Leading International Marathi News Daily
गुरुवार । २३ एप्रिल २००९

ओठांवर हसू उमटविणारं नवीन ऑलिम्पिक नुकतंच सुरू झालं आहे. ‘अनएम्प्लॉयमेंट ऑलिम्पिक’. मंगळवारी ३१ मार्चला त्याची ज्योत पेटली. निक गोडार्ड या संगणक अभियंत्याच्या या कल्पनेला दाद मिळत जागोजागी ही ऑलिम्पिक होतील, अशी चिन्हे आहेत. बेरोजगार आहोत याचा पुरावा सादर करायचा एवढीच किमान पात्रता यासाठी आहे. या पहिल्यावहिल्या ऑलिम्पिकमध्ये चाळीस लोकांनी भाग घेतला.
‘आय. बी. एम. उद्या बरीच लोकं काढणार. संपूर्ण अमेरिकेत रॅले भागात आय. बी. एम.चे सर्वात अधिक कर्मचारी आहेत. त्यातील नक्की किती लोकांच्या नोकरीवर गदा येणार याची कल्पना नाही.’ दूरदर्शनवरील बातमी ऐकताना नकळत कोण कोण भारतीय तिथे काम करतात याचा विचार सुरू झाला. जागतिक आर्थिक मंदी म्हणजे काय याचा अर्थ सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत सांगणारे लेख सगळीकडे येत आहेत. या काळात ज्या हकिकती कानावर पडतात त्याने चक्रावून जायला होतं पण पडत्या काळातून सावरताना परत उभं राहताना बेरोजगारीचा रस्ता सुखद वळणावर कसा नेता येतो तेही ऐकणं, वाचणं तितकंच आश्चर्यकारक. अशाच या काही हकीकती काही भारतीयांच्या काही इथल्याच लोकांच्या.

 

ओठांवर हसू उमटविणारं नवीन ऑलिम्पिक नुकतंच सुरू झालं आहे. ‘अनएम्प्लॉयमेंट ऑलिम्पिक’. मंगळवारी ३१ मार्चला त्याची ज्योत पेटली. निक गोडार्ड या संगणक अभियंत्याच्या या कल्पनेला दाद मिळत जागोजागी ही ऑलिम्पिक होतील, अशी चिन्हे आहेत. बेरोजगार आहोत याचा पुरावा सादर करायचा एवढीच किमान पात्रता यासाठी आहे. या पहिल्या वहिल्या ऑलिम्पिकमध्ये चाळीस लोकांनी भाग घेतला. पिंक स्लीप (हकालपट्टीची नोटीस) हातात पडली की, सर्वप्रथम राग येतो तो साहेबांचा. साहेबांच्या समोरचा पेपरवेट कुणावर तरी मारावा, अशी तीव्र इच्छा होते. राम राम ठोकून निघायच्या आधी कार्यालयातील गोष्टी भिरकावून द्याव्याशाही वाटतात. मनातल्या अशा गोष्टी प्रत्यक्षात उतरविता येणारं हे ऑलिम्पिक. पिन्याटावर (चॉकलेट किंवा काहीही भरलेला पुठ्ठय़ाचा खोका) खेळातल्या बॅटने सपासप मारता येतं. काठीने सेलफोन दूरवर उडविता येतो. गाढवाच्या शेपटीवर टाचणी टोचणे हा या स्पर्धेतला आणखी एक खेळ. त्यासाठी डोळ्यांवर टोपी लावून गोल गोल फिरायचं आणि टाचणी अचूक लक्ष्यावर फेकायची. लक्ष्य चुकलं तरी टाचणी कुठल्या ना कुठल्या रंगीबेरंगी फलकावर खुपसली जातेच. फलक असतात माजी साहेब, युद्ध, आर्थिक मंदी, कर्ज अशा नावाचे. स्पर्धा म्हटली की बक्षिसं आलीच. छोटी-मोठी अनेक बक्षिसं विजेत्यांना मिळाली. चाळीस लोकांच्या सहभागानं साजरं झालेलं ऑलिम्पिक सर्वाना, आपल्यासारखेच खूप आहेत हे समाधान देऊन गेलं. थोडा वेळ सर्व चिंता विसरून पुन्हा लहान झाल्यासारखंही बऱ्याच जणांना वाटलं.
मंदीची झळ सर्वाधिक जाणवत असलेल्या भागातील अमेरिकेतील एक हायस्कूल.. या लहान गावात पाचातील एक नोकरीच्या शोधात आहे. मुलांच्या वागण्या-बोलण्यातली अनिश्चित भविष्याची चिंता पाहून बारा-चौदा वर्षांंच्या मुलांना त्यांच्या भाषेच्या शिक्षिकेनं बोलतं करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. कुणी बोलायलाच तयार नव्हतं. पण शिक्षिकेचा निर्धार पक्का होता. ठीक आहे, नाही ना तुम्हाला सर्वासमोर बोलायचं. बंद खोलीतल्या कॅमेऱ्यासमोर बोला. तिथे मोकळेपणा वाटेल. तिने सर्वाना समजावून सांगून ही कल्पना मुलांच्या गळी उतरवली. पाणावलेल्या डोळ्यांनी, हुंदके लपवीत मुलं कॅमेऱ्यासमोर आपलं मन मोकळं करतात. शाळेचा कॅमेरा प्रत्येकांची कहाणी टिपतो. कॅमेऱ्यासमोर दिसणाऱ्या प्रत्येक नावात, चेहऱ्यात देशातल्या, जगातल्या कितीतरी संघर्षांच्या हृदयद्रावक कहाण्या लपलेल्या आहेत. ही मुलं याचं प्रतिनिधित्व करतात. एमी घराबद्दल तसं तुटक तुटकच बोलते. ‘घरी आम्ही तिघी. आई आणि लहान बहीण, आई रेस्टॉरंटमध्ये वेट्रेस म्हणून काम करते. मिळणाऱ्या ‘टिप्स्’वर तिचं आणि आमचं जगणं अवलंबून आहे. पण गावात किती तरी लोकांना नोकऱ्याच नाहीत तर कोण कसं येणार सारखं बाहेर जेवायला?’ ती कॅमेऱ्याकडे रोखून पाहत आपल्यालाच पेचात पाडते. ‘भविष्याच्या चिंतेने जो तो काटकसरीच्या प्रयत्नात. रेस्टॉरंटमध्ये गर्दी कमी व्हायला लागली त्यामुळे टिप्स् मिळत नाहीत. आम्ही दोघी बहिणी बेबी सीटिंग करून थोडे फार पैसे मिळवतो पण ते तसे फार नाहीत. रोजचे खर्च, घराचं कर्ज, पाणी, विजेचं बिल.. सगळं घर मेटाकुटीला आलं आहे. घरातल्या टेबलावर आईला तोच तोच हिशेब परत परत करताना पाहिलं की काय करावं ते समजत नाही.’ कॅमेऱ्यासमोर नजर रोखून धीटपणे आपल्याला पेचात पाडणारी एमी अचानक चेहरा झाकते आणि आईची चिंता दूर करता येत नाही म्हणून कॅमेऱ्यासमोर हमसाहमशी रडते.
क्रिसचे वडील गेले सहा महिने अकाऊंटंट म्हणून नोकरी शोधत आहेत. आई एका पाळणाघरात नोकरी करते. महिन्याला जेमतेम हातात पडणाऱ्या १००० डॉलर्समधून घरखर्च हाताबाहेर चाललेला. घरात मतिमंद भाऊ. क्रिसच्या घरातला रिकामा फ्रिज त्याला शाळेत जायला भाग पाडतो. कारण कमी उत्पन्न असलेल्या मुलांना शाळा मोफत जेवण पुरवितात. ‘एक वेळच्या जेवणाची सोय शाळेतच होते ना म्हणून रोजच्या रोज मी शाळेत येतो.’ खिन्न हसत तो अश्रू लपवायचे प्रयत्न करतो पण क्षणात तो नाद सोडत क्रिस रडत रडत बोलत राहतो.
अ‍ॅनाचं सर्वच कुटुंब शेल्टरमध्ये राहायला गेलेलं. बाबा कार विक्रेते. आई मॉर्टगेज कलेक्टर. ‘लोकं घरच सोडून चालले आहेत तर आई हप्ते गोळा करण्याचं काम कसं करणार? आणि गाडय़ा विकणं सोपं राहिलं आहे का?’ अ‍ॅना बोलायची थांबते. तिथल्या खुर्चीवर बसकण मारते. कॅमेऱ्यासमोर बराच वेळ खोलीतली भिंत दिसत राहते.
अस्वस्थ मनाने आपण अ‍ॅनाची समजूत कशी घालता येईल याचा विचार करायला लागतो. तेवढय़ात डोळे चोळत ती उभी राहते. आपलं बोलणं पुढे चालू ठेवते. ‘तरी सात महिने आम्ही कसंबसं भागवीत होतो पण घरात लाइट नाही, पाणी नाही. काय करणार? शेल्टरमधली एक खोली आता आमचं घर आहे. तिथे बाहेर फिरताना मी आमच्या घराच्या आसपास आहे, अशी कल्पना करते. किती तरी वेळा आम्ही सगळे सोडून आलेलं घर नुसतं दृष्टीखालून घालायला घरापाशी जातो. ते तसंच उभं आहे, पडीक. बाबांना आणि आईला परत नोकरी मिळाली की कदाचित जाऊ तिथे राहायला. विजेचं बिल आणि खाणं-पिणं एवढा खर्च तरी करता यायला हवा नं.’
सर्वच मुलांना काय आणि किती बोलू असं होऊन गेलेलं. प्रत्येकाची कहाणी मुलं नंतर वर्गात एकत्र बसून पाहतात. गळ्यात गळे घालून रडतात. शाळा आणि मुलांना यातूनच एक अभिनव कल्पना सुचते. आपली कहाणी ‘यू टय़ूब’वर प्रसिद्ध करायची. शीर्षक ‘इज एनीबडी लिसनिंग?’ आणि खरंच या मुलांची हाक ऐकली गेली. वादळानंतर प्रकाश दिसतो हे क्रिसचे उद्गार सार्थ ठरले. कुणा अनामिकाने शाळेला पंधरा हजार डॉलर्सची देणगी दिली. एका शेतकऱ्याने तर २००० डॉलर्सबरोबरच ४०० पौंड अ‍ॅव्होकाडो (सध्या कोकणात या फळाची लागवड झाली असून हे फळ बाजारपेठेत उपलब्ध आहे) शाळेला दिले. मुलांच्या आई-वडिलांना नोकऱ्या देण्याची आश्वासनं मिळत आहेत. किती तरी ई-मेल शाळेला अजून वाचायच्या आहेत.
या मुलांना, त्यांच्या पालकांना आशेचा किरण दिसला, पण या उलट कॅलिफोर्नियात सॅक्रेमेंटो गावात नदीच्या काठावर तंबूत राहणाऱ्या लोकांची संख्या वाढलेली आहे. सध्या तेथे शंभर तंबूत तीनशेच्या आसपास घर गमावलेले ‘होमलेस’ लोक आहेत. यातील बरेचसे लोक जवळच्याच चर्चमध्ये मोफत पुरविल्या जाणाऱ्या जेवणावर एक वेळ काढतात. सँटाक्लारा शहरात गाडय़ा आणि ट्रकमध्येच बरीच लोकं झोपतात हे पाहून म्युनिसिपालटीने त्यांना स्वतंत्र पार्किंग लॉट बहाल केला आहे. हळूहळू असे तंबू इतर शहरांच्या आसपासही दिसू लागले आहेत. प्रश्न असा पडतो की या लोकांना मदत करणारं कुणीच नाही का? आई, वडील, भावंडं, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी? पण बरेच लोक याच संकटाचून जात असताना कोण कुणाला आधार देणार हे कटू सत्य त्यात दडलेलं आहे.
आपल्या भारतीयांच्या माथी काही वेगळं नशीब रेखाटलेलं नाही. त्यातल्याच या काही प्रातिनिधिक कहाण्या. जवळपास चाळीस लाखाच्या आसपास भारतीय या देशात आहेत. तुमच्या घरात किंवा आजूबाजूला कुणी ना कुणीतरी नोकरीच्या शोधात असलेलं नजरेला पडतंच. काहींना दुसरी नोकरी मिळेलच याची खात्री आहे तर काही जण नुसत्या खात्रीवर न थांबता त्या व्यतिरिक्त काही मार्ग चाचपडताना दिसतात. यातच पालकांच्या नोकऱ्यांवर अवलंबून असलेलं मुलांचं भावविश्व विसरून चालणार नाही.
‘युवर लास्ट डेट विल बी २८ फेब्रुवारी २००८.’
ई-मेल वाचताना विक्रम कानडेला उगाचच समाधान वाटलं. खरं तर असं व्हायला नको होतं. अस्वस्थपणा यायला हवा होता. पण तसं झालं नाही. ग्लॅक्सोमध्ये गेली अकरा र्वष दिवसाचे चौदा-पंधरा तास आणि रात्री-अपरात्री केलेलं काम. यातून मिळणाऱ्या विश्रांतीचा आनंद पुढल्या अशाश्वत भविष्यापेक्षाही अधिक होता. थोडासा आराम आणि घरातल्या लोकांचा सहवास हाच विचार मनात आधी डोकावला. नंतर मिळेलच नोकरी, फार तर ट्रॅव्हल करावं लागेल. पण ते तर ग्लोबलायझेशनच्या जमान्यात प्रत्येकाच्याच माथी मारलेलं. मनात खूप गोष्टी घोळायला लागल्या होत्या. सुरुवातीचे दोन-तीन महिने खूपच चांगले गेले. मनातल्या गोष्टी प्रत्यक्षात उतरत होत्या. त्यातही वेळ मिळाला तेव्हा रेझ्युमे अपडेट करून मॉनस्टर, करिअर लिंक, डाइस अशा कितीतरी संकेत स्थळांवर टाकला. नेहमीच्या अनुभवाप्रमाणे लगेचच फोन खणखणणं नको होतं. बघता बघता यालाही वर्ष होऊन गेलं. आता विक्रम अधीरपणे कधी काम सुरू होईल याची वाट पाहतोय. पण आता खरा मंदीने कळस गाठलेला आहे त्यामुळे कठीणच दिसतंय. हा कडू घोट पचवायला फार प्रयास पडतात, हे सांगताना विक्रमच्या आवाजातली निराशा लपत नाही. बाजूला बसलेली मालती हसते. ‘विक्रमची नोकरी गेल्यानंतर मी तीन-चार महिन्यांनी बँकेत काम करणं सुरू केलं. पण माझीही नोकरी गेली आहे गेल्या महिन्यात. पुढे काय माहीत नाही. पण एक बरं आहे की आम्ही अपार्टमेंटमध्येच राहतोय त्यामुळे घर, कर्जाचे हप्ते, घरासंदर्भात सतत निघणारी कामं, दुरुस्त्या असल्या खर्चाची काळजी नाही. मुलं नाहीत हेही समाधानच वाटतंय या स्थितीत. गाशा गुंडाळून कधीही जिथे नोकरी मिळेल तिथे जाता येईल. ज्यांनी घरं घेतली आहेत आणि नोकऱ्या गेल्या आहेत, त्यांची फारच पंचाईत, घर विकलं जाणं, भाडय़ाने जाणं या काळात शक्यच नाही. हप्ते भरता येत नाहीत म्हणून बँकेने घर ताब्यात घेतलेलं पाहण्याचं नको यायला नशिबात.’
प्रत्येकाच्या मनातलं मालती बोलते आणि ते खरंही आहे. त्यात शाळेत जाणारी मुलं असतील तर खूपच अवघड होतं. घरात नाहीतर मित्रमंडळींशी फोनवर, चर्चेत सतत तीच होणारी चर्चा मुलांना अस्वस्थ करून टाकते. बारीकसारीक बदल मुलं टिपत आहेत हे लक्षात येतं, जेव्हा घरातील खर्च कसे वाचविता येतील याचे वेगवेगळे मार्ग ती सुचवितात तेव्हा. मुलांच्या मनात भीती दडलेली असते ती नोकरीसाठी शहर सोडावं लागलं तर शाळा, मित्र-मैत्रिणी यांना सोडून जावं लागणार. घराचे हप्ते फेडणं जमलं नाही तर बँक घर ताब्यात घेऊन घरासमोर फोर क्लोजरची (बँकेची घरजप्ती आणि ती घरं विकून टाकण्याचा मार्ग) पाटी लागणार याची.
चौदा वर्षांच्या राखीने वडिलांची नोकरी गेल्यावर आई-वडिलांच्या लक्षातही येणार नाही पण खर्च कमी होतील अशा गोष्टी केल्या. त्यातल्या काही तर आपल्याला क्षुल्लक वाटतील अशा तरीही महत्त्वपूर्ण. कपडे वाळविण्यासाठी ड्रायर न वापरता बाहेर तिने दोरीच बांधली. उन्हात वाळलेले कपडे नाहीतरी ड्रायरमधून काढलेल्या कपडय़ापेक्षा जास्त दिवस टिकतात; म्हणजे नवीन कपडे लवकर घ्यायला नकोत, ड्रायरसाठी वापरली जाणाऱ्या विजेचीही बचत.
बॅलेचा वर्ग चालूच ठेवण्यासाठी अभिनव मार्ग सानिकाने शोधला. स्टुडिओच्या स्वच्छतेचं काम तिने स्वत:हून अंगावर घेतलं. त्यातून मालकाने तिला वर्ग चालू ठेवायला परवानगी दिलीच पण कधीही येऊन बॅलेचा सराव करण्याची मुभाही. यातूनच तिच्या आई-बाबांनाही अधिक उत्पन्नाचा एक मार्ग सुचला. घरातली खोली भाडय़ानं देणं! इतके दिवस ते मुलांना त्यांच्या लहानपणी मुंबईत दोन खोल्यात कशी किती जणं राहत, इथल्या बाथरूम म्हणजे त्यांच्या दोन खोल्या अशा गोष्टी रंगवून सांगत. महालासारख्या घरात इथली मुलं वाढतात. त्यांना हे कळणं कठीणच. पण आता एका दगडात दोन पक्षी. अधिक उत्पन्नाचा एक मार्ग आणि मुलांसाठी तडजोडीचं एक प्रात्यक्षिक. त्या दोघांनी लगेचच क्रेग्स लिस्ट (प्रत्येक शहरातील स्थानिक जाहिरातीचं संकेतस्थळ) मध्ये जाहिरात दिली. दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरातील खोली गेलीदेखील. त्या खोलीचा वापर फारसा होत नव्हताच. त्यांच्याकडच्या एका खोलीत राहणाऱ्या भाडेकरूला मार्थाला ही कल्पना खूपच नावीन्यपूर्ण वाटली. ती एकटीच. जेमतेम पंचविशीची. शाळेच्या जवळ असलेल्या अपार्टमेंटचं सहाशे डॉलर्सचं भाडं एकटय़ासाठी तिला जास्तच होत होतं. या घरातली ही एक खोली फक्त साडे-तीनशे डॉलर्सला तिने क्रेग्स लिस्टवर पाहिली आणि डोळे झाकून इथे राहायचं ठरवलं. पुन्हा भारतीय म्हणजे सुरक्षितपणाची खात्रीही. कधी तरी आवडती इंडियन करी चाखायला मिळेल ही देखील आशा आहे, असं ती हसत हसत सांगते. खर्च कमी करण्याच्या दृष्टीने हा प्रघात या देशात आता पडू पाहत आहे तोही नावीन्यपूर्ण म्हणून. नवलच नाही का? मुलं त्यांचे पालक यांचा विचार करताना वयस्कर लोकांच्या हालाची कल्पनाही करवत नाही. ४०१ के (सेवानिवृत्तीसाठी पैसा, पेन्शन फंड) मध्ये असलेला पैसा पुन्हा नजरेला पडेल की नाही हे त्यांना सांगता येत नाही. इथे खासगी कंपन्या हा पैसा वेगवेगळ्या म्युच्युअल फंड कंपन्यांमध्ये तुमच्या पसंतीनुसार गुंतवतात. शेअर मार्केटची परिस्थिती सर्वज्ञात आहे. सध्या बहुतेकांच्या पेन्शनचा आकडा तळाला गेलेला आहे. हा पैसा पुन्हा वर यायला जेवढी वर्ष लागतील तोपर्यंत या वृद्धांच्या आयुष्याची शाश्वतीही नाही. वयामुळे लहानसहान नोकरी मिळवणंही कठीण होऊन बसलेलं. बरीच वयस्कर मंडळी प्रकृतीचा धोका अधिक वाढतो हे समजत असूनही अमेरिकेत नेहमीच महागडी मिळणारी औषधं घेणं टाळतात. हीटरचं बिल येऊ नये म्हणून थंडीत कुडकुडत दिवस काढतात. आहे हे असं आहे. सद्य परिस्थितीतून मार्ग काढताना नजीकच्या काळातील बदलत्या चित्राचा आशावाद प्रत्येकाच्या मनात आहे आणि तो भाबडा तर ठरणार नाही ना, ही काळजीही.
मोहना जोगळेकर