Leading International Marathi News Daily
गुरुवार । २३ एप्रिल २००९

आपल्याच स्वप्नरंजनात रममाण असणाऱ्यांना डोळे उघडायला लावणारं सदर ‘थर्ड आय’
पोरगी वयात आली की सोळावं वरीस धोक्याचं गं, हे तर आता सगळ्यांनाच माहीत असतं. म्हणूनच कदाचित आता सरकारनं मुलीच विवाहाचं वय १८ निश्चित केलंय आणि मुलाचं २१! पण ही धोक्याची पातळी सहज ओलांडली पोरांनी. आता १८ व्या वर्षी मुलगा- मुलगी ‘सुजाण’ झाले की ते चक्क आपला उमेदवार निवडू शकतात. जे राज्यकर्ते, कायद्याचे नियमांचे लगाम लावून, आपलं आयुष्य घडवायचा अधिकार, स्वत:कडे ठेवणार, अशा भावी राज्यकर्त्यांना निवडायचा अधिकार अवघ्या १८ व्या वर्षी!
शाळेत नागरिकशास्त्र शिकलं म्हणजे लगेच दोन-तीन वर्षांनी या देशाची राजनीती, रणनीती आत्मसात केली असेल का हो या पोरांनी? १८ व्या वर्षी सार्वभौम मतदानाचा अधिकार आहे, पण त्यांना याची जाण तरी असेल का, की आपण निवडतोय तो उमेदवार नक्की आपलं काय भलं करणार आहे ते? शहरात राहणारा किंवा सुशिक्षित युवक, कदाचित राजकारण आणि राज्यकर्ते याबद्दल जागरूक असेल थोडाफार! पण ग्रामीण भागातल्या, अशिक्षित युवकांचं काय? तिथे तर सगळाच आनंदी आनंद..
शहरातही काही फार वेगळं चित्र नाही. गेल्या आठवडय़ात, मराठीचा खंदा पुरस्कर्ता, मराठी अस्मितेला वाहून घेतलेल्या एका राजकीय पक्षाचा अध्यक्ष, आपल्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आमच्या विभागात येऊन गेला; (माफ करा, राज्यकर्त्यांची प्रतिमा लक्षात घेता, येऊन गेले, असं म्हणायला हवं) तर हे साहेब फार तडफदार भाषण करत होते. मराठीचा आणि मराठी

 

अस्मितेचा मुद्दा फार हिरीरीनं मांडला त्यांनी. भाषण संपताना आपल्या उमेदवाराची ओळख करून देऊन त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आवाहन सुद्धा केलं त्या पक्षप्रमुखांनी! सभा संपली, गर्दी ओसरली आणि मतदानाचा पहिल्यांदाच अधिकार लाभलेल्या सात-आठ कॉलेजकन्या, हसत- खिदळत बसस्टॉपवर गप्पा मारत होत्या. त्यांचे संवाद ऐकून थक्क व्हायला लागलं. ‘साहेब काय हॅण्डसम दिसतात ना? आणि बोलतात पण काय डॅशिंग? साहेबच पंतप्रधान झाले पाहिजेत. आपण त्यांनाच मत देणार बाई! तरुण मराठी पंतप्रधान झाला तर आपला महाराष्ट्र किती पुढे जाईल नाही?’
व्वा! ही आमच्या १८ वर्षीय मतदाराची बौद्धिक पातळी, बौद्घिक प्रगल्भता! आपला उमेदवार कोण, हे तर या मतदाराला माहीतच नाही, पक्षप्रमुख निवडणुकीला उभे राहिले नाहीत हेही ठाऊक नाही. मग या शहरातून किंवा या महाराष्ट्र राज्यातून लोकसभेच्या किती जागा आहेत हे जाणून घ्यायची तसदी तरी घेतली असेल त्यांनी? एका मराठी चॅनलवर, ‘लक्षवेधी २००९’ या कार्यक्रमात तर चक्क मोठय़ा पडद्यावर महाराष्ट्राचा नकाशा आणि त्यावर मोठय़ा अक्षरात ५४३ असा आकडा येऊन जातो. ते बघून यातली एक युवती, मोठय़ा आत्मविश्वासाने सांगत होती की ‘महाराष्ट्रातून’ लोकसभेच्या ५४३ जागा लढवल्या जात आहेत. नवख्या मतदारांना हे असं चुकीचं मार्गदर्शन करणाऱ्या, त्या मराठी वृत्तविषयक चॅनलला आपली चूक दाखवून देण्याचं सौजन्य, कुठल्याच नागरिकाला, उमेदवाराला किंवा शासनकर्त्यांला झालं नसेल का? आज, हा लेख वाचल्यावर, संध्याकाळी त्या मराठी वृत्तविषयक चॅनेलवर ‘लक्षवेधी २००९’ हा कार्यक्रम बघा आणि पसरत चाललेल्या अज्ञानाची खात्री करून घ्या.
१९८९ पर्यंत या देशाचा मतदार २१ वर्षीय असावा, अशी अट होती. परंतु २८ मार्च १९८९ पासून या देशाचा मतदार १८ वर्षांचा असावा, अशी राज्यकर्त्यांची मनमानी अस्तित्वात आली. तसा कायदा करण्यात आला. पण याचं नक्की कारण काय? कदाचित ग्रामीण भागातला, दुर्गम भागातला, अंगठेबहाद्दर मतदार वाढवणं हे तर कारण नसेल? लोकसंख्येच्या तुलनेत मतदार वाढवणं ही कल्पकता असू शकेल? राजकारणाच्या बाबतीत मी स्वत:ला अज्ञानी समजतो. तुमच्यातले काही पंडित या १८ वर्षांच्या मतदाराचं समर्थन करतील, काही पुस्तकातले, कायद्यातले ‘प्रगल्भ’ संदर्भ सुद्धा देतील आणि १८ हे वय कसं योग्य आहे, हे पटवून देण्याचा आटापिटा करतील. पण..
पण खरंच आपला १८ वर्षीय मतदार, उमेदवार निवडायला, या देशाचा शासनकर्ता निवडायला प्रगल्भ असतो का? इतक्या लहान मतदाराला आपला घरखर्च किती असतो, हे ठाऊक असेल? जगण्याच्या मूलभूत गरजा मिळवताना किती अडचणी असू शकतात हे ठाऊक असेल? महागाईचा दर म्हणजे काय हे ठाऊक असेल? अर्थसंकल्पाचा अर्थ ठाऊक असेल? किंवा लालफितीत अडकणाऱ्या, लालफितीच्या नावाखाली मुद्दाम अडवून धरलेल्या योजनांची जाणीव असेल? रुपयाची किंमत, चलन फुगवटा, देशाची आर्थिक स्थिती, अशा नुसत्या शब्दांनी तरी तो परिचित असेल का?
गावपातळीवरचा १८ वर्षीय मतदार तर ग्रामपंचायतीइतका मोठा आवाका समजत असेल तर या लोकसभेला! या देशाचा लोकसभेचा उमेदवार, हा किमान २५ वर्षे पूर्ण वयाचा असावा लागतो; मग त्याला निवडून देणारा उमेदवारही निदान विचारांनी, अनुभवाने तितकाच प्रगल्भ नको का? मग कोणी
आणि का ठरवली ही वयोमर्यादा? सुशिक्षित, शहरी वातावरणातला युवक हा थोडय़ाफार प्रमाणात सज्ञान, सुजाण, प्रगल्भ असू शकेल कदाचित, पण ग्रामीण भागातल्या या युवक मतदाराचं काय? तो कुठल्या मूलभूत गरजांची अपेक्षा आपल्या उमेदवाराकडून करत असेल? किंवा त्याचा कुठला उमेदवार त्याच्या गरजा भागवून त्याला समाधान मिळवून देणार असेल?
मतदार म्हणजे फक्त ‘तो’ नसतो, तर ‘ती’ मतदारसुद्धा असू शकते. ग्रामीण भागातली कुठली ‘ती’ मतदार, आपल्या प्रगल्भतेचा विचार करून आपल्या उमेदवारावर शिक्का मारत असेल? १८व्या वर्षी कायद्याने विवाहबद्ध होऊन चूल आणि मूल सांभाळताना ‘ती’ काय विचार करून आपला राज्यकर्ता ठरवत असेल याचं कुतूहल वाटतं मला.
मूळात वय वाढत गेलं की प्रगल्भता वाढत असावी असा समज असताना, या देशाच्या मतदाराची, मतदान करण्याच्या अधिकाराची वयोमर्यादा अजून खाली सरकवायची गरजच काय? केवळ मनमानी निर्णय? की त्यामागेही काही वैचारिक दृष्टिकोन असावा? अन्यथा या लोकसभेत मतदान झाल्यावर मतदाराची वयोमर्यादा १५ ठरवली गेली तर? मतांचा जोगवा मागताना, एकमेकांवर कुरघोडय़ा करणारे हे विरोधी उमेदवार, मतदान संपल्यावर मात्र एकमेकांच्या गळ्यात गळे घालून, ‘आम्ही सारे भारतीय एक आहोत,’ अशा थाटात मतदाराला वाकुल्या दाखवत असतात. आपल्या आणि विरोधी पक्षाच्या एकत्रित भल्यासाठी, एका ठरावाद्वारे हे सत्तापिपासू मतदाराची वयोमर्यादा १५ पर्यंत खाली आणणार नाहीत कशावरून? आणि मग उमेदवाराची वयोमर्यादा काय असेल? १८ किंवा २१? आणि मग याच क्रमाने या देशाच्या मंत्रिमंडळाचं सरासरी वय काय असेल?
मतदाराची वयोमर्यादा ही बाब वाटते तितकी गौण किंवा दुर्लक्षित करण्यासारखी नाही. कमी वयोमर्यादेनुसार जर प्रगल्भता नसलेल्या किंवा कमी असलेल्या, अनपढ, गवाँर नागरिकांकडून मोठय़ा प्रमाणावर मतदान घडवून घेऊन, या देशाची लोकसभा अस्तित्वात येणार असेल तर ‘अशा’ लोकसभेचा सखोल विचार करायला हवा.
देश समर्थ, बलवान घडवायचा असेल तर त्याचे शासनकर्ते, राज्यकर्तेसुद्धा तसेच प्रगल्भ आणि विद्वान असायला हवेत आणि मग अशा राज्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी, मतदारही किमान २१ वर्षांचा आणि मुख्यत: ‘साक्षर’ असावा अशी अट ठेवली तर? स्वातंत्र्यानंतर ६२ वर्षांनीही जर या देशात ‘साक्षर’ मतदार मिळत नसेल, तर येत्या निवडणुकांमध्ये मतदान करताना, आपल्या सर्वानाच त्याची शरम वाटायला हवी.
काल लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका पार पडल्या. १६ आणि २२ एप्रिलला किती बालिश मतदारांनी मतदानाचा पहिल्यांदा हक्क बजावला असेल याचं कुतूहल वाटतं. खरं तर त्यांनी कोणाला म्हणजे कुठल्या प्रवृत्तीला, कुठल्या विचारांनी, कोणाला मतदान केलं हे जाणून घ्यायची खूप उत्सुकता आहे. पण वृत्तविषयक बातम्या देणारे हे चॅनेलवाले त्यांना खूपच ‘रंजक’ प्रश्न विचारतील आणि तुमच्या-आमच्यासमोर एक ‘रंजक’ कार्यक्रम सादर करतील याची खात्री आहे.
मतदान केंद्राच्या बाहेर एखाद्या १८ वर्षीय मतदाराला त्याच्या मतदानाचा ‘First Experience कसा होता? क्या feeling थे आपके उस वक्त?’ असा बावळट प्रश्न चॅनेलवाल्यांकडून विचारला जाईल. आणि मग या समर्थ, बलवान देशाचा हा ‘युवा मतदार’सुद्धा `I am Exited' किंवा `It was really a fun voting 1st time.' असं बिनडोक उत्तर देईल. किंवा एखाद्या ग्रामीण भागातला मतदार (ती किंवा तो) ‘बाबूजीने कहा था, वही पर हमने ठप्पा लगाया’ असं प्रामाणिक उत्तर देईल. तेव्हा पुढील ५ वर्षे लोकसभेच्या रूपानं आपल्यापुढे काय सादर होणार आहे, याचं स्वप्नं बघत बसावं लागेल’, ‘साक्षर’ मतदाराची वाट बघत..
sanjaypethe@yahoo.com