Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९

उन्हाळा.. दिवसेंदिवस तापत चाललेल्या उन्हाचा सर्वसामान्य नागरिकांसोबत प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांनाही फटका बसला आहे. उन्हाच्या काहिलीपासून बचाव करण्यासाठी महाराजबाग आणि सेमिनरी हिल्स उद्यानात विशेष व्यवस्था करण्यात आली. महाराजबागेतील अस्वलाची दररोज थंड पाण्याने आंघोळ घातली जाते. सेमिनरी हिल्स उद्यानातील हरणांसाठीही सावली आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

मोटारसायकलला ट्रकची धडक, १ ठार; दोघे जखमी
खामगाव, २२ एप्रिल / वार्ताहर

कंचनपूर येथे होणाऱ्या विवाह समारंभात जात असलेल्या दुचाकीस भरधाव ट्रकने चिरडले. यात अभयनगरातील सुभाष नारायण महाले यांचा जागीच मृत्यू झाला तर काळेगाव येथील अमलकार बंधू जबर जखमी झाले आहे. ही घटना मंगळवारी सकाळी खामगाव-अकोला राष्ट्रीय महामार्गावर भवानी पेट्रोलपंपाजवळ घडली. कंचनपूर येथील ढोले यांच्या येथे विवाह सोहोळा होता. त्यासाठी काळेगाव येथील विलास अमलकार, लक्ष्मण अमलकार व अभय नगरातील सुभाष नारायण महाले हे हिरो होन्डा (क्र. एमएच २८/पी ८७३५) ने जात होते. दरम्यान, त्यांनी भवानी पेट्रोलपंपावर पेट्रोल भरून पंपाबाहेर हायवेवर आले तेव्हा अकोल्याकडून भरधाव येत असलेल्या ट्रक (क्र. सीजी ०४ ए-९७४१)ची त्यांच्या दुचाकीस धडक लागली.

मुनीश्रींचे दिवसातून एकदाच अन्न व पाणीग्रहण
यवतमाळ, २२ एप्रिल / वार्ताहर

मुनीश्री तरुणसागर महाराज यांची प्रवचने यवतमाळात झाली. कटू वाणीसाठी प्रसिद्ध असलेल्या तरुणसागर महाराजांची दिनचर्याही सामान्य माणसाला अचंबित करणारी आहे. साधकांना मुनीश्रींच्या आहारविधीचे सर्वाधिक औत्सुक्य असल्याने तरुणसागरसुद्धा प्रवचनानंतर सर्वादेखत २४ तासातून फक्त एकदाच अन्न व पाणी ग्रहण करतात. तपस्येशिवाय ही दिनचर्या शक्य नाही असे ते म्हणाले. भोजनविधीचीही खास परंपरा आहे. ती स्पष्ट करताना महाराज म्हणाले, ‘एक बार खाये सो योगी, दोन बार खाये सो भोगी, तीन भार खाये सो रोगी और अधिक बार खाये उसकी मृत्यू होगी’ हे सरळ सोपं तत्वज्ञान आहे.

चंद्रपुरातील तीन हजार तेलगु मतदारांनी केले आंध्रमध्ये मतदान
चंद्रपूर, २२ एप्रिल/प्रतिनिधी

गेल्या अनेक वर्षांपासून येथे वास्तव्य करून असलेल्या सुमारे तीन हजार तेलगु मतदारांनी यावेळी आंध्र प्रदेशात चुरशीची लढत असल्याने तिकडे मतदान केल्याची माहिती आहे. या मतदारांना नेण्यासाठी काही उमेदवारांनी वाहनेसुध्दा भाडय़ाने घेतली होती. आंध्रप्रदेशची सीमा लागून असल्याने या भागात तेलगु मतदारांची संख्या मोठी आहे. वेकोलिच्या अनेक कोळसा खाणींमध्ये व विशेषत: भूमिगत खाणींमध्ये काम करणारे कामगार आंध्रप्रदेशातून येथे स्थलांतरित झाले आहेत. घुग्घुस, बल्लारपूर व चंद्रपुरातील लालपेठ रय्यतवारी भागात हे कामगार राहतात.

कर्नाटकाच्या सहा जिल्ह्य़ात ‘सर्च’चा नवजात बालसेवा कार्यक्रम
गडचिरोली, २२ एप्रिल / वार्ताहर

डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांच्या ‘सर्च’ या संस्थेचा ‘नवजात बालसेवा’ हा उपक्रम कर्नाटकातील सहा जिल्ह्य़ांवर राबविला जाणार आहे. बालमृत्यू कमी करण्याच्या उद्देशाने जगातील विविध ठिकाणाचे पथक या उपक्रमाचा अभ्यास करण्यासाठी ‘सर्च’ मध्ये येत आहेत.
याच उद्देशाने कर्नाटक राज्यातील आरोग्य खात्याचे पथक १७ ते २० एप्रिल दरम्यान सर्चमध्ये आले होते. कर्नाटकात एकूण १८ जिल्ह्य़ांमध्ये बालमृत्यूची भीषण समस्या असून हे १८ जिल्हे अतिशय मागास व अविकसित आहेत. या जिल्ह्य़ांमध्ये बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘सर्च’ चा नवजात बालसेवा कार्यक्रम वापरता येईल का? हे पाहण्यासाठी कर्नाटकचे पथक सर्चमध्ये दाखल झाले.

कवठाळा ते भोयगाव-धानोरा रस्त्याची दुर्दशा; प्रवाशांचे हाल
आवारपूर, २२ एप्रिल / वार्ताहर

गडचांदूर ते धानोरा मार्गे जाणाऱ्या चंद्रपूर रस्त्याची बिकट अवस्था असल्यामुळे ये-जा करणाऱ्या प्रवाशांना फार मोठी कसरत करावी लागत आहे. गडचांदूर ते भोयगाव-धानोरा फाटा मार्ग हा गडचांदूर व परिसरातील जनतेला सोयीचा व जवळचा आहे. त्यामुळे या भागातील बहुतांश प्रवासी या मार्गाने प्रवास करीत असतात. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असून दुचाकी, चारचाकी, सायकल किंवा पायी चालणाऱ्यांनाही प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. या रस्त्यावर वाहनांची फार मोठी वर्दळ असते. या भागात सिमेंटचे कारखाने असल्यामुळे सिमेंट नेणाऱ्या ट्रकची वाहतूक या रस्त्यावरून होत असते व गडचांदूर मध्यवर्ती केंद्र असल्यामुळे भोयगावपासून लोक ये-जा करीत असतात. शालेय विद्यार्थी असो वा कर्मचारी तसेच प्रवाशांना या रस्त्यावरून प्रवास करणे डोकेदुखी झाली आहे. कवठाळा ते भोयगाव व भोयगाव ते धानोरा फाटा मार्गे चंद्रपूरलगत असलेल्या रस्त्यापर्यंत व घुग्घुसकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या रस्त्याच्या संदर्भात गेल्या काही दिवसात धानोरा गाववासीयांनी आंदोलन करण्याचेसुद्धा इशारे दिले होते. वेळोवेळी रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली होती परंतु, अजूनही रस्ता दुरुस्त करण्यात आलेला नाही. रस्ता दुरुस्त करण्याची मागणी जनतेकडून होत आहे.

पोरज येथे संगीतमय भागवत सप्ताह
खामगाव, २२ एप्रिल / वार्ताहर

खामगाव तालुक्यातील पोरज येथे २१ एप्रिलपासून संगीतमय श्रीमद् भागवत कथा ज्ञान सप्ताहाला सुरुवात झाली आहे. रामायण कथावाचन गणेश महाराज लोखंडे करीत आहेत. सप्ताहाच्या अनुषंगाने विविध धार्मिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले असून रात्री ९ वाजता श्रीहरी कीर्तनाचे कार्यक्रम होतील. यात सप्ताहभर रात्री ९ वाजता जनार्दन महाराज, गुलाबराव महाराज, रमेश महाराज कचरे, अंजनाबाई जगताप, योगेश महाराज खवले, नीलेश महाराज भुंबरे, तुकाराम महाराज सखारामपूर यांचे कीर्तन होईल. त्यानिमित्त २८ एप्रिलला सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत गणेश महाराज लोखंडे यांचे काल्याचे कीर्तन पार पडेल, त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल.

टाकरखेड येथे उभारले आकर्षक शनि मंदिर
नांदुरा, २२ एप्रिल / प्रतिनिधी

मोताळा-नांदुरा मार्गावरील शनी टाकरखेड येथे आकर्षक शनि मंदिर उभारण्यात आल्याने शनिभक्तांची दर्शनासाठी गर्दी होत आहे. २५ एप्रिलला शनी अमावस्या असल्याने या ठिकाणी हजारोच्या संख्येने भाविकांची गर्दी उसळणार आहे. टाकरखेडपासून पूर्वेस दीड किलोमीटर अंतरावर शनि मंदिर आहे. ८ ते १० एकराचा शनि मंदिरचा परिसर विविध फुलझाडांनी सुंदर दिसत आहे. भव्यदिव्य शनिमूर्ती व महालक्ष्मी मूर्ती विशेष आकर्षक ठरत आहे. राजस्थानी कलाकारांच्या कलाकुसरीतून तेथीलच राजस्थानी कोटय़ातून बनवलेली सुरेख विशाल मंदिरे व महाराजाद्वार पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडतात व गुलाबांच्या फुलांनी या संपूर्ण परिसराला वेगळे रूप दिले आहे.

केशवराव जेधे जयंती साजरी
बुलढाणा, २२ एप्रिल / प्रतिनिधी

इतिहास हा समाजाचा मार्गदर्शक असतो. इतिहास हा विद्युत प्रवाहासारखा असतो. नवा इतिहास घडविण्यासाठी महापुरुषांचे विचार विसरायला नको. महान सत्यशोधक विचारवंत केशवराव जेधे यांनी महात्मा जोतिराव यांचा पूर्णाकृती पुतळा २० हजार रुपये खर्च करून नगरपालिकेने पूर्ण शहरात सार्वजनिक ठिकाणी बसवावा, असा ठराव जुलै १९२५ ला नऊ सभासदांच्या सहीने नगरपालिकेत पाठविला होता. सत्यशोधक केशवराव जेधे व दिनकरराव जवळकर यांनी ‘देशाचे दुष्मन’ हे क्रांतिकारी पुस्तक समाजाला अर्पण करून बहुजन समाजाला नवी दिशा दिली आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर सनातन्यांनी सभा घेऊन निषेध नोंदविला होता. या प्रबोधनात्मक पुस्तकासाठी जवळकर केशवराव जेधे यांना दंड व शिक्षा झाली. मात्र, डॉ. आंबेडकरांनी कसलेही शुल्क न घेता ही केस चालवून जेधे-जवळकरांना निर्दोष मुक्त केले होते. इतिहास घडत नाही तो घडवावा लागतो, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे विभागीय सचिव प्रशांत खाचणे यांनी सत्यशोधक केशवराव जेधे यांच्या ११३ व्या जयंतीदिनी आयोजित कार्यक्रमात केले. सत्यशोधक केशवराव जेधे जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिव प्रशांत खाचणे होते. कार्यक्रमाला नंदिनी खेडेकर, सुभाष इंगळे व डॉ. प्रशांत ढोरे उपस्थित होते. जिजाऊ वंदनेने कार्यक्रमास प्रारंभ झाला. डॉ. डी.जे. खेडेकर व सुभाष इंगळे, यांनी सत्यशोधक केशवराव जेधे यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली. संचालन प्रा. विजय पाटील यांनी तर शोभा जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

मजुरांवर उपासमारीची वेळ
नांदुरा, २२ एप्रिल / प्रतिनिधी

तालुक्यातील धानोरा विटाळी शिवारातील महिको सीडस् कंपनीने मजुरांना कामावरून कमी केल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या मजुरांना कामावर घेण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मजूर व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. महिका सीडस् कंपनीने धानोरा येथील ग्रामपंचायतीने नाहरकत प्रमाणपत्र घेताना स्थानिक मजुरांना प्राधान्य देण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात कंपनीने बाहेरील मजुरांना कामावर घेऊन स्थानिकांना डावलले. गावातीलच मजुरांना काम देण्यात यावे, या मागणीसाठी मजुरांना यापूर्वी आंदोलन केले. त्यावेळी तहसीलदारांच्या समक्षच गावातील मजुरांना कामावर प्राधान्याने घेण्यात येईल, असे लेखी आश्वासन कंपनीने दिले होते; परंतु ४ एप्रिलला महिकोने ग्रामपंचायतीने इमारत कराची आकारणी केल्याचे कारण पुढे करून मजुरांना कामावरून कमी केले. ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत अधिनियमानुसार कराची आकारणी सुरू केली असून, वसुलीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळेच कंपनीच्या खोडसाळ अधिकाऱ्यांनी मजुरांना कामावरून कमी करण्याचे षडयंत्र रचले. परिणामी मजुरांवर उपासमार ओढवली आहे.

बल्लारपुरात विद्यार्थ्यांना रोपटय़ांचे वितरण
बल्लारपूर, २२ एप्रिल / वार्ताहर

महात्मा ज्योतिबा फुले जयंती कार्यक्रमात पार्टिसिपेटरी असोसिएशन फॉर रूरल अॅन्ड ट्रायबल सोसायटीज (पार्टस्) द्वारा संचालित पर्यावरण वाहिनीतर्फे महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना फळजातीय रोपटय़ांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक माणिकराव दुधलकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून वसंत खेडेकर, समाजसेवक बाबाभाई, सुरैय्या हुसेन उपस्थित होते. स्वच्छ पर्यावरणाकरिता वृक्षारोपण व संवर्धनाचे महत्त्व सांगितले. प्रत्येकाने या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. प्रास्ताविक संस्थाध्यक्ष शरीफ गुरुजी यांनी तर संचालन व आभार मकसुद अहमद यांनी मानले. सैफुल्ला बेग, युसूफ शेख अब्दुल सलीम वाजेदा पठाण, शमशाद पठाण, फातेमा तनवीर, अमान खान, नागो कोडापे, संतोष फुलझेले आदींची कार्यक्रमास उपस्थिती होती.

बंधाऱ्यातील अपहारप्रकरणी अभियंता, कंत्राटदारांना जामीन
अकोला, २२ एप्रिल/प्रतिनिधी

पातूर उपविभागातील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या कामातील ६४ लाखांच्या अपहारप्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या अभियंते आणि कंत्राटदारांना न्यायालयाने मंगळवारी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. या प्रकरणात उपअभियंता वसंत कुळकर्णी, शाखा अभियंता संजय चव्हाण, आर.एम. मावंदे यांच्यावर चान्नी, बाळापूर, उरळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. अकोला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांच्या तक्रोरीवरून हे गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुन्हे दाखल झालेल्यांमध्ये सुरेश वानखडे, साहेबराव हिवराळे, राजाराम लोहकरे, अनंत तायडे, गजानन हरमकार या कंत्राटदारांचाही समावेश होता. आरोपींनी जामीनसाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. प्रथम श्रेणी तदर्थ व सत्र न्यायाधीश एस.बी. म्हस्के यांच्या न्यायालयाने प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आरोपींना जामीन मंजूर केला. सरकारतर्फे अॅड. एस.एस. काटे यांनी आरोपींच्या वतीने अॅड. मोहन मोयल, अॅड. एस.एस. ठाकूर, अॅड. चंद्रकांत थानवी यांनी काम पाहिले. याप्रकरणाची पुढील सुनावणी २ मे रोजी आहे.

बालिकेवर अतिप्रसंग, आरोपीस ५ वर्षांची सक्तमजुरी
यवतमाळ, २२ एप्रिल / वार्ताहर

तालुक्यातील बोरीअरब येथील सात वर्षीय बालिकेवर अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने ५ वर्षांची सक्तमजुरी आणि १ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. आंध्रप्रदेशातील सिकंदराबाद येथून बोरीअरब येथे एक कुटुंब राहायला आले. याच कुटुंबाच्या ओळखीने एक व्यक्ती बोरीअरब येथे राहायला आले. कुटुंबातील सात वर्षांची मुलगी त्यांच्याकडे गेली असता आरोपी उत्तम दाणीने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. वैद्यकीय तपासणीत बालिकेवर अतिप्रसंग झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी आरोपी उत्तम दाणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सत्र न्यायाधीश डी.आर. सिरसाव यांच्या न्यायालयात ३ एप्रिल २००८ पासून सुनावणी सुरू होती. याप्रकरणी कुकर्म केल्याचे सिद्ध झाल्यामुळे आरोपीस ५ वर्षांची शिक्षा व १ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.