतर्गत नाराजीचे वातावरण
ठाणे/ प्रतिनिधी

मराठी अस्मितेच्या मुद्दय़ावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाणे जिल्ह्य़ातील उमेदवारांच्या प्रचार सभांना लाभणारा प्रचंड प्रतिसाद हा शिवसेना-भाजपा युतीला चिंतेत पाडणारा ठरू लागला आहे. अशा वातावरणात मात्र मनसेचे काही नगरसेवक प्रचार सभांपासून दूर राहात असल्याचे चित्र दिसत आहे. कल्याण आणि भिवंडी लोकसभेतील मनसेच्या उमेदवारांच्या प्रचार सभांना मिळणारा प्रतिसाद लक्षणीय ठरत असताना मीरा-भाईंदरमधील कालच्या राज ठाकरे यांच्या सभेने विरोधकांना विचार करण्यास भाग पाडले आहे. उमेदवार राजन राजे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेला आयात केलेली गर्दी नव्हती. शहर अध्यक्ष अरुण कदम आणि त्यांच्या साथीदारांनी सभा यशस्वी केली असली तरी मनसेच्या नगरसेवकाची अनुपस्थिती खटकणारी होती. मीरा-भाईंदर महापालिकेत मनसेचे चार नगरसेवक निवडून आले आहेत, त्यापैकी दोन नगरसेवक मनातून पक्षाबरोबर नाहीत. उमेदवार राजे यांच्या प्रचाराऐवजी इतरांच्या विजयासाठी काम करण्याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून ऐकायला मिळते. त्यात ठाकरे यांच्या सभेला नगरसेवक गणेश शेट्टी यांनी दांडी मारून कार्यकर्त्यांच्या चर्चेवर शिक्कामोर्तब केल्यासारखे आहे.

संजीव नाईक यांच्या विरोधात आयोगाकडे तक्रार
ठाणे/ प्रतिनिधी

आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी आयुर्विमा महामंडळाने सुरू केलेल्या केंद्र सरकारच्या जनश्री विमा योजनेचे शरद पवार व गणेश नाईक यांचा फोटो वापरून केलेले अर्ज ठाणे लोकसभा मतदारसंघात वाटण्यात येत असल्याची तक्रार शिवसेनेतर्फे निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. केंद्र सरकारची ही योजना असताना मतदारसंघात या योजनेचे अर्ज वाटणे हा आचारसंहितेचा भंग असल्याने त्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. राज्यात शिवसेनेच्या माध्यमातून ही योजना आपण पहिल्यांदा ठाणे पूर्व भागातील आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी सुरू केली, असा दावा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी केला आहे. ऐन निवडणुकीच्या काळात सदर योजनेचे अर्ज मतदारसंघात वाटण्यात येत असून त्यावर आयुर्विमा महामंडळाचा काहीही उल्लेख करण्यात येत नाही. अशा प्रकारे मतदारांना प्रलोभन दाखवून त्यांची दिशाभूल करण्यात येत असल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आल्याचे म्हस्के यांनी सांगितले.

खासगी संस्थेतील कर्मचाऱ्यांनाही ३० एप्रिल रोजी सुट्टी
ठाणे/प्रतिनिधी :
ठाणे जिल्ह्यातील चारही मतदारसंघांमध्ये येत्या ३० एप्रिल रोजी मतदान होणार असून सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच कारखाने, दुकाने व खासगी संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ठाणे, भिवंडी, कल्याण व पालघर मतदारसंघात ३० एप्रिल रोजी मतदान आहे. केंद्र तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी सुट्टी मिळते. मात्र खासगी क्षेत्रात आतापर्यंत मतदान करण्यासाठी कामावर दोन तास उशिरा जाण्याची वा दोन तास लवकर निघण्याची मुभा दिली जात असे. यावेळी मात्र निवडणूक आयोगाने मतदार यादीत नाव असलेल्या प्रत्येकास मतदानाचा अधिकार बजावता यावा, यासाठी खासगी क्षेत्रानेही आपले कर्मचारी व कामगारांना भरपगारी सुट्टी द्यावी, असे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्य शासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती ठाण्याच्या कामगार उपायुक्तांनी दिली.

पालघरमधील पाच केंद्रे समुद्रात!
ठाणे/प्रतिनिधी

पालघर लोकसभा मतदारसंघातील मतदानासाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली असून कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा पहिला टप्पाही पूर्ण झाला आहे. एकूण एक हजार ९२४ मतदान केंद्रावर मिळून ११ हजार ५४४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कैलास जाधव यांनी दिली. दुर्गम, डोंगराळ, निसर्गसंपन्न व सागरी किनारा लाभलेल्या या मतदारसंघात डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर हे राखीव तर वसई व नालासोपारा हे सर्वसाधारण असलेले विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत. १५ लाख दोन हजार ४९३ एवढी मतदारांची संख्या असून त्यात सात लाख ७५ हजार ७०० पुरुष तर सात लाख २६ हजार ७९३ एवढय़ा महिला मतदारांची संख्या आहे. बोईसर विधानसभा मतदारसंघातील वाळीव आणि वसई विधानसभा मतदारसंघातील अर्नाळा किल्ला व पाणजू या दोन गावातील पाच मतदान केंद्रे ही खाडी व समुद्राच्या पाण्याने वेढलेली आहेत. वैतरणा व सफाळे गावांच्या मध्यभागी वसलेल्या वाळीव गावात दोन मतदान केंद्रे असून त्यावर एक हजार ८२ मतदार मतदान करणार आहेत. अर्नाळा किल्ला या गावात दोन मतदान केंद्रे असून त्यात एक हजार ५५२ मतदार आहेत, तर पाणजू येथील एका मतदान केंद्रात ९९७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदान केंद्रावर मतदानाचे साहित्य पोहोचविण्याचे काम बोटीतून केले जाणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.