Leading International Marathi News Daily
गुरुवार । २३ एप्रिल २००९

घरोघरी

माधुरी : आले, आले. आता या वेळेला कोण आलं असेल? ही काय बेल वाजवायची पद्धत झाली का? अरे, हो, हो, जे कोण आहे ते थांबा जरा. माणसाला यायला काही वेळ लागतो का नाही? पण यांना वाटतं की जसे काय आम्ही डोअरकीपरच आहोत. यांनी बेल वाजवली की, लगेच दार उघडायला.. अग बाई, रश्मी तू?
रश्मी : माऽऽऽ ई, वैतागली असशील ना?
माधुरी : वैतागले होते खरी. अगं, डोळ्यात औषध घातलं होतं ना. मग पटकन उठून येता येईना..
रश्मी : ओह! I am so sorry माई.
माधुरी : चल ग, सॉरी कशासाठी? तुला काय माहिती होतं का, मी आता औषध घालणार आहे म्हणून..
रश्मी : तरी पण..
माधुरी : तरी पण वगैरे जाऊ दे. तुला पाह्यलं आणि वैताग, राग कुठल्या कुठे पळाला. आमची ‘मनू’ राग ‘देत’ नाही.

 

‘घालवते’, पण काय गं मनू, अशी रात्रीच्या वेळेस आलीस? काल आपण फोनवर बोलले होतो तेव्हा काही बोलली नाहीस. सकाळी रेखाही काही बोलली नाही आणि आता अचानकशी आलीस. भांडून बिंडून नाही ना आलीस?
रश्मी : माई, माई, अगं, किती शंका या?
माधुरी : अगं, शंका येतील नाही तर काय? आजकाल तुम्ही मुली कशा वागाल काही सांगता येत नाही. ती परांजप्यांची मेघा आठ दिवसांत माहेरी परत आलीच ना!
रश्मी : माई, एका मेघावरून सगळ्या तरुण मुलींना नावं ठेवू नकोस.
माधुरी : अगं, पण माझे बाई, मग सांगशील का तू आता इथं कशी?
रश्मी : सांगते ना माई, पण तू सांगू देशील तर ना!
माधुरी : सांग बाई पटकन. आता या वेळेला ही अशी तुला दाराशी पाहिली न सांगता, न सवरता.. आणि नको नको ते विचार मनात आले बघ. म्हणतात ना, मन चिंती ते वैरी न चिंती. ती राण्यांची सून..
रश्मी : काकू, माई आता मी बोलू का?
माधुरी : बोल बाई, बोल पटकन.
रश्मी : माई, तू समजतेस तसं काहीही झालेलं नाहीय. नो भांडण-बिंडण. आज मी इथं येणार, हे अगदी प्री-प्लॅन्ड आहे. मंीच आईला सांगितलं होतं की, माईला काही सांगू नकोस. मला तिला सरप्राईज द्यायचं आहे.
माधुरी : अगं लबाडे, असं आहे होय! आणि मैत्रेयरावांनी बरं सोडलं या नव्या नवरीला!
रश्मी : अगं माई, तो गेलाय दोन-तीन दिवसांसाठी बाहेर. म्हणूनच तोच म्हणाला, इथं एकटीच राहणार, त्यापेक्षा आईकडे जा.
माधुरी : हो का! म्हणजे रीतसर परवानगी घेऊन आली आहेस तर मैत्रेयरावांची!
रश्मी : माई, काय हे मैत्रेयराव, मैत्रेयराव लावलं आहेस?
माधुरी : अगं, आम्ही जुनी माणसं आणि ते जावईबापू. हे असं तुमच्यासारखं ‘अरे तुरे’ करणं नाही जमत.
रश्मी : पण मैत्रेयच्या बाबतीत तरी ही सवय करून घे. ‘अहो जाहो’ केलेलं त्याला अजिबात आवडत नाही आणि ‘मैत्रेयराव’ काय? मलाही नाही हं आवडत.
माधुरी : बरं बाई, नाही म्हणणार हो ‘तुझ्या’ मैत्रेयला ‘मैत्रेयराव’.
रश्मी : माई..
माधुरी : बरं, कसा काय चाललाय राजा-राणीचा संसार? खूश आहेस ना पोरी?
रश्मी : एकदम. माई, मी खूप आनंदात आहे खरंच.
माधुरी : रश्मी, हे बघ. आज इथंच राहा. रात्रभर मस्तपैकी गप्पा मारू. किती बोलायचंय तुझ्याशी..
रश्मी : माई, तरी रोज आपण फोनवर बोलतोच.
माधुरी : ते फोनवरचं कसलं ग बोलणं! या अशा गप्पा मारण्यातली मजा नाही बघ.
रश्मी : खरंय गं माई. मीही आईला सांगून आलेय की, मी आज इथंच झोपणार आहे.
माधुरी : अगं, पण तिलाही तुझ्याशी गप्पा मारायच्या असतील ना!
रश्मी : आई आज खूप दमलीये. तिची अर्धाशिशीही उफाळून आलीये. म्हणून तिला गोळी दिली. म्हटलं, मस्त झोप. उद्या दिवसभर गप्पा मारू.
माधुरी : चल, मग आधी काही तरी खाऊन घे. आंबोळ्या करते तुझ्या आवडीच्या.
रश्मी : माई, तुम्हा बायकांना खाण्या-पिण्याशिवाय काही सुचत नाही का ग? माझं खाणं-पिणं सगळं झालंय. बरं नव्हतं तरी आईनं केवढं काय काय करून ठेवलं होतं. तुडुंब पोट भरलंय माझं. आता भूक लागलीये गप्पांची. चल, मी गाद्या घालते. लोळत लोळत गप्पा मारूया.
माधुरी : तू थांब. मी घालते गाद्या. माहेरवाशीण ना तू. आता काम नाही करायचं.
रश्मी : माई, पुरे हं! तू आणि आई अगदी एका मुशीतनं घडल्या आहात जणू. कसली माहेरवाशीण आणि कसलं काय! माझा काही कामानं पिट्टय़ा पडत नाहीये तिकडे. बघ, बोलता बोलता गाद्या घालूनही झाल्या बघ.
माधुरी : रश्मी, गाद्या घालणं कुणी अगदी तुझ्याकडून शिकावं. पलंगपोसावर एकही सुरकुती नाही बघ. आणि काय गं रश्मी, तुला म्हणे भाकरी जमली नाही..
रश्मी : ते ‘भाकरी’ प्रकरण आलं वाटतं तुझ्यापर्यंत!
माधुरी : रेखा सांगत होती. पण तेवढय़ात बाबांचे मित्र आले आणि विषय अर्धवटच राहिला. काय झालं नेमकं?
रश्मी : काय सांगू माई! मैत्रेय आणि त्याचे मित्र म्हणजे खोडय़ा काढण्यात एक्स्पर्ट आहेत. अगं, त्या दिवशी सगळ्यांच्या अंगात ‘बालिका वधू’च संचारली होती.
माधुरी : म्हणजे काय?
रश्मी : म्हणजे त्या सगळ्यांनी काय फतवा काढला माहित्ये? म्हणे, ‘नई बहू’नं सगळ्यांना काही तरी ‘खिलवलं’ पाहिजे. तेही स्वत:च्या हातानं केलेलं. मीही म्हटलं, खीर करते. तर म्हणाले, नाही. आम्हाला भाकरी पाहिजे.
माधुरी : आणि तुला तर भाकरी व्यवस्थित येते. मग काही प्रश्नच नाही.
रश्मी : होनं. त्यामुळे मला काहीच टेन्शन नव्हतं. मनाशी म्हटलं, मुझसे पंगा ले रहे हो! दिखाती हूं सबको रश्मी क्या चीज है. पण अगं माई, या मंडळींनी काय केलं माहितेय? अग, भाकऱ्या करायला जे पीठ दिलं नां ते बहुधा जुनं, विरी गेलेलं होतं. मग भाकऱ्या जमेचनात की ग! सगळ्या भाकऱ्यांचे तुकडे पडायला लागले. ते पाहून मैत्रेय आणि कंपनीला चेवच चढला. ‘टुटी फूटी रोटी तेरे हाथोंकी खाके आया बडा मजा..’ करत नाचायला लागले. आणि इकडे माझा चेहरा पडलेला.. एवढासा झालेला..
माधुरी : होणारच.
रश्मी : अगं, पण खरी मजा पुढंच आहे.
माधुरी : ती काय आणखी?
रश्मी : अगं, मैत्रेय आणि कंपनी नाच-गाण्यात दंग होते ना, तेव्हा मैत्रेयच्या आजीनं सगळा प्रकार सांगितला. आणि म्हणाल्या, रड आता..
माधुरी : अगं बाई..
रश्मी : हो नं. म्हणाल्या, लग्न ताजं ताजं असतं ना, तेव्हाच फक्त नवऱ्यांना बायकोच्या डोळ्यातल्या अश्रूंची किंमत असते. तू रड. बघ कसा धावत येईल अश्रू पुसायला. आणि मग, तसंच झालं. मी रडतेय पाहिल्यानंतर सगळेजण चेहरा पाडून उभे राहिले, सॉरी सॉरी म्हणत.. माई, माझी पर्स दे ना ती. मोबाईल वाजतोय.. हॅलो मैत्रेय, बोल. झोपला नाहीस अजून? जेवलास ना नीट! जास्त तेलकट खाऊ नकोस. अ‍ॅसिडिटी होते तुला. सकाळी लवकर उठायचं असेल ना? गजर लावलास? का मीच ‘वेलअप कॉल’ देऊ?..
shubhadey@gmail.com