Leading International Marathi News Daily
गुरुवार । २३ एप्रिल २००९

‘बालपणीचा काळ सुखाचा’ असे एक वचन प्रसिद्ध आहे, याच धर्तीवर ‘निवडणुकीचा काळ सुखाचा’ असे मला म्हणावेसे वाटते. खरे तर माझे हे बोलणे बहुतांश लोकांना न पटणारे आहे. निवडणूक म्हटली की महानगरपालिका कर्मचारी, समस्त शिक्षकवर्ग, सरकारी कर्मचारी असे सर्वजण जणू अहोरात्र कामाला जुंपले जातात. वैतागलेले असतात ते त्यामुळे. त्यातच सतत ‘यांनाच मते द्या, यांच्याशिवाय दुसरे कोण?’, ‘ताई, माई अक्का- विचार करा पक्का’ अशा प्रकारच्या अनेक घोषणांनी कान किटून जातात. परिसरात एक प्रकारचा

 

गोंधळच असतो म्हणा ना! ही सर्व परिस्थिती मान्य असली तरीही एक गोष्ट नजरेआड करून चालत नाही- ती म्हणजे याच दिवसांत फक्त आमचं म्हणजे जनसामान्यांचं महत्त्व फारच वाढलेलं असतं. आमचं एक-एक मत म्हणजे जणू सुवर्णाची मोहोरच! एरवी सामान्य जनतेला जंताप्रमाणे तुच्छ समजणारे गल्ली ते दिल्लीतील, छोटे ते मोठे कार्यकर्ते ते नेतेमंडळी कशी आमच्या अगदी दाराशी येतात, तेही हात जोडून नम्रपणे! उद्धटपणाचा लवलेशही नसतो चेहऱ्यावर, वदनावर सुहास्य झळकत असते.
आणि खरे तर त्यांच्या याच विनम्र भावाने ते भाव खाऊन जातात. हेच आमचे खरे तारणहार असा आमच्या मतदारांच्या मनातही भाव पक्का होतो अन् मत देण्याचा विचार आम्ही निश्चयाने पाळतो. अर्थात, त्यानंतर आमचे केरपोतेरे होते हा भाग वेगळा! ही गोष्ट आम्हालाही माहीत असते. आज लवलवून आमचे मत मागणारे निवडणुकीनंतर आम्हाला किंमत देणार नाही हे पक्के ठाऊक असते तरीसुद्धा.
माणसाला औटघटकेच्या ‘राजे’पणाचा सोस असतोच ना? एरवी आम्ही म्हणजे ‘किस झाड की पत्ती’ असे समजणारे हे शुभ्र, कडक नेते कसे परत परत दाराशी येतात, हात जोडतात, विनंती करतात, नेते-अभिनेते बनतात. त्या वेळेस खरे सांगू असे वाटते यांना थोरपणाने आशीर्वाद द्यावेत, म्हणावे- ‘वत्सा, भिऊ नकोस आम्ही तुलाच मत देणार.’ आमच्या रोजच्या ‘रांधा-वाढा-कष्ट करा’ या कंटाळवाण्या जीवनात या निवडणुका आगळाच रंग भरतात, गुलाबपाण्याचे शिंपण क्षणभराचा गारवा देते ना तसेच काहीसे वाटते. यांच्यामुळेच तर आम्ही काही काळ ‘राजे’ बनतो. मग पुढे ‘ते’ आम्हाला ‘बनवायला’ मोकळे होतात. आमचे नाव यादीत नाही असे आम्ही म्हणताच यांची होणारी धावपळ बघण्यासारखी असते. सतत आम्ही यांच्यामागे आमच्या कामासाठी पळत असतो, पण निवडणुकीच्या काळात यांना पळायला लावतो, हात जोडायला लावतो, चेहऱ्याची इस्त्री मोडायला लावतो, एकमेकांशी सलोख्याने वागायला लावतो हे काय कमी आहे?
म्हणूनच या निवडणुका म्हणजे आमची करमणूक असते. त्यानंतर आमचा विदूषक बनतो; कारण हे बनतात रिंगमास्टर. खेळतात एक सर्कशीचा खेळ. पण निवडणुकांच्या काळात आम्ही असतो ‘राजे’ अन् नेते असतात आमचे सेवक. म्हणूनच हे क्षणभंगुर असलेले ‘राजे’पदही मनाला मोहविते, खुलविते अन् वाट पाहायला लावते. आणि याच कारणासाठी मला निवडणुका फार म्हणजे फारच आवडतात.
मीना खानझोडे